काल निर्मला चा फोन आला ...अन एक जुना अध्याय डोकावुन गेला

 काल निर्मला चा फोन आला ...अन एक जुना अध्याय डोकावुन गेला


शाळेत पूर्वी दोरा शाईने बर्बटून दोन पानामध्ये आडवा तिडवा ओढून बाहेर काढायचा, मग पानं उघडून ती symmetry (समानबद्ध) जी आकृती होते, तसंच काही तरी असतं जगणं आपलं. तीच वही कधी तरी पुढे आवरताना हाती लागते अन पुन्हा त्या वर्गात जातो आपण. असं काल घडलं. 


बीड येथे दर कोस, दर मजल करत शालेय शिक्षण सुरू होतं, व्रात्य पणा, खोड्या, खेळ आणि मित्र मैत्री आणि गप्पांचे फड यात कधी मॅट्रिक ला आलो कळलं नाही. अगदीच कष्टाविना इथपर्यंत पोचलो त्याचा आनंद घेतंच होतो, अन घरच्यांनी निर्णय घेतला याला 10 वीला बाहेर शिकायला ठेवल्याशिवय हा काही पास होणार नाही.  बरं त्या काळात मॅट्रिक हे म्हणजे अगदी जीवन मरणातील अगदी अखेरचा शैक्षणिक टप्पा, अन आई बापाला तर म्हणजे oxford universiry त globally topper होणारी तयारी याने करावी ही अपेक्षा. 


एकदाचं ठरलं की मला धारूर (जो त्या काळी तालुका ही नव्हता) येथे आमचे आत्ये भाऊ कै. भगवानराव मुळे (मुख्याध्यापक)  यांच्याकडे पाठवण्याचे ठरले. मी अगदीच 10 वी त्यात ही बाल बुद्धी फार काही कळत नसल्याचा फायदा घरच्यांना झाला अन एक पिशवी घेऊन मी धारूर ला रवाना झालो. आता मुख्याध्यापक बंधु अन त्याच शाळेत आम्ही. एका माडीवरच्या घरात दोन प्रशस्त खोल्या मध्ये आम्ही सर्व राहात होतो, ते ही शाळेच्या अगदी समोरच. सर्व म्हणजे, मुळे काका ((त्यांची मुले त्यांना काका आणि आईला (कै शीला वहिनी) काकी  म्हणायचे)), त्यांच्या 4 मुली, कै. मंगलताई, मीनाताई, माधुरीताई अन निर्मला 2 मुले अनंत, प्रदीप अन मी. असं हे कुटुंब. हे सर्व जण पूर्वी बीडलाच होते काही वर्षे म्हणुन bonding चा प्रश्न नव्हता. 


तशी मुळे यांची शिस्त फार, त्या काळी ही tongue cleaner ने दात घासणे , अन बडीसोप खणाऱ्यालाही हे  अगदी तंबाखु किंवा तत्सम काही तरी समजणाऱ्या या कुटुंबात मी तसा मूळ बेशिस्त असुन ही रमलो. स्वतःचे कपडे धुने, अर्थात मिनाताई, निर्मला, माधुरी यांची मदत असायची. पिण्याचे आणि वापरण्याच पाणी तळमजला ते पहिला मजला असं घागरी ने  भरण्याचा एक सामूहिक कार्यक्रम असायचा. देव पुजा ती ही आळीपाळीने मुलांवर असायची. ते अगदी उन्हाळी कामाला ही मदत करायची (कुरवड्या, पापड्या साठी उचला उचली अशी मदत). या सर्वात एक झालं,  वाण नाही पण गुण लागला - हे अशा अर्थाने की ही सर्व मंडळी उपजात बुद्धिवंत, हुशार, प्रचंड वाचन आणि आम्ही म्हणजे सडाफटींग. परीक्षेच्या एक दिवस अगोदर वाचायचे, त्यावर परीक्षा द्यायची, अन पास होणे एवढाच शिक्षणाचा अर्थ उमगलेले. 


सर्व भगिनी  मीनाताई, माधुरी ताई, निर्मला, कॉलेजमध्ये होत्या, मी दहावीत, अनंत अन प्रदीप अनुक्रमे 9 वी व 8 वित होते. अन boss हेडमास्तर असल्याने खूप शैक्षणिक हवामानात मला सुरुवातीला अजीर्ण व्हायचं, पण नंतर सवय झाली ती इतकी की दहावीच्या सराव परीक्षे पुर्वी माझ्या सर्व पुस्तकांच्या 3 आवृत्त्या (revision) झाल्या होत्या. या साठी या कुटुंबातील सर्व सदस्यांनी खूप सहकार्य केलं. अगदी त्यांचाच एक मुलगा समजुन कुठल्याही प्रकारे सापत्न वागणूक न देता सांभाळून घेतले. बरं हा सर्व भावनिक व्यवहार होता, कुठलीही देवाणघेवाण नाही, फक्त शब्द अन नात्यांचा बंध याच धर्तीवर हे महत्कार्य संपन्न होत होते. याच्या मुळाशी आमची इह वर्षांची दिरंगाई, नासमज, व्रात्य पणा (जो सर्वांनी खरं तर करायलाच पाहिजे, वो दुनियादारी कुछ अलग ही है) हे सर्व कारणीभूत होतं. 


