पहिला पाऊस झाला
उन्हाची धग वाढत चाललेली
मृगाची वाट पाहात बसलेले लोक
त्या उन्हाच्या धगीत
तसं उन्हाचे चटके तापत चाललेले
अचानक शिराळ पडत
ढग येतात पावसाची काळवंडून
चार थेंब पडतात
पहिला पाऊस झाला
इकडे अंदाज बांधले जातात होणाऱ्या पावसाचे, पलीकडच्या राज्यात पाऊस अमुक इतका झाला, तिकडे यंदा पाऊस नाही म्हणे, आपल्याकडे भरपुर होणार, उन्हाच्या धगीत लावलेले पावसाचे अंदाज.
मृग नक्षत्र निघून जातं, पाऊस येतो संथ वाऱ्याच्या झुळकी सारखा अन निघून जातो विजेच्या ही अधीक वेगाने, पण ती झुळूक आल्हाददायक असते , आशा वाढवते पावसाच्या.
इकडे कवी लोकांच्या लेखण्या ताठकळून बसलेल्या लिहिण्यासाठी, शेत मजूर त्यांच्या दिवाळीची वाट पाहतात अन स्वप्नांचे मनोरे रचतात. शेत मालकाची लगीन घाई असते, या वर्षी पलीकडल्या उमाटात ज्वारी टाकायची, विहिरीलगत भाज्या लावायच्या, ऊस तोडनी वर पुन्हा ऊस घ्यायचा. गेल्यासाली चांगले धान्य साठलेले होत, यंदा दुप्पट घेऊ. इकडे खतांच्या दुकानावर ट्रक येऊन थबकले असतात. बी बियाणांची उतारणी होत असते दुकानात.
गावातला गण्या चावडीवर यंदा नवीन खत आलंय हे रंगवून सांगत असतो अस की जणु त्यानेच ते तयार केलंय. गण्याची ना जमीन ना तो शेत मजुर पण लोक तोंडात बोट घालून ऐकतात. चावडीवरून वाड्यावर जाताना चौकशी करतात अन तेच खत विकत घेतात.
पाऊस सुरू झाला, गेले 2 ते 3 दिवस तो बरसतोय. आता त्याच्या थांबण्याची प्रतीक्षा कारण वापसा होणे गरजेचं असतं. वाटत पावसानं जरा थांबावं 2 दिवस अन उन्हाला जमिनीशी बोलू द्यावं थोडसं. हट्टी पाऊस ऐकत नाही कधी तर कधी पुरता रुसून गायबच होतो. तसा थांबतो एकदाचा. आता ऊन पडत नाही, पुन्हा कपाळावर आठ्या, एरवी जातीने हजर असलेले रविराज का गायब होतात पण चमकतात अन वापसा होतो. पेरणी होते, पाऊस येतो पिकं निघतात. गण्या जातीनं सगळ्यांची विचारपूस करतो, कसं काय पीक पाणी यंदा, मागच्या वर्षी पेक्षा कमीच आलेलें असतं पण पावसाच्या प्रमाणात चांगलं म्हणावं बाकी काय.
आडतीवर गाड्या लागतात , माल आडत्यांवर पोचतो, येणाऱ्या पावसाच्या प्रतीक्षेत बैलगाड्या गावाकडं निघतात.
शरद पुराणिक
मराठवाड्यातील शेतीची एक जुनी आठवण
निसर्ग परत नाराज आहे
ये रे ये रे पावसा माझ्या मराठवाड्यात ये रे बाबा
🙏🏻🙏🏻
Comments