विविधतेने नटलेला कार्यक्षेत्र मार्ग माझा ....
विविधतेने नटलेला कार्यक्षेत्र मार्ग माझा ....
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आशिर्वादाने सुरू होतो
किर्लोस्करांची पुरातन उद्योग नगरी मग मला भेटते
थोडे गल्ली बोळ पार करत मी मार्गस्थ होत राहतो
स्थापत्य विश्वाचा आविष्कार चांदणी चौक लागतो
रुंद जलदगती महामार्गावर पोचतो, सुसाट निघतो
डुक्कर खिंड मागे राहते पण थोडंस दर्शन देते
वेद भवनच्या मंत्र लहरी ही हवेत असाव्यात बहुधा
अशी ऊर्जा घेऊन गाडी आता वेगाला जवळ करते
वळणं, बोगदे, उंच इमारती वळणदार रस्त्याने
शहरिकरणात कात टाकलेले डोंगर दिसतात
बाहेर खाण्यास सोकलेल्या असंख्य खाणावळी
अस्मिता झुगारून पंजाबी, दक्षिणी, बरंच काही
पाषाणच छोटंसं तळं अन विविधरंगी पक्षी
असंख्य गावे कवेत घेऊन आहे हा महामार्ग
त्यांच्या कमानी, पाट्या, शिलेदार ही आहेत
रस्त्यात माझ्या अनेकांचं बलिदान ही आहेच
एका डोंगरावर गौतम बुद्ध ही आहेत बसलेले
अनेक पुलांचे वेटोळे आता दिसू लागतात
बालेवाडीची क्रीडानगरी ही थाटात उभी आहेच
खेळा पेक्षा जास्त लग्न वरातीची आरास आहे
पुढे भरजरी (?) संगणक नगरी हिंजवडी
जी भरते लाखोंची पोटं धष्ट पुष्ट सुटलेली
मुंग्यांच वारूळ बरं अशी वाहनांची तोबा गर्दी
ऊर्जा आता चिडचिड होते पण चालत राहतो
टोलेजंग इमारती घरं हॉटेल की अजून काही
समोर व्यसन, भूक, गरिबी पोसणारे गाळे
गावांच्या खुणा पुसत उभी केलेली बळजबरी
गाववाल्यांच्या मक्तेदारीत मात्र कमी नाही
रस्ता द्रुतगती मार्गाकडे वळतो मला सोडून
देश रक्षक फ़ौज फाटा, आयुध निर्मिती
त्यांच्या वसाहती अन शौर्याच्या काही खुणा
अडगळीत पडलेले काही सरकारी घरं वसाहती
धष्टपुष्ट जवान पायी तर सायकलवर स्वार
गाड्यांची त्यातही लागलेली लांब रंग असते
शांत निवांत असा तो आगळा परिसर आहे
शिकवण, खानावळ, शाळा सारं काही आहे
कौलारू छोटी बसकी घरं दिसू लागतात
अन तुकोबांच्या देहुतून वाहन मार्गस्थ होतात
मी प्रत्येक गल्ली कोपरा वस्ती न्याहळतो
इथे कसे वावरत असतील तुकाराम महाराज
त्यांच्या पुण्याई च्या खुणा, पावलं शोधत
रस्ता विभागतो, नदी च्या पलीकडे दिसतं
साक्षात तुकोबा माऊलींचे मंदिर न कळस
हात जोडले जातात आपसूकच भावभक्तीने
वळणे घेत वाहने वाट काढतात, फोडतात
औद्योगिकरणाच्या चिमण्या दृष्टीस पडतात
शरीर हालचालीस वेग करत, सावरत सार
आता कामाचे डोंगर पादाक्रांत व्हायचे असतात
सकाळच्या कोवळ्या उन्हातले ते रूपडं
संध्याकाळी विजेच्या झगमगाटात चमकतं
कुठे अंधाराचा डाव तर भडक रोषणाई कुठे
थकलेलं शरीर थांब्याची वाट पाहत राहतं ...
...उद्या पून्हा तेच आहे ....चला
शरद पुराणिक, चाकण, पुणे
280523
Comments