सराव परीक्षा आता जवळ आली होती, अन एक दिवशी निरोप आला माझा मधला भाऊ कालिदास हे जग सोडून गेला, त्याचं अन माझं वय एक दीड वर्ष इकडे तिकडे. फोन वगैरे नसल्याने बातम्या उशिरा कळत. मग मला मावशी जीचं कुटूंब ही धारूर (....प्रकाश काळे, बाळ्या, मंगल, पिंकी ही इकडची गॅंग होती...) ला होतं,  ते म्हणजे मला सासरहून माहेरी गेल्यासारखे वाटायचे ...सुटीच्या दिवशी कधी तरी मी जायचो. ती मावशी बीडला घेऊन आली, दरम्यान इकडे सर्व आटोपले होते, मला त्याला बघताही आलं नाही. ही घटना मन सुन्न करून गेली, मला पून्हा धारूर ला जावं असं वाटलं नाही, पण नाईलाजाने गेलो, अभ्यासात मन अजिबात रमत नव्हते. पण मीना ताई, निर्मला ताई यांनी खुप धीर दिला, शीला वहिनी जी मुळातच फार मायाळू होती तिने पण विशेष काळजी घेतली. पण मानसिक दृष्ट्या मी कोलमडलो, जे पाठांतर होतं ते विसर पडून मी बेचैन व्हायचो, इतका की एक दोन वेळेस झोपेत उठून पुस्तक घेऊन बसायचो. 


एकदाची परीक्षा झाली पण निकाल काही मनासारखा लागला नाहीच, याला बहुतेक ती परिस्थिती कारण असावी (उगाच आपल्या हुशारीला शाप कशाला :) :) ). पहिले 3 पेपर चड्डीवर,  उरलेले पेपर वडिलांच्या आल्टर केलेल्या पँटवर अन निरोप समारंभात जोरदार भावनिक भाषण ठोकून रामराम केला. आता हे काही वेगळं सांगणं नको अगदीच 10 ते 11 महिन्याच्या या प्रवासात इथेही अनेक मित्र जोडले, ज्याचा मला मोह आहे, हिच माझी संपत्ती आहे. अनेक जिवाभावाची माणसं मिळाली आणि "freinds group 1984" असा आमचा एक व्हाट्सअप्प ग्रुप आहे. मधल्या काळात अजिबातच संपर्क नसलेल्या अनेक प्रभृती आज social media ने जोडले गेलो, हा एक अजून चमत्कार. आता एक खंत आहे, अनेकदा ठरवुन ही एक get together राहिलं आहे, ते होऊलच एकदा केंव्हातरी.  छोट्याश्या या गावातील अनेक आठवणी आहेत इथला export होणारा खवा, पाचदिवस चालणारी होळी रंगपंचमी, म्हणजे सतत 5 दिवस रंग खेळतात. त्या आधी महिनाभर कटघरातून येणारा संगीताचा आवाज. किल्ला, निसर्गरम्य असं अंबाचुंडी मंदिर, अन बरंच काही.


पुढे माझा प्रवास बीड, अंबाजोगाई, औरंगाबाद, पुणे असा अनेकवेळा सांगितलाच आहे. 


काल निर्मला चा फोन आला अन ते वाहितलं पान हाती लागलं. पुलाखालून खुप  पाणी गेले, अनेक ऋतु रूप सजवून गेले, तर काहींनी कडक उन्हाळे ही पाहिले. काका, ज्यांनी आयुष्यात बडीसोप ही खाल्ली नाही त्याना मौखिक कर्करोग झाला अन निवृत्तीनंतर लगेच गेले,  मंगलताई अचानक सोडून गेली हे जग. नंतर शीला वहिनी ही गेली.


मीना,  माधुरी, निर्मला मात्र आपल्या संसारात रमल्या, अनंत, प्रदीप ही कल्याण डोंबिवली असे वसले आहेत. सर्व जण आणि त्यांची मुलं मुली चांगल्या हुद्द्यावर आहेत. मुळातच मोठा व्यास असलेल्या या वटवृक्षाचा खूप विस्तार झाला ...अनेक गोष्टींचा उलगडा काल निर्मलाच्या फोन ने झाला ...त्या सर्व आठवणी जुन्या पुस्तकात लपवून ठेवलेला मोरपीस सापडावा अशा समोर आल्या आणि मी पुन्हा गदगदलो....


शरद पुराणिक

100920

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती