लादनी
लादनी
अनुभवाचे धडे शिकताना माणुस स्वतःला हरवतो. एका कोंदटलेल्या लादणीतल्या जीवनाला असंख्य मजली इमारतीच्या दुनियेत पंचतारांकित हॉटेलातलं जीवन दाखवावं तेंव्हा लादनी डोळ्याआड होते. किंबहूना ती नकोशी वाटु लागते. लादनी खरंच इतिहासजमा झाली आहे.
गढीतल्या बैठकी खालच्या लादणीत मांडलेला संसार, डबलडेकर चाकं नसलेली न हलणारी फक्त थरथरनारी येता जाता, सत्तर वर्षे वयाच्या म्हाताऱ्यांचे हात पाय कापतात तसं, लादनीच आयुष्य संपत आलं. ती म्हातारी झाली. हीच लादनी तिच्या जवाणीत मस्तवाल होती.
एक पिढ्या न पिढ्या चालत आलेली बत्ती, जर्मन कंपनी चा एक जुनाट रेडिओ , आताच्या टी व्ही सारखा, वेगळा असा दिवाणखाना नव्हता, नाटकात असतं तसं सिम्बॉलीक. एका बाजूला जून्या सुताराकडून खास तयार करून घेतलेले 4 दिवाण. तशी लादनी मोठी होती बैठकी पेक्षा. लाल कपड्यात सोंगट्यांचा डाव खुंटीला बांधलेला, रात्री बत्तीच्या झोतात जगणारा आणि रंगणारा डाव. चिरेबंदी छताला खिळ्यावर लाल पिवळ्या कापडात काही तरी बांधलेले आजवर कोणीही उघडण्याची हिंमत केली नाही.
अंधारलं होताच बत्ती इमान जागायची, गुरांना बांधून गडी येणार बत्ती जाळणार, रात्रीच्या जेवणाचं धान्य घेऊन जाणार, कोपऱ्यातल्या चुंगड्यात त्याच्या नावच धान्य असायचं. गावात जराशी किलबिल चालू व्हायची, रानातून परतायचा वेळ झालेला, तस बोलणं गडबड, बातम्यांची वेळ झालेली, रेडीओ चालू व्हायचा, पायांचा त्रिकोण करून दोन्ही हात पायावर ठेवून बसलेली बैठक, बातम्या चालू असताना स्मशान शांतता, बातम्या संपायच्या.
कोरडयास न भाकरी, कांदा मिर्चीचा ठेचा जेवणं व्हायची. तालुक्यातील साडे आठ चा भोंगा पुसटसा ऐकु यायचा, आता सोंगट्यांचा डाव बसायचा अन सगळे डाव आज ही अर्धवट सुटलेले.
परवा कथा कथनात कुठेतरी लादनीचा संदर्भ आला अन लादनी गरगर डोळ्यासमोर फिरू लागली. तसा दुसरे दिवशी गावात गेलो, गाव आता वेशी बाहेर गेला होता, अन वेशी आतला गाव लुप्त झाला होता. मारोतीच्या पारावर भिंती चढल्या होत्या, कळसावर चमचमीत झेंडा होता, पूर्वी गावठी कापडाला काव , गेरू फासून झेंडा लावायचा हनुमान जयंतीनिमित्त अशी प्रथा होती. वान्याच दुकान घराबाहेर होत, बारवं अन बावड्या कोरड्या होत्या न त्यांच्या बाजूला ग्राम पंचायतीचे हात पंप.
गढी गावची कचरा कुंडी झाली, बैठकीनं सगळं ओझं लादणीवर टाकून दिलेले, तालुक्यांच्या पातरुड लोकांनी हात भट्टी लावली होती गढीच्या मागे अन लादणीत पत्राच्या डब्यात दारू भरून पुरुन ठेवली होती पोलिसांच्या धाडीच्या भीतीनं...
$$ शरद पुराणिक $$
Comments