लातूर भूकंप

 एक खूप जुनी जखम आज खाजवली , अर्थात जुनी आठवण 


लातूर भूकंप


जेवणं खाणं आटोपून थकलेले लोक निद्रिस्त झाले, उद्याची स्वप्नं उराशी घेऊन, उद्याचे कार्यक्रम डोक्यात शिजायला घालतच लागलेली झोप. झोप आता साखर झोप झाली - अचानक सारी स्वप्ने ठेचून निघाली, गाडली गेली त्या काळरात्री.


भूकंप का झाला त्यामागची कारणं शोधणं तसं नंतरचं काम, पण तो झालाय, एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय की त्याचा व्यास  आणि क्षेत्रफळ लक्षात येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. 


विज्ञान कितीही पुढे गेले तरी नैसर्गिक आपत्तीला कधीच कोणीही थांबवू शकत नाही. १०००, २०००,....४००० अगदी ठार मेले, चेंगरून मेले, ठेचून गाडले गेले स्वतः बांधलेल्या घरांच्या भिंती अन छताखाली. पै पै जमवून बांधलेली घरच अंगावर कोसळली अन जीव घेऊन गेली मालकाचा. किती कठोर असावी ती नियती अन का हा खेळ खेळावा भोळ्या भावड्या जीवांशी.


शहरांना काहीही झालं नाही, नुकसान झालं ते ग्रामीण भागात. रोजंदारीवर काम करणारे शेतमजूर, कारखान्यातले कामगार, आपल्या जमिनीवर थोडंस पीक काढून जगणारे लोक राहायचे या भागात.  आता तो भाग म्हणे नकाशात सुद्धा नाही. सांगणं फार सोपं वाटतंय, पण कुठे पूर्ण परिवार, कोणाची आई, बहीण, भाऊ, वडील, काका काकू अशी एक ना अनेक नाती गाडली गेली मातीच्या ढिगाऱ्याखाली. त्यात जे जगले आणि भानावर आले तेंव्हा काय मनस्थिती असेल? नुसत्या कल्पनेनं मनात काहुर उठतो. दोन दिवस झाली कोणी जेवत नाहीये, रात्रीची झोप पार उडून गेली भयाच्या खाईत, पण ज्यांनी हे प्रत्यक्ष अनुभवलं त्यांचं काय ? कोणाच्या सुना येणार होत्या तर लेकी सासुरवाशीण होणार होत्या ते सर्व धुरळा झालं.


दुर्दैवाने जे गेले ते तर गेलेच, पण सुदैवाने जे बचावले त्यांचं काय, कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं अन कसं ? असंख्य प्रश्नांची मालिका. कुठे रहायचं कारण सर्व जमीनदोस्त झालंय, नव्याने जगण्याची उमेदच नाही. 


मदतीचा पूर आलाय, राज्या राज्यातून, देशा देशातून, माणूस न माणूस मदतीला धावून गेलाय, पण तो घ्यायला कोण उरलाय, नाही कोणीहि नाही. सेवाभाव आणि सहानुभूती पोटी वाट्टेल ती आणि वाट्टेल तेवढी मदत करतात, ती काळाची गरज असते. अशा प्रसंगातून होते माणुसकीचे दर्शन, मानुसकीचा ओलावा. कोणी काही म्हणा, ती अजून जिवंत आहे. 


2 ऑक्टोबर गांधी जयंतीला लातूर जिल्हा 100% साक्षर जिल्हा घोषित होणार होता, त्याच जिल्ह्यातले हजारो जमीनदोस्त झाले, ज्यांनी यांना साक्षर केले, जे साक्षर झाले ते सारे या खाईत गेले. देशभरातील सारेच आनंदाचे सोहळे थांबवले गेले, पुढे ढकलले. आज थांबले तरी ते उद्या होणार आहेत.


आता पुनर्वसन कार्य सुरू आहे, शासकीय यंत्रणा हिरीरीने कार्यरत आहे ...इकडे काही हौशे, नवशे, गौसे मृतांची शरीर लुटून अंगावरची दागिने, आणि अस्ताव्यस्त संसारातून मिळेल ते ओरबाडून नेत आहेत. काही विद्वान तर आलेली मदत जशी च्या तशी लुटत आहेत, मदतीचा ओघ इतका प्रचंड आहे की तिचे मोजमाप करण्याची यंत्रणा कमी पडते आहे. 


पुनर्वसन होइल, मदत मिळेल, लोक पुन्हा जगणं सुरू करतील ही, पण निर्माण झालेली नात्यांची संबंधांची पोकळी, मोडलेले संसार, सर्व जे त्या जमिनीत गाडले ते कधीच परत येणार नाही.


निसर्गा तू जितका चांगला आहेस

तितकाच दुष्ट आणि वाईट आहेस


तू वाहतोस कधी

तू वाहून नेतोस कधी

तू बुडवतोस कधी


तू हसवतोस अनेकदा

तू रडवतोस एकदाच

एव्हढे की आवाज बंद होतो


तू निवारा देतोस असंख्य वेळेस

पण एकदाच बेघर ही करतोस असंख्य


तू काय आहेस तूच जाणे

तुझ्या समोर कुणा कुणाच ही चालत नाही रे बाबा


शरद पुराणिक

स्थळ - लुपिन औरंगाबाद

ऑक्टोबर 1993

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती