कोण होतास तु ....,काय झालास तु ...
कोण होतास तु ....,काय झालास तु ...
परवाच्या हैदराबाद पुणे प्रवासात एक रहस्यमय व्यक्ती सहप्रवासी म्हणून भेटली आणि त्या क्षणापासुन मी अस्वस्थ आहे...आपण अनेक अशा व्यक्ती पाहतो की जे यशाच्या उंच शिखरावरून इतके खाली येतात की त्या नंतर त्यांचं अस्तित्व अगदी नगण्य, शून्य किंवा अगदी नाहीच. कुठेतरी प्रचंड केस वाढवून, अंगावर मालिन कपडे आणि विचित्र दिसणारे हे लोक ....पण यांच्या आत खुप शिजवुन शिजवुन थिजलेलं अन काळं ठिक्कर पडणारं जगणं....यात काही तरतात, काही स्वतः ला संपवतात तर काही जबाबदाऱ्या संपवुन हे असं जगत राहतात...
त्याला अनेकदा नाव विचारण्याचा प्रयत्न केला, सांगितलं नाही, अगदी चार्टवर जाऊन त्याचं नाव ही पाहिलं तर दुसऱ्याच्या तिकिटावर मी प्रवास करतोय असं बिनदिक्कत सांगून म्हणाला तुम्ही टी सी ला सांगितलं तरी हरकत नाही. या सर्वां पलीकडे तो फार अगोदरच पोचला होता ...त्यामुळे भीती वगैरे त्याच्या सावलीलाही नव्हते...
एका सुखवस्तु मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेला...चांगल्या संस्कारात वाढलेला अन जगतांना काहीही अपेक्षा न ठेवत तसाच सुसाट जगत होता. तुझं माझं कधी केलं नाही... आले ते सर्वस्व आपलेच अगदी घरचे दारचे सगे सोयरे सारे.. स्वतःसाठी कधी जगलाच नाही जणु. इतरांना मदत करत अन त्याच आनंदात स्वतः चे सुख शोधत तो जगत गेला... अनेकांना जगण्याचे मार्ग शोधून देऊन त्यांच्या जगण्याचा आधार झाला... कित्याकांचे विवाह ही जमवले .. हे करत असताना घरच्या ही सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तो यशस्वी मार्गस्थ होत होता ...वयोमानानुसार विवाह झाला...सुंदर सहचारिणी ही मिळाली अगदी याच्या सारखीच ..अगदी पाणी तेरा रंग कैसा ...इतके एकमेकांत समरस झालेले ....सुंदर मुली ही दिल्या देवाने पोटी अन आता याचा संसार सर्वार्थाने बहरला.. याच्या व्यवसायात ही तो अग्रेसर होता...स्वतः च निर्माण केलेल्या राज्यावर तो हुकुम करत होता.. पण जगराहाटी अन जळणारे लोक यांचा डावा डोळा याच्या या लकाकनाऱ्या आयुष्यावर पडला ...पण हा डगमगला नाही.. तसाच मार्गस्थ होत होता ..याच दरम्यान घर झालं ...अन हळूहळू कर्जाचे डोंगर आकार घेत होते.... मुली ही उच्च शिक्षणासाठी तयार होत होत्या ...पण कधीच व्यावहारीक बाजूने आयुष्याकडे न पाहिल्याने आज जाणवलं की आपली हुंडी रिकामीच आहे. जगताना इतरांना केलेली मदत...घेतलेला आनंद या वलयांकित चमकदार आयुष्यात ही महत्त्वाची रेष कधी दिसलीच नाही ...किंबहुना त्याचं महत्त्व त्याला कधी कळलंच नाही ..त्या चमकदार उजेडात अनेकांचे संसार उजाळले, बहरले..पण आता ती दडलेली रेघ पुसटशी वर वर येत होती ..या दरम्यान त्याच्या या सहप्रवासातले अनेक छोटे मोठे फार पुढे निघून गेले इतके की आता याला तिथे पोचणे केवळ अशक्य वाटू लागले ...खरं तर प्रचंड ऊर्जा, बुद्धिमत्ता, हुशारी आणि संपर्क असा अनमोल खजिना याच्या कडे असताना या टप्प्यावर ही झालेली हार किंवा अपयश आता याला बोचत होतं. ती उद्विग्नता आणि विचारांची घालमेल जगणं असह्य करत होती. पण खंबीरपणे आधार असलेली सहचारिणी त्याचा एकमेव आधार, सहारा, मार्गदर्शक आणि जगण्याची उमेद होती..
जसं कळत होतं तसं ज्या ज्या लोकांना याने अक्षरशः आयुष्यात उभं केलं, कित्येकांसाठी स्वतःच्या सुखाची होळी करून त्यांना ऊब दिली अन प्रकाश टाकला ते आज कोणीच आज याच्या मदतीसाठी, किंबहुना फ़क्त मानसिक आधार ही म्हणुन समोर आले नाहीत. स्वतःच्या नावावर कित्याकांना कर्ज घेऊन दिले, लग्नकार्यात झोकून दिले, इतकंच नाही तर कित्येकांच्या आजारात साथ दिली अगदी बिल भरण्यापासून ते नंतर घरी आणुन उपचार देणे. अनेक तुटणाऱ्या घरांची भिंत ही झाला...तेच घर त्याच्यावर कोसळुन त्याचे खच्चीकरण ही झाले अनेकदा... लहान मोठं असं कधीही पाहिलं नाही अन मान अपमान तर याच्या मनालाही शिवले नाहीत कधी ...पण त्याला आज कळत होतं आपला फक्त वापर झालाय ...ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो त्यांच्या साठी सर्व करताना कधीच स्वार्थ का कळला नाही ...किती बेमालूमपणे लोक ते विसरतात ...कित्येकांना अक्षरशः पोसलंय आपण...त्याना काय दोष द्यावा... आपलीच जगण्याची रीत आपल्याला आयुष्याने आशा विचित्र आरशाने दाखवावी ...तो आरसा पुर्वी का भेटला नाही ..कदाचित आज चित्र वेगळं असतं निदान . हे सर्व ती व्यक्ती जेंव्हा सांगत होती तेंव्हा त्याच्या त्या ओशाळ, ओंगळवाण्या आणि वाढलेले केस , मळकट पेहराव याच्या आडून त्याचा तो तजेलदार प्रवास सहज डोळ्यासमोर येऊन गेला ...गाडी आता जेवणासाठी थांबणार होती ...मला ही फार भूक नव्हती पण जेऊ निदान जेवताना अजून चर्चा होईल ...पण एवढ्यात हा बहाद्दर गायब झाला तो काही वेळाने परतला... जेवलो असं खोटं सांगून तो पुन्हा तेच करत होता ज्या मुळे त्याची ही अवस्था झालीये..
पुन्हा आम्ही त्या अद्भूत विषयावर बोलत होतो ...दोनीही मुलींची लग्न झाली..त्याची परिस्थिती नव्हती पण मुलींनी शिकून, नोकरी करून स्वत:च स्वतः च्या लग्नांची व्यवस्था केली ...अन ही गोष्ट याला जास्त बोचत होती ...आपण अमाप संपत्ती आणि आनंद इतरांच्या कार्यात अक्षरशः उधळून आज त्याचीच धूळ आपल्या अंगावर आहे .. अन याच धुळीत आपण मलिन झालो आहोत ...त्या काळी ज्यांनी सावरलं स्वतः ला, मर्यादा घातल्या जगण्याला ते आज या वळणावर गतीने आपल्याला मागे टाकून त्या वाटेवर ची धूळ, चिखल आपल्या अंगावर टाकुन जातांना होणारे दुःख याला अजिबात सहन होत नव्हतं..ज्या सहचारिणीने आयुष्यभर स्वतःचा आनंद बाजूला ठेऊन, अपार कष्ट करत साथ दिली, त्या बोथटलेल्या हातांना, अन थकलेल्या शरीराला निदान सुखांची झालर लावून अन आनंदाची मलमपट्टी करून त्या सुरकुत्या अन ते दुःख झाकळू... किमान अपेक्षा ही तो पुर्ण न करू शकल्याने तो अति उद्विग्न होता ...मुलींनाही तसंच ऐन आंनद लूटन्याच्या वयात त्यांना नोकरी करुन स्वतः साठी आणि आमच्यासाठी कष्ट करावे लागले ही भावना अजून जास्त त्रास देत होती.... मी अनेकदा त्याला समजावून सांगितले, अनेक उदाहरणे दिली.... Be positive वगैरे ...पण स्वतः च तो उच्च शिक्षित असल्याने त्याला त्याच काहीच विशेष वाटत नव्हतं ...त्याच्या स्वतःच्या अनेक "management quotes" ,होत्या ...पण त्या अशा स्वतःवर च लागु होतील याची त्याला कल्पना ही नव्हती ...न राहवुन विचारलं की आता कुठे निघालात ...तो म्हणाला माहीत नाही ...आता भरपूर रात्र झाली म्हणुन मी जरा पडलो ...खरं तर प्रवासात मला कधीही झोप लागत नाही पण परवा जरा पडलो .. काही वेळाने उठून पाहिलं तर ती व्यक्ती नव्हती ...आजूबाजूला चौकशी केली तर मधेच कुठल्यातरी स्टेशनवर तो उतरला होता .. त्याला या प्रवासात जे हवंय ते मिळो आणि त्याचं ते वैभव परत मिळो ही भावना व्यक्त करून थांबतो ....
शरद पुराणिक
07032021
Comments