आज पाय निघत नव्हता ...सप्तरंगी त्या मैफिलीतून
आज पाय निघत नव्हता ...सप्तरंगी त्या मैफिलीतून
जणु सप्तपदी ची वचन घेउन, आधीच वर्षावलेल्या मंत्राक्षता अन उर भरून मिळवलेले आशीर्वाद घेऊन लेक सासरी निघतांना जो दुःखाचा प्रसंग असतो अगदी त्याच भावना.
एक अचानक ठरलेली छोटेखानी सफर आज झोळीत इतकी भिक्षावळ टाकुन गेली की पुढची अनेक महिने ती पुरून उरेल.
पुन्हा कुलूपबंद परिस्थिती होईल अशी मनाची गोंधळलेली अवस्था, बऱ्याच दिवसांनी भेट झाली नव्हती अन गेली कित्येक महिने जे घडलंच नव्हतं ते घडलं आणि सुखाच्या सरीने हे जीवन बहरले. अमोलच्या मित्र प्रेमबंधातून त्याने स्वतः च्या मेहेनतीवर आणि कल्पनाशक्ती वर साकारलेल्या त्या स्वप्ननगरीत ("जल्लोष" आर्यवर्त नगरी) आम्ही 24 तास घालवले. कुठलही पूर्वनियोजन नाही, तयारी नाही आणि ते असं अचानक साजर झालं त्याचा आनंद काही औरच. तस अमोल ने या पुर्वी, आजवर अनेकदा आर्जव करून ही येन केन प्रकारे ते घडत नव्हतं.
अगदी मोजकेच तहानलाडु, भूकलाडू घेऊन आम्ही त्या भन्नाट जागेवर पोचलो. काही वास्तु अशा असतात की तुम्ही तिथे पोचता क्षणी तुमचा सर्व शीण जातो आणि आनंदाच्या लहरी सभोवताल पिंगा घालतात. अगदी समुद्रकिनारी एका सुंदर स्त्रीच्या बटा वाऱ्याच्या तालावर अलगद तिच्या चेहेत्ऱ्या वर झोके घेत, अन त्या झोक्याना ती तिच्या नाजूक बोटांनी सावरत एक झलक दाखवते. अन मग हळूहळू तो परिसर तुम्हाला मोहित करतो आणि स्वत्व विसरून, बेभान देह अनेक आठवनीच्या हिंदोळ्यावर पोचतात. गेल्या गेल्या स्वागत करते ती वास्तू, समोरच एक तुळशी वृंदावन, चौफेर फुलांनी बहरलेला बगीचा. समोरच दोन ढाळज (कट्टे) जिथे जास्त वेळ जातो नेहेमी.
खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर अर्धी वाट केंव्हाच मागे सरलेली, त्याच वाटेवर विरलेली स्वप्नं अन अनेक खाच खळगे याचा कधीतरी मागोवा घ्यायला पाहिजे .. त्या साठीच हे एक व्यासपीठ असतं. अर्ध्यातल पाव आयुष्य एकटा अन नंतर सहचारिणी सोबत. आता ते स्वप्नरंजन आणि आठवांचे डोंगर ती ही सोबत सर करत असते. या साहसी प्रवासात आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या सहचारिणी एक मजबुत दोर होऊन आमची ती गिर्यारोहणाची मोहीम फत्ते करण्यात बरोबरीने आहेत. हे त्रिवार सत्य आहे अन्यथा आम्ही या मोहिमेत कधीच माघार घेऊन कुठेतरी पायथ्याशी विसावलो असतो.
घरच्याच गवती चहात झालेल्या त्या स्वादिष्ट चहाचा आस्वाद घेऊन मैफल सजली अन अनेक राग, बंदिशी, भावगीते, भक्तिगीते, युगलगीत, प्रेम अन विरह गीत अश्या सर्व समेवरून झालेल्या प्रवासाची सुरावट साकार होते. शहरापासून दूर, अगदी कुठलाही आवाज नाही, अन चिरेबंदी त्या वास्तूत मिणमिणत्या दिव्यात प्रकाशमय होत जाणारी ती मैफल .. क्या बात है ...वाह उस्ताद.
आता हा सर्वांचाच अनुभव असतो की या ठिकाणी जे काही खातो ते सर्व इतकं चवदार असतं की त्या चवी कायम जिभेवर राहतात ...तेच पदार्थ असतात पण आज ते वेगळ्या चवीने तुम्हाला तृप्त करत असतात ...त्या तृप्ती साठी माऊली नामक त्या बल्लवाचार्य प्रभूतीचे अनेक आभार. या सोबत जुन्या आठवणींचं लोणचं, जुने किस्से अगदी पापडा सारखे कुरकुरीत त्यात भर घालतात. अन चवदार ताका मध्ये ते सर्व सरमिसळ होऊन एका खुमासदार तृप्ती ची अनुभूती देते.
घड्याळ, वेळ, रात्र याच्या सीमा पार करून होणाऱ्या चर्चा, त्यात सहचारिणीला अजून ही न उमगलेल्या अनेक प्रश्नांची मालिका आणि त्याला तसेच हजरजबाबी विश्लेषण ..कारण त्यांची उत्तरे नसतातच ...असं होतं होत काही ठिकाणाहून हळूच घोरण्याचे किंवा डोळे ताणून ऐकण्याचा प्रयत्न दिसला तर समजाव ही भैरवी अन तूर्तास त्या आनंदलहरि अलगद गोधडी होऊन स्थिरावते ती रात्र ..रात्र कसली दुसरा दिवस सुरू झालेला असतो. पण दुसऱ्या अंकाचा पडदा टाकावाच लागतो. आठवांची ती काजवे त्या वास्तूत चमकत राहतात अधुन मधुन अन उगाच या कुशिवरून त्या कुशीवर ...झोपण्याचा एक अयशस्वी प्रयत्न.
पुन्हा सुरू होतो तोच खेळ ...उष्णोदक...न्याहारी पुन्हा त्या अन्नपूर्णेच्या सेवकाच्या हातून आलेले चविष्ट पदार्थ. खरं तर समोर पोहण्याचा तलाव खुणावत असताना आम्ही त्या ढाळजा खाली अगदी गुळासारखे चिकटलो अन तृप्तीने "कनूप्रिया" या हिंदी काव्य अविष्कारांचे वाचन सुरू केले अन ...वो मैफल "मीरा मोहन" राधे राधे और कान्हा हो गई..किती उत्कट प्रेमाचे ते काव्यतरंग ..शरीर अन आत्म्यापलीकड चे ते जड हिंदी शब्द ...अन एक कविता झाली की शशांक ची गझल ..जगजीत सिंग, खय्याम अन किशोर लता दीदी ही त्या मैफिलीत आल्या ...सदाबहार झाली ती मैफल अशी रंगली की विचारूच नका..मध्येच अमोल ची विशिष्ट दाद, काळी तीन तुम्हाला जमत नाही ... सोबत चित्र अन विडिओ जोडत आहेच..तो सभोवताल अक्षरशः आम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन गेला .वैशु नि या दरम्यान फोटो अन व्हिडिओ उरकुन घेतले.त्या सुरावटीच्या काही लहरी त्या परिसरात पुन्हा सजवत थोडीशी रपेट, वैशुचा गाडी चालवण्याचा सराव ..अन क्षणाक्षणाला होणारे हास्य कल्लोळ ..अनिता अन तृप्तीची प्रेमाची जुगलबंदी ....एकमेकांना किती सांगु अन काय सांगु अशी धावपळ होते .. आज आम्ही उठून साधारण 4 ते त तास झाले होते पण एकाने ही फोन हाताळला नाही, फ़क्त गप्पा, गप्पा अन किस्से ... असं हे सर्व माझ्या भिक्षावळीत मी भरत होत होतो ..
वाईट रविवार दुपार मला माझ्या हैदराबाद परतीच्या प्रवासाची दुष्ट आठवण करून देत होती तसं माझं मन सैरभैर होत होतं अन साली ती घटिका आलीच एकदाची ...
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा
बाबूल की दुआए लेती जा ... अशी माझी अवस्था
आतल्या आत रडणारी मनं.. चमकणारे डोळे अन गहिवरले श्वास घेऊन ..निघालो....त्या सुखद आठवणीच प्रतीक म्हणून भरपूर कडीपत्ता, गुलाब, जास्वंद अन शेवंतीची रोपं माझ्या गॅलरीत ठेवलीयेत ...
शरद पुराणिक
140321
हैदराबाद एक्सप्रेस
Comments