हे खरे सहस्रचंद्रनाधिष्ठित ...अमृत महोत्सवी व्यक्तिमत्व


 हे खरे सहस्रचंद्रनाधिष्ठित ...अमृत महोत्सवी व्यक्तिमत्व

82 वर्षे वयाचा angry young हिरो ...


या विषयावर मी पूर्वी 23 एप्रिल 2019 रोजी लिहिले होते. पण त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख आणि संदर्भ राहूनच गेले..परवा पुन्हा एका वेगळ्या चष्म्यातुन त्यांचे भावदर्शन झाले... ते उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माझ्या बहिनीचे सासरे श्री अरविंद कृष्णराव भगूरकर.  कदाचीत लिहिण्याच्या ओघात काही संदर्भ पुन्हा येतील. 


माझ्या दिवाळीच्या आनंद यात्रेतील लिखाणात मी लिहिलेच की अत्यंत भावुक दर्शन मला त्यांचे झाले. खरं तर मी ही खूप गहिवरलो होतो, पण हा सण दिवाळीचा..त्याचा आनंद वाटण्यासाठी आपण इथे असताना ही दुःखाची झालर नको म्हणुन ते हुंदके तसेच रोकले. पण माझ्या परतीच्या प्रवासात त्यांचा तो भावनिक चेहेरा सतत डोळ्यासमोर येतच होता. 


दादा म्हणजे जगण्याची उमेद, उत्साह, ऊर्जा. एक सर्वार्थाने संपन्न, आदर्श व्यक्ती. कुठल्याही पाठबळाशिवाय स्वतः ची कुटुंबात, समाजात आणि धार्मिक पातळीवर एक चांगली ओळख त्यांनी निर्माण केली. रोज पहाटे 3.30 ते 4.00 या वेळेत उठणार, आणि काही मिनिटात शुचिर्भूत होऊन दिवसाची सुरुवात होते. अध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ अस विविध वाचन. धर्म सिंधु तर अक्षरशः त्यांना मुखोद्गत आहे. कागदावर लेखणीतून मोती बरसावेत इतकं सुंदर अक्षर.  आरोग्य संचालन विभागातून उच्च पदस्थ निवृत्त अधिकारी.  असे इह कागद संपतील एवढी गुणवत्ता त्यांच्या कडे आहे. 


दादांकडे 42 वर्ष पुर्वी घेतलेली एक राजदूत मोटारगाडी आहे, ती परवाच शौनक आणि त्यांनी मिळून अगदी नवी कोरी करून आणली. आणि तिला अक्षरशः नव्या बुलेट गाडीचा लूक दिला. आयुष्याच्या या वळणावर नातवंडांना फक्त रागावणारे किंवा एक काठी, माकडटोपी, अन अंगाचा काटकोन करून , भिंगाच्या चष्म्यातून TV समोर दिसणारे लोक कुठे, अन आमचे दादा  पहा अगदी पंचवीशीतला डॅशिंग हिरो दिसावेत आशा रूबाबात वावरतात. दादा तुम्ही असेच हवे आहात कायम. त्यांचा तोच फोटो सोबत पाठवत आहेच.


याच अनुषंगाने एक आठवण - त्यांचा भाऊ अचानक गेला. ऐनवेळी कसं जावें हा प्रश्न सतावत होता, जालण्याला जायचं होतं. दादांनी त्यांची आरोग्य विभागाची ती भली मोठी गाडी (matador वजा एक मिनी बस) घेतली, स्वतः स्टेअरिंग वर बसले अन आम्ही तासाभरात तिथे पोचलो. उतरता क्षणी तिथल्या संपुर्ण परिस्थितीचा ताबा घेऊन पुढील सर्व कार्य यथायोग्य उरकून आले. असे किमान हजारो प्रसंग मग ते दुःख, आनंद, आजार अशा स्वरूपाचे त्यांनी असे चुटकीसरशी हाताळले. 


अगदी महेशराव (माझे जिजाजी) यांचे क्रियाकर्म या साठी पैठण ला जायचे होते, सतत 4 दिवस. एक दिवस माझी कार बंद पडली होती. दादांनी लगेच शेजारील omni van काढली आणि चला म्हणाले, मीच आग्रह करून त्यांना बाजूला केलं आणि गाडी चालवली.  यात त्यांना दुःख नव्हतं असं नाही, तर दुःखाला कवटाळून कर्तव्याला बगल देणे हा त्यांचा स्वभाव नाही. असे एक ना अनेक प्रसंग आहेत जे मी अनुभवले. ते ही एवढ्या दुरून. 


आजही घरचं कोणी गावाला जाणार असेल तर त्यांना ते स्वतः बस स्टँडला, स्टेशन ला सोडायला आणि घ्यायला जातात. यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही. लोक कदाचित याला चिकट पणा असं ही म्हणतील, पण मला त्यांची आपल्या माणसांची काळजी यात जास्त दिसते.  अगदी सई माझी भाची परवाच दहावी पास झाली, तिच्या संपूर्ण परिक्षेत रोज सोडणे, आणणे त्यांनी केले. तस शौनक किंवा सविता हे अगदीच करू शकले असते ..पण ती माझी जबाबदारी आहे आणि तह हयात मी ती पेलणार ही त्यांची स्वतःचीच स्वतः ला घातलेली शपथ असेल कदाचित.  एवढंच नाही तर नातवंडांना त्यांच्या शैक्षणिक उपक्रमात मदत, काही वर्षांपूर्वी पर्यंत किंवा आता ही अगदी गणवेशाला इस्त्री ते गृहपाठ असं ही केलं आहे. काकूंनी ही जबाबदारी पार पाडली. ज्या वयात यांनी निवृत्त होऊन जगण्याचा खरा आनंद घ्यायचा त्या वयात हे असं सर्व काही करतात. एक मुलगा चांगल्या हुद्द्यावर आहे, दोनीही सुना खंबीर आहेत,  आणि इतर सर्व जगन्यासाठीच्या गोष्टी .संपत्ती, घर, दार, शेती अशी सर्व सुख अक्षरशः पायाशी लोळण घेत आहेत तरी हे स्वस्थ नाहीत. ही त्यांची जगण्याची उर्मी मला फार भावते.  या वयात ही औरंगाबाद ते मुंगी (पैठण) शेतीला दुचाकीवरून सोबत शौणक ला घेऊन जातात. तिथेही हे त्या लोकांचे हे कैवारी होतात, अनेकांच्या समस्यांचे निवारण करतात. 


मनाच्या एका कोपऱ्यात ते खूप हळवे आहेत हे मी पाहिलंय.. स्वतः च्या लग्नाचा कोट आज ही त्यांनी जपून ठेवलाय, ते अगदी दोनीही मुलांचे छोटे छोटे चहाचे कप, अनेक अशा असंख्य वस्तू.  अगदी एक ताट जे त्यांना घरातुन नोकरीसाठी बिर्हाड घेउन बाहेर पडले, तेंव्हा वडिलांनी दिलेले ते वाडीलांच्या हस्ताक्षरातील कविता, डायरी..काही आठवण तर काही संदर्भ म्हणुन.


दांडगा उत्साह आणि निःस्वार्थ भाव त्यांच्या ठायी असल्याने मदतीसाठी धावताना पुढचा मागचा विचार ते अजिबात करत नाहीत.  या त्यांच्या स्वभावाचा अनेकांनी गैर फायदा ही खुप घेतलाय, मी ही त्यांना या विषयावर बोललो. लोक आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घेतात हे ही मी त्यांच्या लक्षात आणुन दिले. पण ते फक्त हसण्यावारी नेऊन विषयाला बगल देतात. या मुळे काही लोकांना ते खुप आपले वाटतात इतके ती त्यांचे खरे आपले लोक ही नाहीत असं भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न किंवा ते कसे आमचे आहेत हे दाखवण्याचा असुरी आनंद. पण या सर्वांना खरे दादा कळलेच नाहीत असं मी म्हणतो. 


अनेक लोकांना त्यांच्या विषयी एक तक्रार आहे, ती म्हणजे त्यांची कडक शिस्त. पण  हीच शिस्त त्यांच्या जगण्याचं प्रमाण, कारण, आणि रहस्य आहे.. हे ज्याला कळालं त्याला ते कळले असं मी म्हणेन. अनाठायी खर्च, ताटात अगदी एक शीत ही वाया न घालवणे, सकाळी लवकर उठणे, वेळेच्या आत सर्व काम आटोपून चांगलं वाचन, चर्चा या विषयी कोणाला तक्रार असेल तर मग अर्थ नाही.


हल्ली अनेक कार्यक्रम होतात, कोणाची एकसष्टी, सहस्त्र चंद्र दर्शन, आणि काय काय. काही लोक तर फक्त त्या वयात येतात म्हणून ते सोहळे होतात.  असे सोहळे आणि स्वतः चा डाम डौल दादांना अजिबात आवडत नाही. स्वतः चा अगदी वाढदिवस साजरा करणे त्यांना आवडत नाही. अशा या दादा नामक संस्थानाचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा ते कधीही करू देणार नाहीत, अन त्या साठी ते तयार ही होणार नाहीत. म्हणून हा लेखन प्रपंच आणि हेच खरे सहस्रचंद्रनाधिष्ठित.. हेच खरे अमृत महोत्सवी व्यक्तिमत्त्व.  तसं प्रत्येकालाच आपले आई वडील  हिरो वाटतात ...पण काही व्यक्ती या सर्वार्थाने त्या योग्य असतात, परिपूर्ण असतात.


अशा या  उत्तुंग शिखराकडे मी कायम मान वर करून, हात जोडून सतत न्याहाळत राहणार ...प्रत्यक्ष भेटीत नतमस्तक होऊन माझ्या या जाणिवा त्यांच्या चरणाशी ठेवणार ...आणि अंतःकरणातुन देवा कडे त्यांच्या उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य साठी प्रार्थना करून ...थांबतो..अजून किती ही लिहू शकतो पण वाचनारे थकतील....


"आयुष्याच्या मॅरेथॉन मधले हे अजिंक्य, अभेद्य, सुवर्णपदक विजेते" 


शरद पुराणिक

291120

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती