ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी


 ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

साद घालिती पुन्हा नव्याने ती मैत्रीची नाती....

होळी धुरवडी च्या रंगांन अंग तरंग जावं भरुन

"नाही तर मित्रांनो मी तसाच राहीन घरात बसून*


काल संध्यकाळी १२ तास ऑफिस काम करून घरचा रस्ता घेतला....एक दोन चौक गेले अन् अचानक चौफेर गर्दी दिसायला लागली.... एरवी दोन चार बस, travels असं चित्र असत पण आज गर्दी का आहे हे काही कळेना.  हेल्मेट च्या आत डोकं फार विचार करू देत नव्हतं, त्यात एरविच जीव गुदमरून सोडणारी ती वाहनांची अन् माणसांची गर्दी ही काही पुणेकरांसाठी नवीन नाही....पण आज जरा जास्त जाणवत होती...

नंतर लक्षात आलं शनिवार रविवार ला जोडून होळीची सुटी आली. .. मग कामगार तो कुठल्याही हुद्द्यावर का असेना लगेच घर जवळ करतो...म्हणून चौफेर बॅगा, पिशव्या, सामान घेतलेले सर्व वयोगटातील  लोक होते.


पिशिवितून पिचकाऱ्या, मिठाई, असं काही नाही घेऊन निघाले होते. कोणाची चिल्ले पिल्ले सोबत होती, तर कोणाची बहुधा दाराकडे टक लाऊन वाट पाहत असतील.  तर कुठे आई वडिलांना भेटण्याची उत्सुकता दिसत होती चेहेऱ्यावर.  तर कुठे नोकरीनिमत्ताने बाहेर असलेल्या नवरा बायकांच्या भावना ..


ताल से ताल मिले मोरे बबुआ

बाजे ढोल मृदंग

मन से मन का मेल जो हो तो

रंग से मिल जाए रंग

हो होरी खेले रघुवीरा


तनिक शर्म नहीं आये देखे नाहीं अपनी उमरिया

हो साठ बरस में इश्क लड़ाए

साठ बरस में इश्क लड़ाए

मुखड़े पे रंग लगाए, बड़ा रंगीला सांवरिया

चुनरी पे डारे अबीरा अवध में होरी खेरे रघुवीरा

अरे चुनरी पे डारे अबीरा अवध में होरी खेरे रघुवीरा...


काहींना बोहल्यावर चे वेध असावेत तर काहींचं ठरलं, तिला होळीची ही सुटी जरा भेटून येण्यासाठी उत्सुकता. 



 रंगात  रंग  तो  श्याम  रंग पाहण्या नजर  भिरभिरते

 ऐकून  तान  विसरून  भान  ही  वाट  कुणाची  बघते

 "या  सप्तसुरांच्या  लाटेवरूनी साद  ऐकुनी  होई*

 राधा  ही...  बावरी, हरीची राधा ही बावरी


काही जण हिशेबाची गोळा बेरीज करत...मी ज्या रस्त्यावरून जात होतो तिथल्या प्रत्येक चौकात, थांब्यावर दुतर्फा गर्दी करून त्यांच्या गाड्यांची वाट पाहत होते.....ती संमिश्र व्याकुळता माझ्या डोळ्यांनी मात्र टिपली. ...गाडीवर 20 किलोमिटर च्या त्या काळात मी भरपूर रंगांची होळी खेळत खेळत निघालो होतो ...


मग मी ही गेलो त्या काळात जेंव्हा मी ही या गर्दीचा भाग होतो....अन् आठवलं की मी ही या विषयी काही तरी लिहिलं आहे ते आज आवर्जून पाठवावं वाटलं.... जुनाच मसाला आहे... आठवणीने ताजा केलाय...


होळी रे होळी - पुरणाची पोळी......!!!

जगण्याच्या वाटेवर विविध रंगात सजलेली, धजलेली, हसलेली तर कधी रुसलेली.


