तरुणाईतली भंकसगिरी - ब्लफ मास्टर्स, pranks

 तरुणाईतली भंकसगिरी - ब्लफ मास्टर्स, pranks


काल बराचवेळ झोप लागत नव्हती, अशावेळी मन कुठे कसं आणि किती वेगाने बेछूट धावत याच्या काही सीमा नाहीत. तसच माझं मन सैरावैरा करत पोचलं ते थेट 1990 ते 1993 च्या काळात. त्या काळी मी अर्थातच ब्रम्हचर्य अवस्थेत अन सर्व सोबती ही तसेच. या पूर्वीच्या काही लिखानामधून माझे अंबाजोगाई, औरंगाबाद असे संदर्भ आलेच आहेत. त्याचाच जगण्याचा हा दुसरा अंक. 


मी आणि माझे इतर अनेक मित्र आम्ही एकत्र राहायचो, खानावळीत जेवायचं. बरं तो काळ म्हणजे नो मोबाईल, टी व्ही असल्या वाईट सवई अजीबात नव्हत्या. गाड्या नाही घोड्या नाही. एक सायकल होती मला आणि इतर काही सुखवस्तु मित्र म्हणजे अमोल टिंबे कडे TVS50 होती, तर काही परभणीच्या मित्रांच्या सुझुकी गाड्या होत्या. पण ही सारी मंडळी अभियांत्रिकी शिकत होती त्यामुळे खर्चावर अनेक मर्यादा होत्या. मग या काळात गप्पा हा एकमेव कालापव्यय होता. मूळ बीड, अंबाजोगाई असे असल्याने विविध कला होत्याच. त्यात अमोल कडे एक विशिष्ट कला होती ती म्हणजे bluff आणि prank. बहुतेक M TV बकरा आणि तत्सम सगळे प्रकार हे अमोल मुळेच अस्तित्वात आलेत अशी माझी पक्की खात्री आहे. 


आमच्या सर्वांची खानावळ एकच होती, औसेकर पाठक यांची घरघुती खानावळ. तिथे बहुतांश अभियांत्रिकी विद्यार्थी हे सदस्य होते. आता पाठक, पुराणिक, तिंबे असं नातं जरा घट्ट होतं म्हणजे जरा विशेष काळजी ते घ्यायचे. अगदी आमच्या काही कार्यात ही त्यांनि आवर्जुन उपस्थिती लावली एवढे जिव्हाळ्याचर संबंध.  जेवताना रोज नवीन विषय. होणाऱ्या न होणाऱ्या सर्व बातम्या अमोल बेमालूमपणे अशा आविर्भावात सांगायचा की ऐकणारे मश्गूल व्हायचे. असं करत करत आम्ही आमचा चाहता वर्ग निर्माण करण्यात यशस्वी झालो.  जो वर आम्ही तिथे पोचणार नाही तो वर तिथे कलम 444 असायचे. एकदा का आम्ही तिथे पोचलो की माहोल एकदम ढवळुन निघायचा. आदरणीय श्री अमोल त्यांच्या पोटलीतून काय बाहेर काढतील याचा नेम नाही. पण मग त्या विषयाला अनुसरून पुढच्या सर्व प्रतिक्रिया आणि संवाद असे काही बरसायचे की नाटकाची एखादी संहिता व्हावी.


त्या काळी परीक्षांचे वेळापत्रक असे अचानकपणे जाहीर होणे असा प्रघात होता.  तो काळ जवळ येत होता. आम्ही जेवत असताना अमोल जेवायचा थांबला आणि म्हणाला शपु फार टेन्शन आलंय राव, मी काही वीचारायच्या आत तो म्हणतो आता उद्यापासून परीक्षा आहे राव, अभ्यास तर अजिबातच नाही ...हे सांगताना त्याने चेहेरा इतका केविलवाणा केला की जणू याचा विषय गेलाच अगदी. समोर अनेक विद्यार्थ्यांना हे कळताच ते जेवायचे थांबले ..आणि विचारले खरंच उद्यापासून आहे ...हे विद्वान म्हणतात मी आत्ताच कॉलेज वर जाऊन आलो आणि शिपाई वेळापत्रक लावत होता ...ते पाहुन माझे पाय गळाले आहेत राव...बरं याचा अभिनय इतका तगडा की समोरची मुलं ताटात आहे ते टाकून तडक कॉलेज वर पोचले. दरम्यान आम्ही पोटभर हसून आणि जेऊन तिथून निघालो कारण असं काहिच घडलं नव्हतं. 


काही दिवसांनी आम्ही जेवण करून पान खायला टपरीवर गेलो, त्या दिवशी आमचे दुसरे त्याच ताकदीचे ब्लफ सम्राट आले होते. पान वाला जरा वेळ लावत होता इतक्यात अमोल म्हणतो अरे जलदी दे यार अण्णा पान, ये साब का कल सुभे हवाई जहाज है, अण्णा नि कुतूहल म्हणून विचारले तर अमोल म्हणतो अरे तो पायलट आहे, सकाळीच एक ट्रिप घेऊन आलाय आणि आता उद्या जाणार आहे. दरम्यान आसपास ची मंडळी ही या चर्चेत रंगली अन ते "पायलट पुराण" तासभर चालले, दरम्यान अन्नाने दोन वेळा मोफत पण सेवा ही देऊ केली होती. मिट्टया आणि टीमब्या ने तो अंक इतका रंगवला ...कधीही विमान न पाहिलेले आम्ही विमान प्रवासात इतके रमलो आणि त्याचं ते हास्य गुऱ्हाळ रात्रभर पुरुन उरले. मिट्टया उर्फ श्रीपाद चे ही या विषयावर कादंबरी होईल एवढे किस्से आहेत.


पुन्हा एकदा स्थळ खानावळ, तीच वेळ सोबत एक गेस्ट घेऊन आम्ही जेवत होतो... इतक्यात अमोल म्हणाला खाऊन घे बाबा उद्याचं काय खरंय .. वातावरण एकदम गंभीर .. सर्वजण अचंबित, आम्ही अशी बतावणी सादर केली की तो गेस्ट आता काही दिवसाचा सोबती आहे, त्याला दुर्धर आजार आहे आणि डॉक्टरांनी तस सांगितलंय... हा कार्यक्रम दोन चार दिवस चालला अन या दरम्यान आमचे चाहते रोज त्या गेस्ट ची खुशामत करत गोड पदार्थ आणायचे,पान, चहा, मसाला दूध, काटे मामाचे सँडविच अशी इच्छापूर्ती होत होती ...बिंग फुटायच्या आत तो अंक आम्ही सावरला. अर्थातच खाणे, लुबाडणे असा हेतू अजिबात नव्हता आणि निखळ मनोरंजन या सदरात हे घडायचं... किती मंतरलेले ते दिवस .  


कोणी गावाकडे जाणार असेल तर त्याला गाडीत सीट मिळण्यासाठी, तर कधी गंमत म्हणून खाली उभारून रडण्याचा अभिनय करत सांगायचं ...अरे धीर धर , काळजी नको, शेकडो एकरचे सौदे, लाखोंचे व्यवहार, नुकसान, न झालेले भांडणं असे सर्व संदर्भ मिसळून त्याची गाडी हाले पर्यंत वातावरण फुलवत राहायचे अन मग खोलीवर येऊन त्याचे हास्य फवारे उडवत रात्र घालवायची. तिकडे त्याचा प्रवास ही सुखकर व्हायचा.


एकदा रात्री उशिरा आम्ही सिडको बस स्टँड वर चहा घेण्यासाठी गेलो, बरं हे सर्व विद्यार्थी अन मी नोकरिवाला, पण यांच्या सोबत तसाच राहत होतो, गेलो आणी  मध्यरात्री राजीव गांधी गेले अशी बातमी आली अन अचानक सर्व बंद होउ लागले, तसे आम्ही खोलीवर आलो, 211 N4 सिडको येथे आम्ही 11 जन सोबत राहायचो.. जे आळशी आले नाहीत त्यांना आम्ही कळवळून सांगतोय की राजीव गांधी गेले.....पण लांडगा आला रे सारखी आमची अवस्था झाली.


त्या काळातली ती मैत्री आज ही तशीच घट्ट टिकून आहे इतकी की अगदी आमची कुटुंब तसेच सरमिसळ झालेत ...अनेक जण सह प्रवासी  आहेत या वाटेवर उगाच नामोल्लेख करत बसलो तर रात्र पुरणार नाही ...त्या सर्व दोस्ताना, त्यांच्या बायकांना आणि लेकरांना सलाम...या प्रक्रियचे ते ही भाग आहेत


दोस्तो 

तुम हो तो बहार है 

बाकी सब बेकार है 


असे अनेक अनंत दिव्य किस्से आहेत पण पुढच्या भागात ...


शरद पुराणिक

हैदराबाद 260221

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती