पुणे तिथे "खूप" उणे

 पुणे तिथे "खूप" उणे 

सुशिक्षित "बेकार" पण पगारदार अन मालदार


आता covid हा शाप की वरदान या मालिकेतील हा अजून एक लेख आज एका वेगळ्या वळणावर लिहावा लागतोय. "पुणेकर" आणि त्याचा "अवास्तव" अभिमान बाळगणाऱ्या समस्त जनांची माफी मागून आणि भावना न दुखावता पुढे जातो. 


आदरणीय नमो साहेबांनी आणि राज्यातल्या मामु यांनी बंदिशाला थोडीशी कडी उघडून ये जा सुरू केली. तत्पुर्वी बाहेर जाणे ते ही संध्याकाळी वगैरे तर अगदीच "पुराणी हवेली, पुराना मंदिर" अशा चित्रपट निर्मित गावात फिरतोय की काय असं वाटायचं. किर्रर्र भयाण निर्मनुष्य रस्ते, अगदी कोणी च नाही, अन येणारा प्रत्येक जण हा "दांडू" घेऊन येणारा वाटायचा. आता पक्ष्यांचे किलबिलने, सुंदर झाडं आणि उन्हाळ्यात होणारी पानगळ असं सर्व मिळून त्यात आम्ही अगदी स्वित्झर्लंड ही साक्षात इथे अनुभवला हे त्रिवार सत्य. पण हळूहळू त्याचा ही कंटाळा आलाच की काय असे वाटायचे, ते अश्यासाठी की दिलेल्या काही तास मोकळीक असायची अन तेंव्हा असे जथे च्या जथे बाहेर पडायचे अगदी कारागृहातून मुक्ती मिळावी याच अविर्भावात. सर्व ज्येष्ठ नागरिकांची माफी मागून - काही आजोबा आजी जोडीनं गप्पा मारत दोघांच्या ही हातात पिशव्या असं घेऊन भाजी, थोडंस सामान घेण्यासाठी म्हणून रोज बाहेर पडायचे. असो. यासम अनेक किस्से आहेत, काही लोक तर गर्दी पाहण्यासाठी तर काही हातात पिशवी घेऊन खुशाल walk करत होते. त्या काळात पिशवी हा "पास" होता स्थानिक फिरतीसाठी. 


येन केन प्रकारे घरी बसून मा मु यांनी एकदाचं मोकळं केलं थोडं थोडं, कसलीही नियमावली नाही आम कुठलेच ठोस निर्णय नाही...पण खाण्या पिण्याच्या जागा मोकळा श्वास घेऊ लागल्या.  पुणेकरच ते पुन्हा पार्सल साठी रांगा, गर्दी करू लागले. पेंटर लोकांची अन डिजिटल प्रिंटिंग वाल्याना थोडं काम मिळालं. पार्सल सेवा सुरू आहे, दोरखंड बांधून लक्ष्मण रेषा  आखल्या. अगदी सँडविच, डोसा, chinese ते पोळी भाजी icecream , शाकाहार, मांसाहार, बिर्याणी असे पदार्थ मिळते झाले. चालणाऱ्यांची, पळणाऱ्यांची गर्दी ही तितकीच, किंबहूना नेहेमीपेक्षा जास्त. 


एक नवीन चित्र दिसू लागले, मुलं मुली, काही लैला मजनु, हौसे असे लोक वेगवेगळे पदार्थ घेउन रस्त्यातच जागा मिळेल तिथेच बसुन खाऊ लागले. Walk करताना प्रत्येक पादचारी पथावर हेच चित्र. एरवी याच अवस्थेत सिगारेट, बाटल्या असे घेऊन बसणारी ही मंडळी आता जेवणं ही करायला लागली.  बाकी गोष्टी न सांगितलेल्या बरंय ( म्हणजे पुलाच्या कठड्यावर बसलेले जोडपे आणि त्यांचे संस्कार). 


मला आठवतं औरंगाबाद ला असताना औद्योगिक वसाहतीत जाताना एक व्यक्ती खूप दाढी वगैरे वाढलेली, काळे कुट्ट कपडे आणि कित्येक लोक त्याला सकाळी, दुपारी जमेल तसं जेवण द्यायचे अन तो जिथे जागा मिळेल तिथे बसून खायचा. त्याची मजबुरी होती आणि इथे हे ही ??? आज सहज तो आठवला. 


माझ्या चालण्याचा मार्गात अनेक उंची हॉटेल आहेत, अनेक दिगग्ज इथे कॉफी, आणि बरंच काही असं रस्त्यावर उभे राहून भक्षण करत असतात. इथे कुठलेही "अंतर" पाळले जात नाही. ही सर्व मंडळी हे ",उचभ्रू" आणि काही स्वयंघोषित "celebrity" ही आहेत. काही खरे आहेत, पण काही अगडीच एक दोन मालिका करून त्यांचं ते "celeb status' जगत आहे. आमचा विरोध नाहीच, पण मग निदान काही मूळ तत्त्व बाळगणाऱ की नाही.  तुम्हीच जर असे वागाल तर इतरांकडून काय अपेक्षा बाळगाव्या आम्हा पामराणी. संपुर्ण पदपथ हे व्यापुन टाकतात आणि अगदी जे खरंच पदपथ म्हणून त्यावरून चालतात त्यांना मुख्य रस्त्यावर यावे लागते. याच भागात काही "सुखकर" थांबे ही पालिकेने उभे केलेत त्या बद्दल मी या पूर्वी ही लिहिले आहे. Corona च्या या भयंकर काळात सामाजीक रित्या समूहात धूम्रपान करणे हे तुमच्या शिक्षणाच आणि संस्कार यांचं द्योतक आहेच. वाहन लावण्याचा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना ही पाहायला मिळतात. रस्त्यांचे 7/12 जणु यांच्याच अनेक पिढ्यापासुन यांच्या कडे हस्तांतरीत केले आहे. 


काही गोष्टी,  ते ही योग्य वेळी, योग्य वयात आणि अधिकारांनी घरात करतांना लोक अनेक गोष्टी तपासून पाहतात, पण इथल्या लोकांना हे बहुतेक सुरक्षित वाटत नसावं, म्हणून हे असे भर रस्त्यावर, बाजूला, वेळी अवेळी अव्यवहार करतात की काय ? हा प्रश्न मला नेहेमी पडतो.  हा संस्कारांचा अजून एक अनोखा नजराणा आहे. आता लोक म्हणतील हे सर्व शहरात आहे, अन बाहेरचे लोक इथे येऊन हे सर्व मालिन करत आहेत. पण मी अनेक शहरे फिरलो, अनेक राज्यांत राहिलो, नोकरी निमित्त, कामा निमित्त, पण ज्या प्रमाणात उन्माद हा इथे आहे तो कुठेही अनुभवास आला नाही.  एक युक्तिवाद असा ही होतो की हे फक्त उच्चभ्रू समूहात आहे, हे साफ खोटे आहे आणि प्रत्येक वर्गातल्या लोकांचं ही असंच काही.  ज्यांना शक्य आहे आणि ते पचवण्याची ताकत आहे त्यांनी खुशाल वागावं, पण मग फक्त अनुकरण म्हणून आणि तुमच्या बौध्दिक, आर्थिक, वैचारिक परिस्थिती त्याला पोषक नाही तर करू नका. या सर्वांचे दूरगामी परिणाम फार भयंकर आहेत. तेंव्हा बाबांनो आणि बाबींनो सावध. 


Outing, night outs, हा एक अजून अस्वस्थ करणारा प्रकार. इथेही तेच आहे. 


कोण होतास तू, काय झालास तू 


कुठे कृष्णराव, बाबू जी, खळे काका, शांताराम बापु यांच्या रात्र रात्र चालणाऱ्या सांगीतिक मैफिली. लकडी पुलावर टांगा थांबवून आठवलेले गीते, त्यांच्या चाली लावून रातोरात ती गीते सजवणे. प्रभात स्टुडिओ, विविध रंगकर्मी यांची नाट्य चळवळ, त्याच्या तालमी. महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा. ज्या शहरात दस्तुरखुद्द पु ल आणि असे असंख्य उंच उंच व्यक्तिमत्व जन्मली, जगली आणि सर्वार्थाने ज्यांनी या शहराची सांस्कृतिक, साहित्यिक ओळख निर्मित केली आणि जपली. अनंत नमोल्लेख आहेत असं हे पुणे ...सायकलीच शहर म्हणुन एक दुसरी ओळख (ती आता पुनरुज्जीवित होत आहे  - एक तंदुरूस्तीची चळवळ म्हणून).  मला सतत असं वाटतं, ते म्हणजे पेशव्यांच्या काळातील ते वैभव ते आज जमीनदोस्त झालेला शनिवार वाडा ...फ़क्त आठवणी. असं बरंच काही .....

 

मग कुठे काय बिघडलं अन हे असं झालं ....


याच अस्वस्थ विचारात थांबतो, पुन्हा नवीन अनुभव विश्व जगण्यासाठी.


एकला चलो रे ....


शरद पुराणिक

290920

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती