धुमशान लगीन... जल्लोष ...अगग...नुसता राडा .
धुमशान लगीन... जल्लोष ...अगग...नुसता राडा ..
परवाच लिहिलेल्या वेदनादायक लेखानंतर आज हा एकदम सुखावणारा अनुभव लिहिण्याचं मीच कबूल केलं होतं... तस शब्दाला जागतो ...
काही सिनेमे जशे सुपरहिट असतात, अगदी कथानक, संगीत, पात्र, प्रसंग तसंच हे लग्न आमच्यासाठी. माझा पुतण्या सागर पुराणिक याचा हा अविस्मरणीय विवाह सोहळा... तो त्याच्या पेक्षा आम्हीच जास्त साजरा केला, मिरवला, अनुभवला...ते म्हणतात ना बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना... अगदी तसच. आणि या सर्व यशाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर विशाल-दिपाली या जोडीला. उत्साहाचा आणि ऊर्जेचा पावरहाऊस. ज्यांनी हा सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला. खरं तर छोट्या भावाच्या अन दिराच्या लग्नात स्वतः ला अक्षरशः झोकून यांनी जो आनंदाचा भंडारा उधळला त्याचे लोट उंच उंच आकाशात उडाले अन आम्ही ते क्षण आणि ती उधळण वेचुन अलगद साठवली... आतल्या कोपऱ्यात. अगदी जेजुरीला किंवा जोतीबाला जाऊन जसे पिवळे अन गुलाबी न्हाउन जातो तसंच.
एक तर कोरोना चे निर्बंध, त्यात कोणाला बोलवायचे कोणाला नाही या आणि अशा असंख्य प्रश्नांची वलयांकित मालिका. नेटकं नियोजन आणि त्या नेटकेपणाने झालेला सोहळा फार सुखावुन गेला. एक तर गेली एक दोन वर्षे या लग्नाचा विषय, चर्चा आणि इतर प्रसंग सुरुच होते. त्यात आमच्या पोरांना ही मज्जा येत होती.. मग आपण हे करू, ते करू असे अनेक मनोरे रचुन झाले, कधी destination wedding करू तर कधी lawns ला करू ...पण मधेच हा कोरोना कडमडला अन स्वप्नांची होळी केली... जसं हे लग्न ठरलं त्या नवरदेव नवरी पेक्षा ही मंडळी जास्त सुसाट सुटली अन त्यांच्या या सुटण्याला विशाल अन दिपाली अजून अजून हवा भरवुन त्याचा आवेग वाढवत होते... मुळातच या दोघांच्याही चेहेऱ्यावर गोड हसु, मायेचा भरगच्च बटवा अन लडिवाळ पणा त्यामुळे सर्व जण त्यांचा आग्रह, हट्ट वजा मागण्या पूर्ण करत होते. अगदी मोजक्याच लोकांत पण फार देखणा झाला हा सोहळा. या दोघांच्या आनंदाला उधाण आणण्यासाठी सौ अनिता आणि सौ मानसी, आमची मुलं अनुक्रमे निशांत हर्षल, अस्मिता, अनुष्का हे होतेच.
बाजारहाट झाली, आठदिवसाच्या साड्या, मॅचिंग, दागिने दिवसर्वार सर्व तयारी सुरू झाली अन घरात लगीनघाई आली. तिकडे सागर अन श्वेता त्यांच्या खरेदीत गुंतलेले तर इकडे ही गॅंग अन सोबतीला दिलीप दादा आणि सौ ऋचा वहिनी. खरेदीच्या बहाण्याने खाणे, फिरणे, गप्पा टप्पा असे फड रंगू लागले. त्यात केळवण सुरू झाली अन लगीनघाई आता दुडू दुडू पळू लागली.
आर्थिक बाबतीत सुखवस्तु असतात ही लोकं, पण ते सुख वाटून त्याचा पुरेपूर आनंद कसा लुटावा हे या जोडी कडून शिकायला पाहिजेच. प्रत्येकाला काय आवडत काय नाही, सर्वांना खाण्याचा आग्रह, हक्काने खाऊ घालायचे इतकं की पोट फुटे पर्यंत. कोणाला सोडून अगदी एक ही घास यांनी खाल्ला असेल तर शपथ. आम्हा सर्व पुरुषांना उंची जॅकेट ते ही एक सारखे, सर्व स्त्री वर्गाला उंची साड्या अशी जय्यत तयारी. देव ब्राम्हण ते कुलाचार असा 8 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम. त्या दरम्यान मेहेंदी, पार्लर असे छोटेखानी नटण्याचे सोहळे. दीपाली ने सर्व मुलांना स्वतः च्या हाताने मेहेंदी काढली. ती सून, वहिनी वाटतच नाही. अगदी आपली मुलगी, बहीण किंवा जवळची मैत्रीण असं ती वागते. अत्यंत प्रेमाने विचारपूस, हसून स्वागत अन घासातला घास वाटून खाण्याची वृत्ती ..त्यमुळे ती कधी आपली होऊन जाते कळतंच नाही. तसाच विशाल ही ..खूप लडिवाळ, मायाळू, काळजीवाहू. निशांत हर्षल या लग्नात कुठल्याही सल्ल्याशिवाय, न सांगता इतके एकरूप होऊन धावपळ करत होते ..अन पुढची पिढी ही आपल्यासारखीच वागतेय हे पाहुन मन प्रफुल्लित झाले. कित्येक लोकांनी त्यांची स्तुती केली अन मी भारावून गेलो.
नंतरच्या पिढीला एकत्र घट्ट होण्याची एक सुवर्णसंधी या कार्याने दिली आणि त्याचा दुवा होते विशाल, दिपाली, दादा, वहिनी, सागर. पुढच्या पिढीतले हे सर्व मोहरे वैभव, शर्वणी, आदित्य, गार्गी, विशालच्या मामा, मावशीचे मुलं, ही अशी सुखात नांदली ..अन निघताना एकमेकांच्या गळ्यात घट्ट अडकून, अश्रुंचे बांध सोडले त्या क्षणी मी ही माझी आसवं टिपली अन मनोमन सुखावलो.
बोलता बोलता कार्यालयात जायची वेळ आली अन सब दिवाने अब्दुला सज धज के निकले. सीमंतिनी, वागनिश्चय असे विधी झाले अन संगीत नृत्य रजनी झाली..अस्मिता अनुष्का चे action packed dance...सर्व पुरुष मंडळींनी केलेला नाच, दादा वहिनी, विशाल दिपाली, मानसी अन मुली अन नंतर दस्तुरखुद्द नवरदेव नवरी यांचे बहारदार नृत्य .आर्या च गीत...मी आपलं मोडक तोडक निवेदन करून त्यात हजेरी लावली. रुचकर भोजन अन उद्याच्या स्वप्नात झोपून गेलो.
सकाळी 7 लाच हलचल झाली अन सगळ्या नऊवारी साडीत सजलेल्या सुंदरींनी कार्यालय सजवलं... दरम्यान राणी (तृप्ती), विशाल, निशांत, आदित्य, गार्गी आणि कंपनीने रात्रभर जागुन तयार केलेल्या सेल्फी पॉईंट वर फोटोसाठी धावपळ सुरू. चौकोन, षटकोनी, काटकोन, रंगी बेरंगी टोप्या, चष्मे अन तोंडाचे पावटे, मावटे करून खूप फोटो काढले, एवढे की विचारू नका. तिकडे विधी सुरू होते, रुचकर पोहे चहा असा नाष्टा अन हा माहौल..त्यात कार्यालयाची सजावट अजून भर घालत होती. टाळी वाजली, अक्षता पडल्या अन पुन्हा फोटो ....मोजकीच लोकं असल्याने सर्व फार लयबद्ध अन सुरात होतं.. विहिण पंगत झाली ..अन पुन्हा घरच्या मांडवा बाहेर एक स्पीकर, फुलांची आरास जी मनोज आणि तृप्ती ने सुंदर केली होती. मनोज हे एक वेगळं रसायन आहे, एकदा स्वतः ला झोकून दिलं की तो पुढचा मागचा विचार न करता धावपळ करतो. तशीच मानसीही पण नुकतीच आजारपणातून आली असल्याने फार धावपळ करू शकली नाही. ..असो पुन्हा एकदा सर्व "सैराट" झाले अन नवरदेवाला रू 10000/- दंड करून आत सोडले.
दुसरेदीवशी एकादशी.. धार्मिक विधी नव्हते पण घरगूती खेळ, गप्पा, मस्करी, हास्याचे फवारे अन खाणं असा आटोपुन कुलाचार ची तयारी सुरू झाली. घरच्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन अर्थातच अनिता, दिपाली, मानसी, ऋचा वहिनी, वैशाली वहीनि, मामी, मावशी असं एकत्र केलं होतं. सौ तर या वेळी मुहूर्ताचे गाणे ते अगदी कुळाचाराच शक्रादय, ते सर्व मेहून जेऊ घालणे असा संपूर्ण कार्यक्रम आखून राबवत होत्या. अगदी देणे, घेणे, त्याच्या वेळा याद्या असं सर्व चोख. लग्न ठरलं त्या दिवसापासून सर्व नियोजनाला दादा वाहिणीनेही अनिताला आवर्जुन सामावून घेतले होते.
मनोज मानसी चा विवाह वार्धपन दिन साजरा झाला इति विशाल.. केक, फोटो गंम्मत अन नंतर बाहेर जाणे अर्थातच सर्व मुलं मुलं ...icecream, faalude फस्त करून आले.
कुलाचार झाला, देवीची सेवा झाली, चुकभुल माफी झाली...प्रचंड काम असून ही सुधीर त्याच्या laptop सहित हजर होता...आता हळूहळू ती उधळण छोटी होत होत ..ते कण मांडवाच्या त्या चटईवर इतस्ततः जात होते... एक एक जन निघत होता.. तसं विशाल च मन हळवं होऊन तो घट्ट मिठी मारुन आनंदाश्रू ना वाट मोकळी करुन निरोप देत होता...पुढची पिढी अनय, आर्यन, सोहम, आर्या, कौस्तुभ असे ही एकत्र नांदले या निमित्ताने.
त्या रात्री ही सर्व young gang बाहेर जाउन आले, रात्रभर मनसोक्त गप्पा मारल्या अन नात्यांच्या दोऱ्याही घट्ट आवळल्या. पुर्ण आठवडा दादाचा, आमचा, मनोजचा पुर्ण परिवार अगदी नाश्ता ते रात्रीचे जेवण असा एकत्र नांदला.
माझी ही हैदराबाद ला निघायची वेळ झाली, इतक्यात माझी लेक, सून, बहीण, मैत्रीण असलेली दिपाली धावत लाडू अन चिवडा माझ्यासाठी घेऊन आली ...ते चवदार आहेतच पण ज्या प्रेमाने तिने अन विशालने ते आणले त्याची चव अजून खुमासदार झालीये ....
असाच लेक अन सून सर्वांना मिळो ...थांबतो
आलेल्या सर्व आप्त इष्ट जणांचा ही उल्लेख करतो .. खूप काही देऊन गेलेल्या या सोहळ्याची आठवण माझ्यासाठी तर पाठवण तुमच्यासाठी...
मुंबई एक्सप्रेस
301220
Comments