ऋणानुबंध .....मी आणि मनोज
ऋणानुबंध .....मी आणि मनोज
आत्ताच एक 50 वा वाढदिवस समारंभ आटोपुन घरात पोचलो. वाढदिवस हा मनोज जोगळेकर या आमच्या ...नेमका कोण बरं?? मित्र, भाऊ, नातेवाईक, सगा, सोयरा की अजून कोण....पण काही नाती ही अशी असतात की ज्याला कुठल्याच धाग्यात आणि नावात गुंफू शकत नाही... त्या सर्वा पलीकडले जे काही असते ते म्हणजे हे ऋणानुबंध.
आम्ही पुण्यात 2004 साली आलो आणि 2006 साली आमची मानसी-मनोज या जोडीची ओळख झाली. निमित्त होते आमच्या मुलांच्या शाळा. एकच शाळा, एकच बस स्टॉप, तिथे अनिताची अन मानसीची ओळख झाली... आणि काही कळण्याच्या आत ही मैत्री दर कोस दर मजल अधिक अधिक घट्ट होत गेली. या धाग्याला एक नात्याची दोरी होती, पण त्या पलीकडे जाऊन हे संबंध ऋणानुबंधाच्या गाठीत मजबुत बांधले गेले.
मनोज तसा अतिशय मित भाषी, तसा फार कोणात जास्त न मिसळणारा, त्यातल्या त्यात नातेवाईकांमध्ये फार जास्त न रमणारा. पण इथे ते बंधन नव्हते, आज ही नाही. आमचे गप्पांचे फड एकदा रंगले की तास न तास न थांबणारे. मानसी ची गोष्टच निराळी. खूप बोलका स्वभाव , तितकीच मदतीला धाऊन येणारी, अन प्रचंड मायाळू. किसीं को एक बार अपना कहा , तो फिर बाकी सब कुछ नही, असंच काहीतरी. मनोज च ही तेच आहे.
खरं तर एका बस स्टॉप वर बायकोची झालेली मैत्रीण ते आजचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध या मध्ये अनेक घटनाक्रम आहेत जीथे या जोडीने कायम एक खंबीर आधार, मानसिक, कष्टाचा आणि मदतीचा एक अदृश्य हात दिला... अदृश्य एवढ्यासाठी म्हणतो की ते करताना ते कधीही दाखवत नाहीत, दिसू देत नाहीत आणि तो घेऊन मिरवत ही नाहीत आणि त्याचे मिरे वाटत ही फिरत नाहीत. नाही तर काही लोक काहीही न करता, किंबहुना फ़क्त द्वेष, अनादर करून आम्ही यांना कशी मदत केली ते दाखवत फिरतात, एक सफेद झूठ, स्वार्थी, खट्याळ आणि नाठाळ मंडळी. पण अळीमिळी गुपचीळी 🤐.
आमच्याकडे असलेल्या बऱ्याच सण वार या साठी ही जोडी म्हणजे हक्काचे सोवाष्ण ब्राम्हण, अन तिच्या मुली या कुमारिका असं येणें जाण चालू झालं... अन हे नात अधिकाधिक दृढ होत गेलं. गणपती, राखी पौर्णिमेला अन इतर अनेक प्रसंगी आमची मुलं तिच्या कडे, अन अनेक सण वारं आम्ही सह कुटुंब त्यांच्या कडे.
आज ही मानसी घरी आली तर तिचा चहाचा कप धुतेच, पण सोबत तिथे जे काही असेल ते आवरून सावरून जाणार. अनेकदा गौरी च्या जेवणानंतर चार चा चहा तीच करते. अन दुपारी जेवणासाठी भरलेली मैफल संध्याकाळी चहा नंतर समाप्त होते. तसंच आम्ही ही तिकडे गेलो तर हाच दिनक्रम असतो.
एक वाखाणण्याजोगी गोष्ट या जोडीत आहे, ती म्हणजे कुठल्याही क्षणी मदतीसाठी हे तत्परतेने हजर असतात. अथ पासून इति पर्यंत सर्व चोख व्यवस्था पाहतात. मग ते ने आन, कष्ट, आवर सावर ते अगदी तुमच्या कार्यक्रम पूर्ण होऊन तुम्ही निवांत होईपर्यंत हे कायम सोबत राहतात. आजारपणात तर त्यांनी कायम फ़क्त डबे पुरवले नाहीत तर रात्रंदिस सोबत राहून काय हवं नको ते सर्व उपलब्ध करून कायम पाठराखन केली.
मी गेली 3 ते 4 वर्षे बाहेर आहे, दरम्यान अनिता ची परिस्थिती खूप गंभीर झाली होती, इतकी की तिला मुलांनी उचलून दवाखान्यात दाखल केले, अन हक्काने मानसी ला फोन केला, मनोज न मानसी आहे त्या परिस्थितीत धावुन आले, आणि पुर्ण परिस्थितीचा ताबा घेऊन अगदी घरच्या सारख सर्व सांभाळलं. मला येईपर्यंत मध्य रात्र उलटुन गेली होती, तोवर हे दोघे अनिता सोबत बसून होते... इतर मदतीचा उल्लेख मी टाळतोय कारण त्यांना हे आवडणार नाही. कुठलाही गाजा वाजा न करता करत राहणे हा त्यांचा स्थायीभाव आहे.
सुख, दुःख, आनंद, धमाल अशा प्रत्येक क्षणात मनःपूर्वक सहभाग, मदत, आणि केवळ निर्भीळ आनंद उधळत इतरांना आनंद देणाऱ्या अन काही क्षणी अश्रू ना मोकळी करण्याची एक हक्काची जागा अश्या या मनोज न मानसी विषयी लिहावं तेवढं थोडं आहे. दोघेही अत्यंत शिस्तप्रिय, perfectionist.
आमची मुलं ही त्याच रंगाच्या धाग्यात विणली आहेत, तशीच घट्ट एक रंगी. निशांत ला बाईक ही मनोज नेच शिकवली. अन ते हो अगदी या कानाच त्या कानाला कळलं नाही. त्यांच्या मुली ही अनिता दिसली की अक्षरशः गळ्यात पडतात आणि सर्व गोष्टी शेर करतात. इकडचा न तिकडचा प्रत्येक पदार्थ दोनीही कडे वाटला जातो, ते अगदी भाजी चटणी लोणचे आणि सर्व काही.
मनोज च विशेष कौतूक ते म्हणजे आपण गप्पा मध्ये गुंग असतो तेंव्हा हळूच उठून कॉफी, कोल्ड कॉफी हातात आणून देतो. हे अगदी मनापासून. कधी ही कुठली बरोबरी नाही, हेवा देवा तर दूरच.
2006 ते 2020 च्या या प्रवासात अनेक कौटुंबिक सुख दुःख वाटुन सहप्रवासी असलेला मी या नात्याचा ऋणी असा शब्द वापरत नाही, पण हव्यासी किंवा स्वार्थी म्हणा हवं तर, मी भुकेला आहे, जी भूक रोज लागते, रोज आपण जेवतोही, पण एक समाधान, परिपूर्ती आणि सुख अधूनमधून मिळत राहतं, तसच काहीतरी.
अनेकांनी याला भेगा पाडून ते कमकुवत करण्याचा अयशस्वी प्रयोग केला, करतील ही, पण ही घट्ट वीण अशी तुटणार नाही...
मनोज ला 50 व्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देऊन हे असंच अर्धवट सोडतो, पुन्हा लिहिण्यासाठी.
शरद पुराणिक
9 मार्च 2020
Comments