कोणी निंदा, कोणी वंदा मित्र, बायको अन पोरांची टिंगलटवाळी हाच माझा धंदा .....
कोणी निंदा, कोणी वंदा मित्र, बायको अन पोरांची टिंगलटवाळी हाच माझा धंदा .....
28 मार्च नंतर आज साधारण एक महिन्यानंतर काही तरी लिहायला घेतलं. खरं तर आजू बाजुची परिस्थिती, बातम्या अन श्वासागणिक असहाय, हतबल होत जाणारी मनाची अवस्था यांतून सुटकाच होत नव्हती. एका न दिसणाऱ्या त्या शत्रूची ही चाल अशी काही चालून आलीये की इतिहासाची अनेक पाने उलटून ही त्याचे संदर्भ लागणार नाहीत. क्षणभंगुर जीवन, आता आहे आता नाही. सर्व अगदीच देवाच्या भरवश्यावर ...पण तो तरी कुठे कुठे पाहणार. शक्य तेवढे अवतार घेतोय, राबतोय आणि त्याच अवतारातून साकारतायेत चमत्कार ही. त्याची अस्तित्वाची जाणीव अजून बळकट करत पुढे सरकतो.
एप्रिल 9 रोजी 3 ते 4 दिवस सुटी होती म्हणून हैदराबाद वरून आलो. आल्या आल्या नेहेमीप्रमाणे "गंगा स्नान" म्हणजे प्रवासाच्या पिशवीसाहित sanitizer शुद्धी आणि कडक स्नान करून पोहे हा शनिवारचा नाष्टा आटोपला. घशात जरा खव खव एवढीच काय ती तक्रार होती. घरगुती उपचार आणि औषधी घेऊन जरा आराम केला ...तो वर डोक्यात positive ..negative चे किडे हळूहळू येतच होते. डॉक्टरांना फोन करुन गोळया घेतल्या. कसेबसे 2 दिवस गेले अन ऐन पाडव्याच्या दिवशी मी जरा जास्तच थकलो, खोकला सुरू झाला....अगदीच दोन तांबे पाणी घेऊन शुचिर्भूत झालो ..एव्हाना निशांत ने देवाची अन गुढीची पूजा ही केली ...मी कसंबसं संवत्सरफल वाचलं, गुढीला नमस्कार केला ....तो वर नैवेद्याची अन जेवण्याची ताट सजत होती ...पण मी या पासून दूर दूर होतो..
जेवण झाली अन अनिता ने आग्रह केला आता आपल्याला दवाखान्यात जायलाच पाहिजे... खरं तर सणाची सर्व तयारी, ने आण त्यात लोकडोउन, निशांत ची अंतिम परीक्षा यात ते एवढे व्यस्त होते... पण एकटा जाण्याची ही हिंमत नव्हती... नेहेमीप्रमाणे तिने कंबर कसली आणि तडक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल...
इथे आवर्जून उल्लेख करतो तो म्हणजे ज्यांना कोणाला अशी प्राथमिक लक्षणं आहेत त्यांनी जवळपास असाल तर दीनानाथ ला च जा, अतिशय चोख व्यवस्था, तपासणी, उपचार आणि तुमचे मनोबल वाढते. सतत डॉक्टर तुमची चौकशी अन मार्गदर्शन करत राहतात. गरज असेल तरच टेस्ट नाही तर औषधांची यादी देऊन 1 ते 2 तासात तुम्ही घरी. कुठलीही फसवणुक, लूट काहीही नाही ...रुग्णसेवा या एकमेव उद्दिष्टाने ओतप्रेत ही मंडळी आहेत.
नाकात काडी फिरवुन माझी चाचणी सकारात्मक आहे असा अहवाल तासाभरात आला ....सोबत सौ अनिता होतीच ...पुन्हा डॉक्टर सोबत व्यवस्थित चर्चा, फक्त 450 रु च्या गोळ्या आणि घरीच दुर राहण्याचा सल्ला घेऊन आम्ही परतलो ....आणि माझा स्वगृही कारावास सुरू झाला...
दुसरे दिवशी सौ अनिता सर्व काम आटोपून घरात चालता चालता अक्षरशः बसली ..लगेच हर्षल, निशांत आणि ते तिघेही पुन्हा दीनानाथ ...तेच सर्व ..आज अनिता ही आता माझ्यासोबत स्वगृही कारावासात आली...एक सोबत म्हणून बरं वाटलं... मुलं negative होती ...आणि भूमिका बदलल्या.
चहापाणी, जेवण देणे, आणि इतर सर्व जबाबदाऱ्या मुलांनी घेतल्या . पण हे जास्त काळ टिकलं नाही. तो वर अनिता तापीने फन फनत होती ...पहिले 3 ते 4 दिवस कसे बसे काढले अन माझा ताप , खोकला एवढा वाढत गेला ...दिवसातून 3 ते 4 वेळेस साधारण 101 ते 104 एवढा ताप..अन हळूहळू त्याने माझी Oxygen level श्वास अन सर्वच विपरीत आकडे दाखवू लागले... ती खोली म्हणजे एक छोटा दवाखाना झाला होता ... oxymeter, thermometer, BP, गोळ्यांचा ढीग अन घरगुती उपचार ...एक रात्र अनिता पूर्ण माझ्या डोक्यावर पट्टी ठेवून तापमान कमी करत होती. खरं तर ती स्वतः ही यातूनच जात होती, पण माझी अवस्था पाहुन ती सर्व सोडून संपूर्ण माझ्या सेवेत दौडली....20 April ची ती रात्र ...मी पूर्ण अस्वस्थ, झोप तर 4 ते 5 दिवस नव्हतीच, ताप उतरत नव्हता ..चालून श्वास घेऊन एक एक क्षण मी ढकलत होतो ...अनिता हिंमतीने साथ देत होती ....या सर्व दरम्यान रोज अनेक स्तोत्रे, अष्टक असं ऎकत होतोच ... त्यात सर्वात फलदायी किंवा मला ज्याने सर्वार्थाने बळ दिले ते म्हणजे " "अशक्य ही शक्य करतील स्वामी" ...मी एकदम उठुन बसलो किंवा कोणी तरी उठून बस म्हणलं आणि मी तडक उठलो ...अनिता हे सर्व पाहत होतीच पहाटेचे 3 वाजले होते ..कसेबसे 2 तास काढून 5 वाजता मुलांना उठवलं ...वाहन काढुन तडक दीनानाथ गाठलं.
इथे पुन्हा आवर्जून उल्लेख करतो, अशा वेळी फक्त इथेच जा, गेल्या गेल्या अगदी 15 मिनिटात मला oxygen मिळाला... इथली ही व्यवस्था एक दिव्य आहे, बाहेर खुर्चीवर बसवून एकावेळी 10 ते 15 लोक oxygen घेऊ शकतात अशी तातडीची व्यवस्था आहे. लगेच उपचार सुरू होतो, पैशासाठी आर्जव नाही, अडवणूक नाही ..प्रेमपूर्वक वागणूक देतात. इथेच मी माझी अर्धी लढाई जिंकली होती.
मी उपचार घेत खुर्चीत होतो तर अनिता रूम आणि बेड साठी झगडत होती, सोबत निशांत अन हर्षल. आणि अहो आश्चर्यकारक रित्या 40 मिनिटात मला बेड मिळाला, सुरुवातीला बेड मिळेल की नाही अशी परिस्थिती होती पण अनिता, निशांत अन हर्षल ने मागणी लावूनच धरली... तातडीने उपचार ही सुरू झालें...नाष्टा, जेवण, चहा अशी माझी चोख व्यवस्था लाऊन अनिता अन मुलं खाली स्थिरावली होती... जी स्वतः positive असताना ते सर्व विसरून कशी हे सर्व घडवून आणते याचं कायम आश्चर्य आहेच ...कुठली ती शक्ति आणि प्रेरणा ...hats off
नंतर मला सतत दोन दिवस ताप 104 ते 106 येतच होता ..पण मग पोटात, दंडात सर्व शक्य ठिकाणी सुया टोचून तो 3 दिवसात उतरला...
डॉक्टर विष्णुदास तेलभरे माझ्या खोलीत अवतरले आणि अगदी काहीच नाही असं समजावत धीराने मला तपासलं... सोबत सहायक ज्यांच्या tab मध्ये आपली सर्व माहिती ..No paper ...सुरुवातीला 8 लिटर oxygen ने सुरुवात करुन ती मात्रा हळूहळू 2 लीटर वर आणून तिसऱ्या दिवशी थांबवली .. या दरम्यान डॉ विष्णुदास सर रोज, माझ्याशी, कुटुंबातील सदस्यांशी फोन वर व्यवस्थित मार्गदर्शन करून नैतीक बळ देत होतेच. मी 10 व्या मजल्यावर होतो ...सर्व मजले हे डॉक्टर अंगात चार चार कपडे, ट्रिपल मास्क, कॅप आणि सतत बोलणं, चर्चा अगदी रुग्णाच्या बाजुला जाऊन, एक दोन वेळा त्यांनी स्वतः माझा oxygen मास्क ठीक केला. एवढे कष्ट घेतात... ही फारच चांगला व्यक्ती, साधी सोपी भाषा, पूर्ण चर्चा करणार आणि प्रेमाचा वर्षाव अर्थात शद्ब गोंजारून धीर देणे.
या सर्व प्रकारात माझे मित्र, ऑफिसचे लोक, आस्थेवाईक, घरची मंडळी भाऊ, बहीण, वहिनी, सासरचेजवळचे सर्व नातेवाईक.. शेजारी पाजारी , अनिताच्या मैत्रिणी,
अशी सर्व मंडळी या प्रक्रियेचा भाग झाली होती. या पूर्वीही ही मी अनेकदा उल्लेख केलेलाच आहे तो म्हणजे माझा मित्र परिवार ...मी स्वतः ला भाग्यवान समजतो की इतका मोठा मित्र परिवार आहे ...कदाचित या भूमंडळावर या बाबतीत माझ्या इतका श्रीमंत व्यक्ती कोणी नाही, याचा मला अभिमान, गर्व आहे. प्रत्येकाने आवर्जून हक्काने चौकशी, मदतीसाठी ची कुठलीही तयारी, धीराने मार्गदर्शन, चर्चा आणि ती उगाच दाक्षायनी नाही तर आतून. मला बोलणं जमत नसल्याने त्यांचे तिघांचेही फोन सतत खनखनत होते. इतकी नावं आहेत याचा उल्लेख केवळ केवळ केवळ अशक्य आहे. आयुष्याच्या या लेखाजोखित माझी ही बाजू केवळ भक्कमच नाही तर अभेद्य आहे...तीच माझी पुण्याई आणि हाच माझा पुण्यसंचय आहे... मी स्वतः च त्याची काळ्या बिब्याने दृष्ट काढून अलगद ठेवतो.....आज 3 आठवडे झाले पण आज ही रोज चौकशी, काय हवं नको काय नको हे विचारतातच. मातोश्री ही सतत काळजीत होत्याच अन औषधांची यादी सुरूच होती. निशांत अन हर्षल विभागणी करून दिवसभर तिथे थांबायचे... अनिता पोसिटीव्ह असल्याने तिला त्यांनी मज्जाव केला होता ....अन ती एकटीच घरात...जिथे स्वतः ची पूर्ण काळजी घेत 15 दिवस काढायचे, व्यवस्थित खाणं पिणं करायचं, तिथे ती माझ्या काळजीत, येणाऱ्या फोन वर बोलत, सर्वांना माहिती देणे, आणि इतर व्यवस्था यातच गुंतली होती ..तेच मुलांचं होतं ...इकडे आई, तिकडे मी औषध ने आण, माझे कपडे पोचवणे, दवाखान्यात संपर्क अशा अनेक भूमीकातून जात होते आणि त्या बरोबरच online exam, class अंतिम परीक्षा ....किती ही परीक्षा रे देवा ....
आता मीच माझा हरवलेला श्वास त्या माशीनमधून ओढून पून्हा माझ्या शरीरात स्थिरावला होता...36 तास oxygen न लावता माझी पातळी योग्य प्रमाणावर आली ताप शमला होता पूर्णतः , खोकला होता..अन मला घरी सोडण्याचे नक्की झाले..."...आनंद पोटात माझ्या माईना ग आनंद पोटात माझ्या माईना..."
आठवडाभराची औषधे घेऊन मी 26 तारखेला घरी आलो ...पुन्हा 7 दिवस विलगीकरण जे परवाच संपलं...
स्वतः च्या आवाजात एक video करून पाठवला सर्वांना कारण फोन वर जास्त बोलता येत नाही...
निर्धास्त राहा, काळजी करू नका
सर्वच सांगतील ती औषधी घेऊ नका
प्रत्येकाची तब्येत वेगळी असते
घरगुती उपचार ही सिमीतच ठेवा
नाही तर घर एक प्रयोगशाला होईल
(अन पोटात तर सर्व चित्र दिसतील,
काढे,लिंबू, चाटण, पुड्या, काड्या)
फ़क्त आणि फ़क्त डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्या
कायम सकारात्मक विचार ठेवा
श्रद्धे नुसार शुद्ध सात्विक अध्यात्मिक विचार
ज्ञानभक्ती युक्त कर्मवीर व्हा
पराक्रमी पुरुषार्थी धर्मवीर व्हा
निशंक होई रे मना
निर्भय होई रे मना
अशक्य ही शक्य करतील स्वामी
आपलीच लढाई, आपणच जिंकायची
हे स्फुरण देऊन इतरांना ही जिंकवायचं
हाच माझा दिव्य अनुभव ....
पण या रणांगणात असंख्य योद्धे तुमच्यासोबत
प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष असतात तीच खरी शक्ती
आणि तेच खरे बळ
जय हो
शरद पुराणिक
020521
Comments