एका युगाचा अंत

 एका युगाचा अंत


परवा औरंगाबाद ला गेलो होतो, कारण होतं आमच्या सासऱ्यांचं विकलेले घर आणि त्याचा व्यवहार पुर्ण करायचा होता. 


एक दोन दिवस कागदपत्रे आणि इतर बाबींची पूर्तता करुन आम्ही नोंदणी कार्यालयात पोचलो त्याच घरातून जे काही तासानंतर आपलं अस राहणार नव्हतं. खरं तर हा विक्री व्यवहार अनेक महिन्यापूर्वीच ठरला होता आणि ज्या दिवशी तो ठरला होता त्याच्या काही दिवसातच घराचे मालक म्हणजेच माझे सासरे अनंतात विलीन झाले होते...किंबहुना त्यांना त्यांचं जीवन त्याच घरात पुर्णतः व्यतीत व्हावा ही त्यांची इच्छा असेल...असो त्या नंतर हा अर्धवट व्यवहार पूर्णत्वाला जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.


मी माझ्या सासऱ्यांसोबत (अण्णा) अनेक वेळा केलेल्या चर्चेतून अस कळालं होतं की त्यांनी अनेक हाल, अपेष्टा, कष्ट, त्रास यांचा सामना करून हे घर उभं केलं होतं. त्यांच्या शिक्षणा नंतर लगेच त्यांचं राहतं गाव सोडुन तालुक्याच्या ठिकाणी एका व्यापाऱ्याकडे कामाला लागले..रोज त्या घरची सर्व घर कामं करून दोन वेळचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था होती. अण्णांना कुठलही पाठबळ नव्हतं आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. ६ बहिणी आणि भावंडं आणि म्हातारे आई वडील एवढं कुटुंब होतं गावी. त्यांनी कित्येक वर्षे न डगमगता हे कष्ट सोसले आणि जबाबदारी पार पाडत होते. त्याच सोबत कुठे नोकरी मिळेल या साठी प्रयत्न करत होते.


अशातच त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळाली आणि त्यांनी औरंगाबाद शहरात पहिली नोकरी मिळवली स्वतः च्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर. सोबतच अपेक्षा आणि जबाबदाऱ्या ही वाढत गेल्या. काही वर्षातच त्यांच आमच्या सासुबाई सोबत लग्न झालं... इकडचे कुटूंब ही खूप मोठं होतं.

कौटुंबिक आणि इतर सर्व गोष्टींचा मेळ बसवत त्यांनी त्या काळी गणेश कॉलनीत एक जागा विकत घेतली ...लगेचच त्या वर बांधकाम करणे शक्य नव्हतं, पण सरकारी अट होती त्यामुळे त्यांना लगेच बांधकाम सुरू करावे लागले.


एकच कमावणार व्यक्ती त्यात बांधकामाचा अचानक पडलेला बोजा, पण त्यांनी हार मानली नाही . प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हे घर उभं केलं. कुटुंबासाहित तिथे राहायला गेले.  प्रगतीच्या या  काटेरी मार्गावर चालत असतानाच त्यांची बदली परगावी झाली. कुटुंब कबिला तेथेच ठेवून, ते बदलीच्या गावी रुजू झाले. दर 15 दिवसांनी किंवा महिन्याने ते ये जा करायचे. अतिशय कष्टातून सर्व मिळवलं होतें त्यामुळे त्यांच्या स्वभावात व्यवहारी पणा, जिद्द आणि चिकाटी होती. पण यात ते कुटुंबातील कोणालाही कशाचीही कमतरता पडू दिली नाही. याचं उदाहरण म्हणजे त्यांच्या घरी कायम असणारी फळं, भाज्या, खायचे पदार्थ यांची असणारी रेलचेल त्याचं प्रतीक होती. ते स्वतः ही एक ऊत्तम खवय्ये होते, चवीने खाणार त्याला देव देणार, असच काही.  हे सगळं होत असताना त्यांची मुले ही मोठी होत होती. त्यातच माझा विवाह त्यांची मुलगी अनिता हिच्याशी झाला. १९९७ मध्ये ही त्यांनी साजेल अशा थाटा माटात आमचा  देखणा विवाह सोहळा केला. १९९७ ते २००४ च्या काळात अनेक वेळा त्यांनी आमची भाजी विकत घेतली, जेंव्हा जेंव्हा ते बाजारात जायचे ते सर्वांसाठी भाजी आणी फळं घ्यायचे. त्यांनाही ते काही फुकट मिळत नव्हते पण देण्याची वृत्ती फार मोठी होती. आमच्या सोबतच इतर आप्तेष्टांना त्यांनी अनेक प्रसंगी भाजीपाला पोचवला आहे.  हे सर्व करताना कुठलाही अहंभाव नाही, प्रदर्शन नाही.  राजू त्यांचा मोठा मुलगा ही प्रथा पुढे चालवत आहे. प्राप्त परिस्थितीत तो ही सर्वांशी समरस होऊन कायम आधार देतो. 


अण्णा तसे कमी बोलायचे पण माझ्या बायको सोबत तास न तास चर्चा करायचे, त्या दोघांचे एक घट्ट नातं होतं, अनेक गोष्टी त्यांना एकमेकांच्या नजरेत कळायच्या.  दरम्यान आम्हालाही मुलं झाली, त्यांना पाहण्यासाठी त्यांची घालमेल व्हायची, त्यांना पाहता पाहता त्यांचे डोळे पाणावले जायचे. हे त्यांचं निशब्द प्रेम. तितकंच प्रेम त्यांनी राजू च्या आणि पिंट्या च्या मुलावर केलं अगदी जीवापाड केले. 


हे सर्व करत असताना भविष्याची सगळी सोय त्यांनी करून ठेवली. संबंध आयुष्यात त्यांनी कधीही कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही, कुठेही हात पुढे केले नाहीत, या उलट अनेकांना मदतीचा स्त्रोत झाले. शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबाची पुर्ण जबाबदारी समर्थ पेलली. 


या सर्वाला दृष्ट लागली आणि एका छोटयाशा आजाराने त्यांनी अंथरून धरलं, सर्वांनी उपचार, देख रेख, काळजी सर्व करून ही काही उपयोग झाला नाही.  त्यांच्या दोनीही सुना अंजु, अदिती आणि आमच्या सासूबाईंनी अनेक कष्ट घेतले या काळात. पण ईश्वरी आदेश असावा कदाचित, २०१७ च्या दिवाळीच्या दुसरे दिवशी त्यांची जीवन यात्रा संपली अन एका युगाचा अंत झाला म्हणजेच त्यांनी उभारलेल्या त्या घराची विक्री झाली, आणि माझ्या समोर तो 20 वर्षाचा काळ चित्रपट डोळयांसमोर फिरत राहिला. अनेक आठवणींचा साठा, आनंदी क्षण, अनेक कार्यक्रम, प्रसंग, सोहळे, विधी आणि फ़क्त सुखाची झालर असलेली ती वास्तू आज कोण्या दुसऱ्याची होणार होती... अतिशय कठीण प्रसंग होता तो..आयुष्यभर सन्मानाने जगलेल्या त्या युगाचा अंत झाला... त्यांच्या जाण्याने अक्ख घर कोलमडले की काय, असं वाटतं, तुम्ही हवे होतात अण्णा कायम सर्वांसोबत.


आज अण्णांच्या द्वितीय स्मरणदिनी त्यांना ही शब्दांजली


शरद पुराणिक

३१/१०/२०१९

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती