यांतु देवगना सर्वे, पूजामादाय पार्थिविम, इष्टकाम प्रसिध्यर्थंम, पुनरागमनायच ....




 यांतु देवगना सर्वे, पूजामादाय पार्थिविम, इष्टकाम प्रसिध्यर्थंम, पुनरागमनायच ....

 

आणि


इदं पिंड ....,तेभ्य स्वधा :


आजच्या या लेखात कोणाच्याही धार्मिक, वयक्तिक भावना दुखावणे हा अजिबात हेतू नाहीये. 


आज संध्याकाळी चालायला गेलो होतो, गेले काही दिवस नदीपात्रात सतत पाणी होतं आणि रस्त्यावर ही गर्दी असते, म्हणून मी आज नदीपात्र, डेक्कन, कर्वे रस्ता असा मोठं अंतर पार केलं. जाताना एका ठिकाणी अचानक लक्ष वेधले गेले, अनेक दुचाकी, काही सायकली आणि पायी अशी बरेच लोक एकत्र दिसले. 


पाहिलं तर एका चबूतऱ्यावरून अनेक लोक पिंड, निर्माल्य ते ही अगदी प्लास्टिक सहित अक्षरशः नदीच्या पात्रात भिरकावत होते. मी अजून पुढे गेलो तर मन सुन्न झालं. आता गणपतीच्या त्या भंगलेल्या मूर्ती आणि त्यांची विटंबना हे काही नवीन नाहीच. अगदी विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी पासून तसे फोटो आणि हल्ली विडिओ ही येतातच.  त्याचे वर्णन मी पुन्हा इथे करून अजून त्याचा जास्त उहापोह करत नाही, तसे विविध फोटो आठवा आणि कल्पना करा. 


त्याच सिमेंट च्या चबूतऱ्यावर काही पत्रावळी वर वाढलेले अन्न, पत्रावळीच्या पानावर विविध खाद्य पदार्थ, कुठे टोपी त्या वर कुठे हलकासा गुलाल तर कुठे वेगवेगळ्या पुजा असं सर्व इतस्ततः विखुरलेल होतं.  काही अनेक दिवसांपासून तसेच तिथे ठेवली गेल्यामुळे कल्पना करा काय अवस्था असेल. पण मास्क असल्याने ती दुर्गंधी मी अनुभवू शकलो नाही ??😊


वरील दोनीही मंत्र या साठीच मुद्दाम संदर्भ म्हणुन लिहिले आहेत.  तर धर्मशास्त्रात या गोष्टींचा असा अंत करा, विसर्जन करा असे आग्रहाने लिहीले नाही, आणि विविध योग्य पर्याय दिले आहेतच. 


असो या खिन्न मनाने मी चालू लागलो, सहज वाटलं ते गणपती आणि पूर्वजांची पिंड आपसात बोलत असतील का काही ? कोणी गाळात, कोणी चिखलात रुतले आहेत, कोणी दूरवरून येऊन एखादा कोपरा घेऊन मैफल सजवत असतील, अगदी तशीच जशी आमची पेन्शनर लोकं आयुष्याच्या उत्तरार्धात जगलेल्या वर्षांचा लेखा जोखा मांडत, तर काही प्राप्त परिस्थितीत कसं आनंदाने जगता येईल , तर काही जण होणारी परवड आणि खंत एक दुसऱ्या शी बोलत असतील तर अजून काय काय. अनेक विषय आहेतच की. 


बाप्पा येण्याचा तो आनंद, उत्सवातले ते पावित्र्य अन बाप्पाचं होणारं कौतूक, रोज मिष्टान्न, सुगंधी अगरबत्ती, उंची दागिने असा तो बाप्पा .. आणि.मी वरती सांगीतलेल्या चबूतरुयाच्या पायथ्याशी, कुठे हात, कुठे सोंड, कुठे आसन तर कुठे काय या अवस्थेतील मूर्ती. अशा या सर्व बाप्पांची मैफल. ते जरा थकले की, इकडे पितृ पक्ष काळ आला,  काही पूर्वज आलेच, काही तरुण, काही मध्यम वयीन तर काही स्त्रिया असे सर्व, पिंड रुपी त्याच मैफिलीत सजले.


हे सर्व जण मिळुन या सर्व परिस्थितीवर भाष्य करत असतील का ? असा विचार डोकावला,  - पितृ उवाच - आम्हाला स्वर्गातून यथोचित आवाहन करून बोलवलं, दर्भासन दिलं, मिष्टान्न भोजन आणि आवडीचे पदार्थ केले. काही ठिकाणी फार आदराने स्वयंपाक केला, काही ठिकाणी आदळआपट करून झाला.  काही ब्राम्हण घाईने उरकुन घेत होते, म्हणून पोटभर जेवायचे राहून गेले. निदान या निमित्ताने तरी सर्व लेकी बाळींची भेट झाली पण इकडे या रोगाने थैमान घातले  आहे, म्हणून येउ शकले नाहीत. काही आसवं बरसली आमच्या डोक्यावर प्रेमाची, विरहाची. तर काही मनात पुटपुटत होते, साला त्या मास्क अन गुरुजींच्या मंत्रात ऐकू आले नाही.  


गणेश उवाच -  गणपती ने टाळी दिली न बोलले आमच्यावर मात्र या कोरोनाची कृपा झाली.  फार श्रद्धेने आमची ही भेट भक्तांनी पार पाडली, एरवी आम्हाला घरात डाँबून इतर ठिकाणी आमच्या सोयऱ्यांना भेटायला जायचे हे  सर्व.  बाहेर ते भेसूर आवाज अन बीभत्स नाच, झगमगटाच्या या खाईत हौशे, नवसे, गवसे लोकांच्या गर्दीत आम्ही गुदमरून जायचो. मोकळा श्वास तो नाहीच. या वर्षी मात्र सर्व जण घरात होते अन सतत त्यांचा सहवास होता. जे भक्त आले नाहीत त्यांनी ही खूप श्रद्धेने निदान व्हिडिओ वर आमचे दर्शन घेतले. हे झालं 10 दिवसात, पण नंतर या अपेष्टा आहेतच. तरी यंदा आम्ही अनेक घरातच विसर्जित झालो, हे ही नसे थोडके. यातून तरी हे काही शिकतील. पण सरकारी व्यवस्थेने तर पार हाल हाल केले, अक्षरशः मोर्चे न्यावेत गाड्या भरून तसे कोंबून कोंबून नेलं अन दिलं पटांगणावर सोडून, तर काही ठिकाणी पाण्यात.


इतक्यात एक पित्रातले आजोबा म्हणाले हो हो हल्ली आमचे दर्शन ही विडिओ वरच होते, द्या टाळी तुमचं अन आमचं सेम असतं. पण  जगताना उतार वयात यातना, मरण यातना अन नंतर या पिंड अवहेलना याचा उबग आलाय, पण आपल्याच  पिढीच्या भविष्यासाठी हे सहन करतो. आता त्यांना असं वाटत असेल आपण धन्य झालो आणि पितृ दोष मुक्त झालो, पण तसं नाही ...इकडे येऊन पहा आमची अवस्था.


मग एक समाजवादी विचारांचे आजोबा त्यांचा फोन आला, ते म्हणाले आमचं बरंय बाबा ना कर्म, श्राद्ध ना पिंड, अन यांना हिणवू लागले. 


असा तो संवाद चालू होता, 


अरे बाबांनो पण तेच पिंड गाईला खाऊ घाला ती आनंदाने खाते, पूजा व्यवस्थित करून, निर्माल्य वेगळं करून ते ही व्यवस्थित विसर्जित करा. गाईला खाऊ घालण्याचे पुण्य वेगळंच आहे. 


गणेश मूर्ती छोट्या घ्या, घरात विसर्जन करा, ती माती पुन्हा झाडांना घाला. 


नैवेद्य असे रस्त्यावर फेकून काय मिळवता, अनेक भुकेने व्याकुळ जीव आहेत, त्यांना खाऊ घाला, त्याची तृप्ती ही खूप पुण्य देईल. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, निदान अशा ठिकाणी  आणि एवढंच ठेवा की पक्षी आणि प्राणी खातील, ते ही समोर उभं राहून खाउ घाला.


 काका... वो भाऊ, कपडे, प्लास्टिक असे पाण्यात टाकू नका असं काही मुलं जी सायकल वर आली होती ती सांगत होती ते मी ऐकलं अन भानावर आलो. या तरूण पिढीच्या या विचारांचं मी स्वागत करतो. 


मी ही धार्मिक आहे, सर्व विधी करनार,  पण सर्व व्यवस्थित करून त्याचा इतरांना त्रास होईल असं कधीच नाही वागणार


हा संकल्प करून थांबतो


शरद पुराणिक

070920 - नदीपात्र पुणे

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती