गौरी गणपती सण म्हटलं की धावपळ, उत्साहाला उधाण, माणुसकीचा ओलावा, गर्दी, पैशांची उधळण, खायची चंगळ अन कौटुंबिक कुंभमेळा. तसे वर्षभरात अनेक सण येतात. प्रत्येक सण काही तरी वेगळी आठवण साठवून जातो खोलवर मनात... आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. मन भूतकाळात तरंगायला लागतं.. अन एक एक प्रसंग डोळयांसमोर उभे राहतात. महालक्ष्मी चा सण आता काही आठ्वड्यावर आहे, श्रावण आला की तो सणांची एक मोठी मालिका सोबत घेऊन येतो, म्हणून आज ही आठवण झाली. मराठवाड्यात या सणाला महालक्ष्मी, लक्ष्मया, गौरी अशी अनेक विविध प्रांतनुरुप नावं आहेत. हा सण म्हणजे खूप धावपळ विशेषतः स्त्री वर्गाची, पुरुषांसाठी सामानाची ने आन, घर आवरणे, इत्यादी. पण षोडशोपचार पूजा त्या सोबत षोडश पक्वान्न आणि त्या साठीची तयारी या साठी स्त्री वर्गाची पार तारांबळ उडते एवढी तयारी. आमच्या लहानपणी सगळी काका मंडळी दूर दूर गावावरून गावी यायची, आजही अनेक ठिकाणी ते आहेच पण अनेक ठिकाणी ते काळाच्या आड गेलंय. असो, सर्व अगदी सह कुटूंब सह परिवार यायचे. पाहुण्यांशिवाय हा सण तो कसला? सगळ्या जावा जावा, सुना, नातसुना, इत्यादी एकत्र यायच्या अन कामाची चढा ओढ,...
Comments