श्रावणमास शिवपूजन - दिव्यत्वाची अन् दैवत्व प्रचिती

 श्रावणमास शिवपूजन - दिव्यत्वाची अन् दैवत्व प्रचिती 


श्री क्षेत्र गंगाखेड येथे सुरू असलेल्या या दिव्य सोहळ्याची अनुभूती मी फेसबुक live माध्यमातून घेत होतो.  १२ तास काम केल्यानंतर थकलेल्या शरीराला मी गाडीत बसवून फोन चाळत होतो आणि बहुतेक माझा तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण असावा...एरवी संदेश पाहणे आणि कंटाळून फोन ठेवणारा काल जवळपास दोन तास त्या लिंक वरून दूर झालोच नाही.... त्या क्षणांचा उल्लेख करताना भगवद्गीतेतील हा श्लोक संदर्भ म्हणून देतोय..


अर्जुन उवाच 


मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।

योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्‌ ॥ 


श्रीभगवानुवाच


पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।

नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ 


तुम्ही देवाची हात जोडून आळवणी करताना सहज एक भाव मनी प्रकट होतो ...देवा एकदा तरी दर्शन द्या आणि तुमच्या दिव्यत्वाच दर्शन होऊ दे . अन् क्षणात प्रभू नी तथास्तु म्हणावं अन् ते द्यावं...


माझ्या या पूर्वी लिहिलेल्या या प्रतिवार्षिक सोहळ्याच्या अनेक लेखात मी पार्थिव शिवपूजन याचं विस्तृत रूप मांडलं आहेच..तरीही कालच्या अनुभूती विषयी लिहिताना थोडं त्या विषयी...


रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं।

नाना रत्न विभूषितम्‌ मृग मदामोदांकितम्‌ चंदनम॥

जाती चम्पक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा।

दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितम्‌ गृह्यताम्‌ !!


हे प्रभो, रत्ननिर्मित सिंहासन, शीतल जल स्नान, दिव्य वस्त्र, तद्नंतर विविध रत्नविभूषित अलंकार, मृग कस्तुरी सम चंदन, जाई, जूही, चंपा, गुलाब, कमळ, आणि बिल्वपत्र रचित पुष्पांजली, धूप, दीप ....अन कोमल स्वरातील संथ लयीत तुला जो रुद्राभिषेक आम्ही करत आहोत ती आमची सहृदय पुजा तुम्ही ग्रहण करा ....ओम नमः शिवाय....


हे या श्लोकात जस वर्णीलं आहे अगदी तेच किंवा त्या पेक्षाही दिव्य मंगलमय ते सभागृह... साक्षात शिव पार्वती स्वरूप गुरू महाराज आणि माय बाई...समोर भक्तिभावाने अनेक भक्तांनी निर्मित केलेले शिवलिंग... त्यांची सुबक मांडणी.... बाजूला वेदाध्ययन करणारे आणि रुद्राष्टध्यायी मुखोद्गत...संथ लयीत तो पाठ . एक एक श्लोक स्पष्ट स्वच्छ सुरात ... बिल्वपत्राने अभिषेक... असं साधारण तीन तास सुरू असतं..


बरोबर चार वाजता गुरुमाऊली त्यांचा अग्निहोत्र होम आटोपून सभागृहात अवतरली आणि त्या दिव्य सोहळ्याचा श्री गणेशा झाला.  अनेक भाविक, कोणी सपत्नीक, कोणी मुलांसोबत तर कोणी एकटे असे पूजेला बसले. सर्व तयारी सुरू झाली, पाट मांडणे, त्या समोर रांगोळी, फुलं बेल पुजासाहित्य यात मला फार मज्जा येते.


आजचा दिव्य  योग म्हणजे श्री पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड महाराज स्वतः तिथे प्रकटले ...व्वा व्वा काय योगायोग पहा. त्यांनी ही उपस्थिती लाऊन आजच्या या दिवसाला अजून वेगळी ऊर्जा दिली. संपूर्ण पूजा त्यांनी तिथे आसनस्थ होऊन त्या शिवमय प्रदेशात देवत्व अवतार असे भासत होते ... त्यांच्या माध्यमातून माझ्या शिव पार्वती स्वरूप गुरूंचा अभिषेक शिव जी आनंदाने स्वीकारत होते जणू...


आता अभिषेक संपन्नते कडे पोचत होता, फुलांच्या, बेलाच्या, हारांच्या, वस्त्रमाळाच्या टोपल्या तिथे अवतरत होत्या.बाजूला  वाद्ये, टाळ, झांज, संबळ, डफ, असं येऊ लागलं आणि त्यासोबत इतर गुरुजी ही येतच होते. आणि मंत्रांचा आवाज उंचावत होता. समोर शिवपूजा बहुरंगी पुष्पात रसजत होती...आता ती वाद्ये नाद करू लागली अन तो निनाद एका उच्च स्थानावर पोचत आरत्या ही सजल्या,आणि हळूहळू वाद्ये गर्जत गर्जत...धूप दीप झाला आता कापूर आरतीवर येऊन थांबला. 


छत्रं चामर योर्युगं व्यजनकं चादर्शकं निमलं।

वीणा भेरि मृदंग काहलकला गीतं च नृत्यं तथा॥

साष्टांग प्रणतिः स्तुति-र्बहुविधा ह्येतत्समस्तं ममा।

संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो॥


मंत्रपुष्पांजली, शिवमानस पूजा झाली आणि बाळकृष्ण जी नी त्यांच्या आर्जवी स्वरात आवाहन केले...पूजेच्या यजमानाच्या हस्ते द्रविड शास्त्री ना पुष्पार्चंन झाले...अरुण गुरुजींनी त्यांचा  उत्तम परिचय करून दिला...मंत्रांचा जयघोष.. त्यात स्वतः महाराज मायबाई , विद्यार्थी आणि यजमान यांनी असंख्य टोपल्यानी पुष्प अर्चन करून वर दिलेल्या दिव्य दर्शन श्लोका प्रमाने वेगळीच अनुभूती दिली.  


त्या नंतर त्या फुलांच्या वर्षावात आणि मंत्र अर्चनेत व्यापलेले गुरुजींचं ते दर्शन आणि त्या नंतर त्या विश्वात निर्मित भक्तीमय तल्लीनता, शांतता ...अन् नंतर त्यांच्या मुखातून निघालेले आशिर्वचन ...हे म्हणजे दिव्यत्व आणि दैवी अनुभूती....


आज कुठलेही फोटो टाकणार नाही, कृपया खाली दिलेल्या लिंक वर जाऊन स्वतः ती अनुभूती घ्या.


https://www.youtube.com/live/BvsL6xu5_CI?si=u-eDWStK7P9k7Zb2



!! यज्ञ नारायण भगवान की जय !!


!! ओम नमः शिवाय!!


शरद पुराणिक..

०७०८२४

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती