च्या मारी हे vaccine कधी एकदाचं येईल की राव 😢

 च्या मारी हे vaccine कधी एकदाचं येईल की राव 😢 


अगदी वर्ष किंवा काही महिन्यांपूर्वी सतत भेडसावणाऱ्या या प्रश्नाने आमची झोप उडाली होती.  खरं तर नकोच आठवण त्या दिवसांची !! आम्ही इतके कृतघ्न आहोत, स्वार्थी आहोत की निलाजरे, हा मला सध्या पडलेला प्रश्न. 

नव्या सुर्या सोबत नवी सकाळ होते तसे आमचे प्रश्न, चिंता ही नवनवीन असतात.  उगवत्या सूर्याला नमस्कार असंही मला म्हणायचं नाहीये बरं का.  


जानेवारी 2020 पासून काही तरी बातम्या कानी पडत होत्या, पण शेजारच्या घरात आग जरी लागली तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्ही असतो फक्त प्रेक्षक तो खेळ पाहणारे. ज्यांना थोडी  फार चाड होती ते याचं गांभीर्य सांगत होते पण बेफिकीर आम्ही, शेजारची आग आमच्या घरात लागे पर्यंत होतो घोर निद्रिस्त अन मग झाली पळता भुई थोडी. गाढ झोपेत भुकंप होतो अन सर्वच हादरत राहते अन मग आम्ही आहे त्या अवस्थेत घराच्या बाहेर पडतो. तसच असतं आग लागल्यावर ही. पण इथे विषाणू होता जो तोंडातून, नाकातून प्रवास करत होता ...आणि आम्ही रस्त्यावरचे घरात बंदीस्त झालो. याचा वेग, गती एवढी प्रचंड होती की अदृश्य तो राक्षस थैमान घालत सुटला. काही कळायच्या आत सर्व हातातून निसटले अन एक वेगळं आयुष्य जगायला की मरायला माहीत नाही पण सुरू झालं.  रस्त्यावर आंदोलन करून स्वतः ला अटक करवुन घेतात, तसंच आम्ही स्वतः ला आपल्याच घरात गोठवलं स्वतः च आपल्या मुसक्या आवळून. 


तोवर या विषाणूचा कहर इतका फोफावला होता की विचारू नका.  हे "नाकखोकलासमानी" संकट होतं एवढं बिकट की सर्वच यंत्रणा, उपाय पडले त्या समोर फिकट. समस्त विश्वासाठी हा अध्याय नवीन, रोज जगणं बदलून बदलून  शिकवत होता नव्यानं जगायचं. श्रध्दा तेवढ्याच अंधश्रद्धा, तसंच काळजी करणारे, अति काळजी करणारे तर काही निर्ढावलेले बेफिकीर.  रोज चे हादरुन टाकणारे आकडे तर आतल्या आत गोठवत होते जगणं.  


या शत्रूचा हा अचानक हल्ला थोपवण्यासाठी कुठलीही पूर्व तयारी नाही, ना कुठलं आरमार, तटबंदी, पुरेसे सैन्य बळ ही नाही. अकस्मात पुकारलेल्या युद्धासाठी रणभूमी वर मग "कोविड सेंटरचे"  पाडाव, छावण्या आकार घेऊ लागल्या अन लढता लढता जखमी झालेले सामान्य नागरिक या छावण्यात आसरा घेऊ लागले ...मावळे ही मग सरसावले अन युद्धात सहभागी होऊन लढू लागले.  सर्वच स्तरातील योध्दे घनघोर लढत होते.  आम्ही सर्व मात्र आत बंदिस्त होतो अनेक उपाय आणि चर्चा करत.  अनंत शस्त्र अस्त्र निर्मित होत होती. हे जवळजवळ एक वैश्विक महायुध्द आहे  आणि प्रत्येक क्षणी नवी चाल, नवा हल्ला. पण यासोबत लढण्यासाठी महाराज, त्यांचा गनिमी कावा नव्हता असं सारखं वाटत होतं.   उगाच एक विचार डोक्यात आला, जर महाराज असते तर त्यांनी ही लढाई कशी लढले असते. असो.


या वर कायमचा उपाय नव्हता आणि तो शोधण्यासाठी सर्वच स्तरावर अति उच्च कोटीचे प्रयत्न सुरू होते.  Vaacine म्हणजेच "लस" हा एकमेव पर्याय होता आणि त्याच्याच प्रतीक्षेत सार विश्व होतं.  म्हणजे वसुदेव देवकीचा आठवा पुत्र जन्मणार आणि तो कंसाचा वध करणार. इथे अजून पहिला ही पुत्र जन्माला आला नव्हता आणि खुप वाट पाहायचीच होती.


दरम्यान या सारीपाटावर विविध डाव रंगत होते,  फितुर म्हणावं का हा प्रश्न आहेच?   पण राजदरबारी याची जय्यत तयारी सुरूच होती.  अन महाराजांच्या काळात ही परदेशी लोकांच्या वरचढ जे आरमार त्यांनी उभं केलं तशीच परिस्थिती आली. वैज्ञानिक प्रगती आणि उच्च तंत्रज्ञान असुन ही सर्व देशांच्या पुढे आमची पाऊले होती. पण घरभेदी होतेच, तर आपल्याच घरची प्रगती न पाहवणारी आहेतच की.  आम्हीच आमच्या रस्त्यावर अडथळे निर्माण करत होतो. आवडते नावडते राज्य यात तू तू मै मै करत परिस्थिती अजुन अजून चिघळत गेली.  एक हातचलाखी आणि धुर्त जादुगार मधेच एक खेळ कोरोनिल दाखवून गेला, अन त्याचे जमुरे हा खेळ रंगवत होतेच. पण मग strip strip गोळ्या खाणाऱ्या आम्ही जडी बुटी गंगेत बुडवली तसंच काहीतरी. पण गोळ्या खाऊन खाउन पोखरलेल्या शरीराने जशी आयुर्वेदाला नव संजीवनी दिली तसं ही काही तरी घडतच होतं.  असे बहुरंगी बहुढंगी खेळ सुरुच होते.   


दरम्यान आकडे अजून अजून अस्वस्थ करणारे होत चालले, जीवघेणा काळ सोकावला, योध्दे धारातीर्थी पडत होते अन तो भस्मासुरी विषाणू  गिळंकृत करत होता शेकडो, हजारो, लाखो दाबत कोंडत श्वास. तिकडे महाराजांच्या काळात जसे त्यांचे खास लोक स्वराज्यात  अहोरात्र झटत होते तसेच अनंत योध्दे वैश्विक पातळीवर काम करत होते.  इकडे ती "लस" आकार घेत होती.  त्याच्या पडताळणीसाठी काही  स्वयंसेवक हवे होते, इथे एक उल्लेख आवर्जुन करतो तो आमचे मित्र जे स्वतः ही एक वैज्ञानिक आहेत, उच्च शिक्षित ही असे डॉ विश्वनाथ स्वामी यांनी वर्षभरापुर्वीच एक स्वयंसेवक म्हणुन  ती टोचुन घेतली. त्यांचा आणि त्यांच्यासारख्या सर्व लोकांचे आभार. तुम्ही स्वतः हुन पुढे येऊन या देशासाठी आणि जगातील सर्वच लोकांसाठी एक आदर्श म्हणुन स्वतः चा जीव धोक्यात घालून  पुढे आलात त्यासाठी सलाम.


एकीकडे हे युद्ध सुरूच असताना दुसरीकडे ही लस आता भरली जात होती. एक एक करत सर्व वयोगट (18 पर्यंत) ती टोचून घेऊ लागले. मागणी पुरवठा हा  नाजुक दोर सतत ताणल्या जाऊ लागला अन पुन्हा सुरू झाला तोच खेळ ..आरोप प्रत्यारोप , खरं खोटं, बदनामीचे सूर यात ही अखंड रुग्णसेवसाठी झटणारे असंख्य योध्दे, औषध निर्माते आणि व्यवस्था त्यांच्या कामात व्यग्र होते. असंख्य प्रायोगिक, व्यावसायिक अन पथ नाटय घडत होते.  अशा खडतर मार्गातून लस अवतरली. एरवी सुईला घाबरणारे आम्ही भाया वर करुन, दात विचकून अन फोटो काढत ती टोचून घेऊ लागलो. बोलता बोलता गर्दी, गोंधळ, गडबड अन चेंगराचेंगरी होऊन हे ही थांबलं कारण मागणी पुरवठा दोरी आता अजून अजून नाजुक होत गेली. 


आनंदाचा, अभिमानाचा क्षण म्हणजे आमचा देश इथे ही लढाई जिंकला किंवा जिंकण्यासाठी एक सर्वोत्तम म्हणुन विश्वासमोर आला आणि पाहता पाहता लस देशोदेशो पोचली अन पुर्ण नाही पण बऱ्यापैकी जिंकलो होतो. त्यांचं नावच का, फोटो का असे वाद सुरू असताना  ती लस इतकी तळागळात पोचली आणि उपलब्ध केली की आज कोणीही उठसूठ त्यांच्या नावाचे बॅनर आणि मंडप लाऊन  ती त्यांच्या नावावर अक्षरशः खपवत आहेत. आता तो नावाचा श्रेयवाद नाही, राजकारण नाही ..विसरलो आम्ही ते सर्व .. 


18 वर्ष वयाच्या आधीच्या लोकांच्या लसी साठी घडणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रतीक्षेत थांबतो...


पण ही लढाई जिंकून देण्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला, व्यवस्थेला, देशाला आणि त्याची दोरी घट्ट धरून हा रथ मानाने मार्गस्थ करणाऱ्या मोदी सरकारला आणि त्याला बांधलेली दुसरी सर्व राज्यांची दोरी घेऊन त्याच गतीने मार्गस्थ होणारे ते सर्व राज्यांचे रथ या साऱ्यांना मानाचा मुजरा !!


कदाचित करोडो हातांच्या टाळ्या, वाजवलेल्या थाळ्या अन त्या अगणित दिव्यांनी तर ही ऊर्जा निर्माण केली असेल का ?  


पण महामारी, महायुद्ध च होतं आणि आहे ते, गर्दीतले, वर्दीतले, घरातले, दारातले अनेक आपण गमावले. त्याचा धोका अजून ही पुरता संपला नाही हे आवर्जुन लक्षात ठेवलं पाहिजे.  तेंव्हा आवश्यक ती काळजी घेणे ही आजची गरज आहे, अन्यथा ते पुन्हा सुरू होईल.


आठवा हो आठवा ते दिवस आठवा

होती पायरी उतरायची चोरी 

चालते फिरते जग झालं कोंडवाडा

बघता बघता निर्मनुष्य जंगल झालं


मन सुन्न करणाऱ्या बातम्या, घटना

दिवसाही भीती वाटावी अशी शांतता

आपलाच श्वास ऐकु येत होता

पक्षांचे किलबिलने ही होते म्हणा


अनंत फायदे ही झाले या काळात

घराला घरपण आलं हरवलेलं

सर्वच स्थिरावलं मंदावल थांबलं

आर्थिक घडी विस्कटली बिघडली


उद्याची शाश्वती अन आशा संपली

ते सर्व परत केलंय या लसिने 

तेंव्हा आठवा हो आठवा तो काळ

पुन्हा नको तो सोकावणारा काळ


झालेल्या चुका सुधारू यात कारण, च्या मारी ही लस लै भारी ना राव !! 


शरद पुराणिक

03102021

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....