टोपी तुझी माझी
टोपी तुझी माझी
विचारांची, हक्काची, मानाची
रंग वेगवेगळे तसे विचार ही
तुझी लाल, माझी ही लाल
कुठे भगवी, हिरवी निळी
प्रत्येक रंगात दडलंय गुपित
धर्म, जात, राजकारण यांचं
रंगात विभागले आचार विचार
तसे रंगांचे अर्थ बदलले
प्रतिकात्मक रंग त्यांचे निखळ
विसरून गेलो आम्ही सरळ
आम्ही केली त्यात सरमिसळ
विवेक, अविवेक अन स्वार्थाची
आता रंग दिसला की
आतला माणूस दिसत नाही
दिसतो त्याचा रंगाळ चेहेरा
पुसलं व्यक्तिमत्व त्या रंगात
सप्तरंगी त्या दुनियेतले रंग
अनोळखी, दुसरे वाटू लागतात
जेंव्हा आपलीच माणसं
त्यात चेहेरे झाकतात
नुसत्या टोप्या घालून काढून
काहीच होणार नाही साध्य
याची त्याला अन त्याची याला
सतत करू नका अविचार
बहुरूपी रोज बदलतात टोप्या
खरे रंग विसरून स्वतः चे
शोधू लागतात गमावलेले रंग
पाहून आसपासच्या टोप्या
विचारांची दिवाळखोरी झाली
तशीच टोप्याची अदलाबदली
भगवे, लाल, हिरवे, निळे
सर्व रंग फिके फिके झाले
तूम्ही म्हणाल एक रंग राहिला
पण तो रंग तसाच आहे
तो बदलला नाही आताही
रहावा तो तसाच शाश्वत
....माणुसकी....
उगाच "काळा" विचार नको
शरद पुराणिक
261020
Comments