आजचा विषय हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अगदी घट्ट कवटाळलेला आहे. अनेकांनी अनंत रुपात तो जगला, उपभोगला आणि त्याची इतकी रूपं आहेत की विचारूच नका. त्यामुळे यात मी काही तरी तीर मारतोय किंवा रंगाने टंच पिचकारीतून हवेत उंच रंग उडवायचा नाही किंवा त्यात कोणाला भिजवायच नाही .....आयुष्याच्या प्रत्येक वळणावर रंग बदलणाऱ्या होळी च्या भावनांना यात सरमिसळ करून ती धुळ स्वतःवरच उधळायची आहे.


बालपणात चड्डी कमरेवर खेचत एका हातात पत्र्याचा डब्बा अन त्यात खळखळणारी ती चिल्लर अन येणाऱ्या जणाऱ्याकडुन पट्टी (वर्गणी) गोळा करायची. त्यातून होळीची तयारी करायची. जरा अक्कल आली की मग लाकडं चोरण्याच्या मोहिमेत योद्धा म्हणून वर्णी लागायची. मग काय आपल्याच गल्लीतले लाकडी ऐवज लंपास करायचे. आता ही जमवलेली ती संपत्ती लपवण्यासाठी एक अड्डा शोधायचा. येता जाता त्यावर पाळत ठेऊन ती कशी वाढणार याचं कधी पक्कं तर कधी कच्चं नियोजन.  रंग खेळायचा म्हणजे एका बादलीत रंगीत पाणी करून ते पिचकारी (ती असणं ही एक प्रतिष्ठा होती) भरून आपल्या अंगणात आणि दारासमोर खेळायचं.


आता घसा फुटलेला, आवाजात थोडी जरब आली की मग घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची. गोडी गुलाबीत दिली तर ठीक, नाही तर मग ती इतर मार्गाने (त्यांच्या परसातले लाकडं पळवुन) वसुल करायची. हे फ़क्त होळी पुरतं मर्यादित नाही तर तुम्ही आम्हाला दाऊद चे हस्तक वगैरे समजू नका. मग ती विविध मार्गी जमवलेली संपत्ती गोळा करायची, जमलेल्या पैशातून वखारीतून ओंडके विकत आणुन होळी रचायची. तिची व्यवस्थित सामूहिक पुजा झाली की सर्व स्त्री वर्ग, ज्येष्ठ घरात गेले की होळीचे खरे रूप सजवायचे. दरवर्षी नवनवीन शिव्या (आता हे लिहू की नाही यात खूप वेळ गेला, पण काही योग्य शब्द सापडेना... मंत्र लिहावं वाटल तर त्याची पवित्रता जाईल ...घोषवाक्य जरा बरे वाटले . बोंबसूत्री..) हो शिव्याच ..ज्याने त्रास दिला त्याच्या नावे, ज्याने वर्गणी नाही दिली, ज्याने सिक्स मारून गेलेले चेंडू परत दिले नाहीत त्यांच्या नावे अशी विविध रूपांनी फेर धरून ती बोंबसूत्री रात्री उशिरा पर्यंत सुरूच. एव्हाना पेटलेली होळी शांत होत जायची आणि मग उद्याच्या रंगाचं नियोजन.  


पिचकारी सुटली, काचकोरी रंगाच्या पुड्या खिशात, हातावर जरासं घ्यायचं पाणी तर कुठंही उपलब्ध त्यात मिसळून ते सवंगड्यांना फासायचे ...कशा कशाची तमा नाही, डोळ्याला काय होईल, केस खराब होतील, त्वचा खराब होईल हे विचार येण्याची अक्कल नव्हतीच ...त्यामुळे त्याचा निर्भेळ आनंद होता. अशातही काही घरघुशे होते ...त्यांना बाहेर काढण्यासाठी अथक परिश्रम ...एकदाचा काढायचा आणि पार माखून टाकायचा. रंग संपलेच तर शांत झालेल्या होळीतून राख घेउन ती फसायची ....अजुनही बरेच प्रकार ही धुळवड साजरी करण्याचे.


एव्हाना चड्ड्या जाऊन अंगात पॅन्ट आली, चिल्लर कामासाठी पुढची पिढी येतेच.  मनात विविध रंग भरू लागतात, मित्र सोडून दुसऱ्या कोणाला तरी रंग लावावा हे स्वप्न आणि काल्पनीक चित्र डोळ्यासमोर फिरते. काही जणांचं ते सत्यात उतरते, काही खोट्या कहाण्या रंगवून त्याच काल्पनीक विश्वात उधळतात तर काही वंचित आघाडीचे सदस्य होतात.  मग ते स्थळ शोधण्यासाठीची धडपड, मोहिमा अशा सनांतून वळणा वळणाने मार्गस्थ होतात. मग या सणाच्या चाली रीती वयानुसार आणि परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार बदलत राहतात. घरची पुरणाची पोळी फार गोड न लागण्याची ती स्थिती. गाड्या काढायच्या, चार टाळकी एकत्र येऊन त्या आपल्या परीघ क्षेत्रात मिरवायच्या, रिकामे हेलपाटे. नंतर मग डिपॉझिट जप्त होउन हरलेले उमेदवार कुठंतरी शेतात डाळबाटी पार्टी, किशोरकुमार चे विविध भावरागातील गीत संमेलन तर कुठे जगजीत च्या गझल आणि बरंच काही.


पाहता पाहता उद्योग धंदा लागतो, गाव सोडून शहरात अन गावची होळी दूर जाते. नवीन परीघ, नवे सवंगडी त्यात होळी रंगते.  साहेबाच्या घरी, मित्राच्या कॉलनीत तर कधी जमलंच तर गावी अशी दलबदलु होळी.


अशातच सांस्कृतिक वारसा असलेल्या गावात बदली पण इथे होळीचा मागमूस नाही. काही विघातक शक्ती तर सोसायटीच्या आवारात ही खेळु देत नाहीत तर पोलिसात तक्रारी करतात. ते येऊन स्पिकर आणि संगीत बंद करुन ते साहित्य ही घेऊन जातात. या राज्यातील, देशातील हे एकमेव शहर आहे जिथे धुरवडी च्या दिवशी सुटी नसते..चक्क इन शर्ट करुन कार्यालयात जाणे ही अभिमानाची गोष्ट वाटते ...अन अशा वेळी मला ते गाड्या अडवून शर्ट फाडणारे माझे सवंगडी आठवतात.  आम्ही रंग पंचमी खेळतो असं सांगत दिवस काढतात तर रंग पंचमीला ही एखाद्या लग्नाच्या हळदीला असतात तेवढेच लोक रंग खेळताना दिसतात... असो तर 2004 नंतर ना मी रंगलो ना कोणाला रंगवलं...बाकी पर्यावरण वगैरे वादात तर मी जातच नाही ..पण त्वचा, डोळे, केस खराब होतात हे मी कसंबसं मनाला पटवतोय अजूनही...

 

एक होळी मात्र तशीच गडद मनावर रंगलेली आहे, ती म्हणजे 1984 साली धारूर येथील. आमचे पाय पाळण्यात पाहून आम्हाला जिल्ह्याचं गाव सोडून धारूर सारख्या ठिकाणी आमची रवानगी झाली. ऐन मॅट्रिक च वर्ष अन परीक्षेच्या काळात ती आली होती. इथे कटघर म्हणून राजपूत मित्रांचा एक विशिष्ट भाग आहे. होळीच्या अगोदर महिनाभर रोज ढोलक वर संगीत आणि त्या सोबत थंडाई तयार होत असे. सतत पाच दिवस इथे रंग खेळला जातो. रंगाने भरलेल्या अनेक बैलगाड्यात पाच दिवस मिरवनुक आणि गाव भर रंगांची उधळण ..त्याला चाचर असं म्हणतात. परीक्षा असल्याने तिचाही आनंद लुटता आला नाही ...पण तो रंग तसाच आहे न लागताच मनावर बिंबलेला....


"असा तो.....अवघा रंग एक झाला 

अन् आज मज सी रंगवून गेला "


होलिकोत्सवाच्या शुभेच्छा !!


शरद पुराणिक

240324

Comments

Popular posts from this blog

गौरी गणपती