छुपे रुस्तुम - अनसुने अदाकार ...संगीत मेजवानी
छुपे रुस्तुम - अनसुने अदाकार ...संगीत मेजवानी
संगीत… तुमची गुंतागुंत दूर करण्यात आणि तुमचे चारित्र्य आणि संवेदना शुद्ध करण्यात मदत करते
तुम्ही संगीताला स्पर्श करू शकत नाही, पण संगीत तुम्हाला स्पर्श करू शकते.
आजच्या या इतभर फोन मध्ये गुंतलेल्या जगात चार टाळकी एकत्र आणून वास्तव आयुष्य जगण्याचा एक प्रयत्न म्हणून म्हणा किंवा आपल्यातल्या बुजऱ्या कलाकाराला एक व्यासपीठ मिळाव म्हणून, रोजच्या कडवट अनुभुतीतून मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी अन् त्या निमित्ताने ओठावर आपसूक येणारं दिसणारं अन् अव्यक्त आनंद बाहेर आणण्यासाठी... अशा अनेक उद्दिष्टं भरीत B Unity च्या अनोख्या संगीत रजनीला उपस्थित राहण्याचे भाग्य मित्रवर्य अंकुश राजूरकर आणि मिलिंद खुरसाले यांच्या मार्फत मिळाले. या पूर्वीही एक दोन वेळा गेलो ज्यात मिलिंद ने भन्नाट गाणी गायली, आम्ही त्या वर जरा थिरकलो ...आनंद संचय वृध्दींगत केला.
मी काही संगीताची व्याख्या देण्यासाठी नाही पण संगीताचा जो मुळ गाभा आहे त्यात चपखल बसणारा हा कार्यक्रम म्हणजे ... संगीत, नाद, स्वर, लय, बोल, ठेका, किस्म, तिगुन, चौगुन, तुकडे..या साऱ्यांचा मिलाप झाला ती ही मैफल होती....
प्रस्तावनेतच अंकुश म्हणाला आम्ही हौसे, नवसे, गवसे अशी सारी मंडळी इथे ही सुरावट पंगत देत आहोत....B Unity च्या अनंत उपक्रमात "सा रे ग म" हा ही उपक्रम राबवला जातोय ज्यात दर महिन्यास एक सांगीतिक मैफल सजवली जाते....दर वेळी नवीन चमू, नवीन गाणी, ...तर जे काही हौशी गायक आहेत , ज्यांची सुप्त इच्छा असते मी कधी तरी हातात mic घेऊन, स्वतःत रममान होऊन ...माझ्या झाकल्या डोळ्यासमोर असंख्य प्रेक्षकांची जी गर्दी दिसते आहे त्यांच्यासाठी गाईन असे नवसे....या तून काही ना काही शोधत मिळेल त्या संधी शोधणारी गवसे मंडळी.. यांचा हा संच आहे....
हा एक व्यावसायिक, नोकरदार, सल्लागार, गृहउद्योग, गृहिणी असे सर्व .. अगदी CEO , मोठ्या छोट्या कंपन्याचे मालक ते सामान्य असा एक विलक्षण साधर्म्य असलेला समूह.. त्यामुळे Talent असं ठासून ठासून भरलेलं.... दुर्दम्य इच्छशक्तीच्या जोरावर काहीही करून दाखवण्याची उमेद आणि जोडीला अनंत सह उपक्रम असा सर्वार्थाने "आऊट ऑफ द बॉक्स " ... वयाच्या बाबतीतही तेच अगदी शाळकरी विद्यार्थी ते निवृत्त या सर्व साच्यातली मंडळी एका उद्देशाने एकत्र.
तर परवा शनीवारी अशीच एक मैफल झाली....हिंदी संगीतात असे असंख्य कलाकार आहेत ज्यांनी खरतर दोन चारच गाणी गायली पण ती आज ही रसिक मनात रुजलेली आहेत...ते कलाकार काळाच्या ओघात कुठेतरी हरवले पण त्यांच्या गीतांमधून ते आज ही आपल्या सोबत आहेत हे दर्शवणारी ती theme होती....
रंगमंचा समोरील दोन्ही बाजूने प्रेक्षकातून वाट काढत ते कलाकार अवतरले आणि एका वेगळ्या विश्वात घेऊन गेले.... रेश्मा, सलमा आगा उषा उत्तप, नितीन मुकेश, ....यादी खूप मोठी आहे अशी ती सर्व तर काही हिंदी नायकांनी गायलेली गाणी... बच्चन साहेब,अमीर खान, सलमान खान ....त्या गीतांना आणि त्या काळाला साजेसा पेहराव...तशीच देहबोली ...काही गायक अनुभवी होते .. ताला सुरात पक्के...तर काही नवखे पण काय तो उत्साह, उर्जा... वाह व्वा!!
लंबी जुदाई सारखी काही अजरामर गाणी .. सोबत गाण्याचा प्रवास उलगडून सांगणारं प्रभावी निवेदन...आणि त्या गायकांचा तो जीवन प्रवास मांडत आपल्या ज्ञानात भर पडत जातं होती...आणि त्या सुरात बेधुंद प्रेक्षक.... कजरा रे सारख्या किंवा सर्व उडत्या चालीवर थिरकणारे प्रेक्षक...त्यात होणाऱ्या गमती जमती.... उषा उत्थप च रंभा हो हो ..तर आती क्या खंडला? हे सादर होत असताना ... छाता लेकर जायेंगे पागल समझी क्या मुझ्को.??...अन् मागे छत्री घेऊन संथ नाच करणारी जोडी...तू माईके मत जैयो मत जेयो म्हणत समोर बायकोला उद्देशून गाणं म्हणणारा...असा बहारदार हा कार्यक्रम इंद्रधनू चे रंग उमटवत आमचं आकाश शोभित करत गेला.
इथे कला सादर करणारा, सहाय्य, तांत्रिक बाबी सांभाळणे, रंगमंच व्यवस्था, प्रकाश, ध्वनी, भोजन व्यवस्था...असे सर्व मिळून करतात ते ही आपली नित्य कर्म उरकून...थोडासा वेळ या समुहासाठी काढून...ते गाण्याचा आनंद तर आहेच पण ते गाऊन तुमच्या माझ्या सारख्या श्रोत्यांचे मनोरंजन आणि त्या निमत्ताने एकत्रीकरण असा हा बहु आयामी कार्यक्रम मला नेहेमी भावतो.... पुढच्या कार्यक्रमाची नांदी झाली आणि खूप सारा आनंद पिशवीत घेऊन आम्ही निघालो....
वाह उस्ताद !! मान गये रे छुपे रुस्तम
क्या बात है !!
“संगीत के बिना, सभी का जीवन खाली है।”
“संगीत के बिना, जीवन एक रेगिस्तान से यात्रा के समान है।
शरद पुराणिक
०६०७२४
Comments