आपले सण वार, संस्कृती आणि स्त्री शक्तीचा आधार


 आपले सण वार, संस्कृती आणि स्त्री शक्तीचा आधार 


Disclaimer- सदरील लेख ही बायकोची स्तुती नसून ज्या ज्या भगिनी, मैत्रिणी, वहिनी आणि स्त्रिया या प्रक्रियेत स्वतःला झोकून देतात त्यांना समर्पित.  


परवाच  एक दुःखद घटना झाल्यानंतर घरी सण वार अशी धावपळ सुरू झाली. गौरी गणपती हे सर्वांच्याच घरी अत्यंत थाटामाटात साजरे होतात. त्याची तयारी ही तितकीच अगोदर सुरू होऊन ही शेवटपर्यंत संपत नाही..


पण आमच्या कडे या वर्षी वेगळाच विषय होता आणि तो म्हणजे सौ अनिता स अचानक गुडघ्याचा त्रास सुरू झाला...एक दोन दिवस बरे होईल म्हणून घरगुती इलाज केले पण शेवटी डॉक्टर गाठावेच लागले ....आणि  सर्व तपासण्या नंतर जे कळले ते ऐकून अवाक झालो ....तिच्या दोन्हीही गुडघ्यांची पूर्णतः झीज झालीय....पायऱ्या वापरायच्या नाही, धावपळ एकदम बंद . उठ बैस ही बंद ... खरतर इतकं काही होईल असं वाटलं नाही ...पण घडलं हे मात्र खरं.... एखादी सतत चालणारी मशीन एकदम थांबावी...अन् आता पुढे काय होईल हा विचार मी करेपर्यंत ती नेहेमीप्रमाणे  आमच्या पुढे जाऊन विचार करणारी ती कसली गप्प बसतीये  ....physio चे नंबर शोधले.... उपचार सुरू ही केले....इकडे आम्ही चिंतेत आता हा एवढा मोठा सण...काय होईल कसं होईल... बर सणाच जाऊ द्या आमच रोजचं जीवन  बदलून गेलं..अशी भावना....किती स्वार्थी असतो आपण ... तिच्या तब्येती  पेक्षा  आपली व्यवस्था याचाच विचार करतो....जी आपल्यासाठी आणि अख्ख्या कुटुंबासाठी राब राब राबून, जीवाचा आटापिटा करून .... सतत फक्त तुमचा, तुमच्या घरातील माणसांचा विचार करत राहते.... इतकं करते की ज्या वयात बाहेरचं जग पहायचं त्या वयात अशी पायांच दुखणं घेऊन बंदीवान झालीय... दोष् कुणाचा.... तिचा, आपला, सभोवतालच्या परिस्थितीचा की .... संस्कृतीने स्त्रित्वावर लादलेल्या  जबाबदारीचा...की अजून काही ...


आम्ही पुरुष फक्त पैसे कमावतो आणि त्याच आविर्भावात असे काही जगतो की बस हम ही सब कूछ है ....पण वास्तव फार वेगळे आहे.  तुम्हीच दिलेल्या त्या तटपूंज्या बजेट मध्ये घर चालवून शिल्लक ठेऊन अडी अडचणीला तुम्हालाही मदत करते ती त्या घरची लक्ष्मी.  बाजार हाट, आहेर देणे, महिनाभर च संपूर्ण नियोजन. प्रत्येक सण वार, त्यासाठी लागणारे साहित्य आणण्यापासून ते संपन्नता होऊन सर्व पुन्हा जागच्या जागी जाईपर्यंत तिला उसंत नसते.


आता आमच्या कडे तर ही शारीरिक व्याधी आल्याने आम्ही काहीतरी करू असं म्हनुन मी ऑफिसला गेलो, रात्री उशिरा आलो तोवर  फिजओथेरपिस्ट कडून येतानाच ती आणि मुलं जाऊन गणपती मूर्ती, पूजेचं साहित्य, मोदक, दुर्वा, फुलं , हारं , मखर आणून,  आरास पूर्ण करून ठेवली. पूजेचं सर्व साहित्य एका ट्रे मध्ये अगदी विड्याची पानं, सुटे पैसे, गुलाल, शेंदूर, कापूर, आरतीच्या वाती निरांजनात घालून त्यावर तूप ही होत.   


सकाळी शुचिर्भूत होऊन फक्त पूजेचं पाणी घेऊन "स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा: स्वस्ति ना: पुषा विश्व वेद:"  गंध लावून आयतोबा सारखा पूजेला बसलो....एकही गोष्टीसाठी मला अगदी जागच ही हालाव लागल नाही....तरी ही कापूर आरती मध्ये अक्षता का टाकल्या नाहीत या वरून मी जाब विचारलाच ...ही  पुरुषी वृत्ती.... निषेध केला मी स्वतःच स्वत:चा .


गणपतीं घरात गौराईची वाट पाहतच होते, कारण ते अगदी दोन दिवस राहून जातात... गौरींची तयारी ती ही एकटी कशी करणार... मातोश्री आहेत पण ती ही आता ८५ वर्षांची...बसण्या उठण्या ची अडचण ...तरीही जमेल ती मदत करते....त्या मुळे जाऊ द्या सर्व ऑर्डर देऊन घेऊ अस मी वारंवार  सांगत होतोच, चर्चा संपे पर्यंत तर अर्ध्या अधिक गोष्टी तयार होत गेल्या.  दोन प्रकारचे लाडू, चकली, करंजी, अनारसे, साटोरी, साधी पुरी ..आधी बोलली अगदी थोड थोड करते...पण कसलं काय आज ही रोज डब्यात मी विविध पदार्थ घेऊन  जातोय तरीही डब्बे काही बुडाला गेले नाहीत.  ही शक्ती आणि स्वत:च्या तब्येतकडे दुर्लक्ष करून, डॉक्टर चा सल्ला धुडकावून टाकण्याचं हे सामर्थ्य येतं कुठून हा प्रश्न.....


आता पुढचा प्रश्न होता की गौरी पुजेचा स्वयंपाक...मी तिला ऑफर दिली ...तू फक्त  खुर्ची टाकून बैस आणि मार्गदर्शन कर मी सर्व करतो ..ती फक्त हो म्हणत राहिली...त्या ही पेक्षा गंभीर विषय होता गौरींच्या साड्या अन् पूजेची मांडणी....आम्ही काय आसन टाकलेलं असतंच... त्यावर बसून पूजा करायची अन् हे करताना जेवढं  शक्य आहे तेवढ्या order सोडायच्या अन् फक्त आपण शेठ अन् बाकी सर्व कामगार असा अविर्भाव.... एरवी मला सुटी असते पण या वर्षी कार्य बाहुल्य मुळे सुटी रद्द....हे असं नेहेमी होतं जेंव्हा आपल्याला गरज असते तेंव्हा सुटीची आडकाठी असते..गौरी आवाहन पूजेच्या दिवशी संध्यकाळी घरी आलो तर फक्त मुखवटे ठेऊन पूजा सुरू होण्यापर्यंत  ची सर्व तयारी तशीच होती जसं मी गणपती च्या पूजेचं वर्णन केलं....


मग मी दरम्यान इतरांचे स्टेटस पाहत होतो तर माझ्या काही मैत्रिणी, वहिनी, बहिणी ज्या नोकरी करतात, काही परगावी बदली पण स्वतःची नोकरी व्याप सांभाळून हे सर्व करण्याची इच्छा, शक्ती आणि ते ही आनंदाने करताना त्या साऱ्या लक्ष्मी रूपाची च पूजा व्हावी खरतर.  ही स्त्री शक्ती असामान्य म्हणून च नवदुर्गा, गौरी, लक्ष्मी, सरस्वती अशी तिची दिव्य रूपं मला नेहेमीच अचंबित करतात. आपसूक मी नमस्कार करतो.  त्यातही काहीं ठिकाणी वयस्कर सासू सासरे, कोणी आजारी ...आई वडील आजारी किंवा वयस्कर तो सर्व व्याप आनंदाने सांभाळून प्रत्येक सणाला सामोरे जातात... त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं.  याच सोबत कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकट क्षणी संकट मोचक म्हणून उभ्या राहतात. सुख आनंदाच्या क्षणी मागे मागे करत राहत उगाचच आपल्याला खोटं श्रेय देतात.... कसं निभावतात हे सारं. आणि हा निस्वार्थ ...सर्व काही कुटुंबासाठी हा स्थायी भाव यांच्या अंगी भरभरून आहे.


आता अनेक ठिकाणी पुढची पिढी ही परदेशी आहे, तर काही स्नुषा नोकरीवर जातात  त्यामुळे हवा तसा वेळ इच्छा असून ही देऊ शकत नाहीत त्या माझ्या मध्यमवयीन आई / सासू यांची तर होणारी तारांबळ तर विचारूच नका.  


बरं ही काही एक दिवस किंवा एकदाच होणारी गोष्ट नव्हे.

..गुढी पाडवा, संक्रांत, श्रावणमास नैमित्तिक उपासना, रक्षा बंधन,  नवरात्र, दिवाळी,  दसरा आणि वार्षिक कुलधर्म कुलाचार ..पितृ पक्ष, श्राद्ध..या सर्व गोष्टी त्याचं तन्मयतेने करणाऱ्या या स्त्रि शक्तीच्या सन्मानार्थ हा शब्द प्रपंच....हा शब्दांचा सुमनपुष्प  गजरा त्यांच्या त्या लक्ष्मी रुपास सविनय सादर. घरात, आप्त इष्ट इथे होणाऱ्या प्रत्येक कार्याचे चोख नियोजन फक्त याच आणि याच करू शकतात. आज तो विषय फार विस्तृत रुपात न मांडता पुढे जाऊ. 


असो...तर गौरी पूजनाचा दिवस आला ..मनातल्या मनात कुठला पदार्थ कसा बनवायचा या विचारात मी असतानाच आमच्या गृहलक्ष्मी शुचिर्भूत होऊन....गॅस वर रांगोळीचा स्वस्तिक काढला अन् जे काही सुरू झाली ...चार दोन वेळा तिला बसण्याचा आग्रह केला, तिथे स्टूल  ही टाकला...पण कसल काय .....(सोबत तो व्हिडिओ आवर्जून टाकतोय.... जाहिरात म्हणून नाही ....त्या उत्साहा साठी)...एरवी बारा नंतर होणारा तो चारी ठाव स्वयंपाक साडे अकरा लाच तयार.... नैवेद्य वाढायला घेतले ... आरती सुरु होणार त्याचं क्षणी दोन्ही सुवासिनी दारी उभ्या... आरती झाली अन् नंतर प्रार्थना म्हणताना मात्र मला प्रत्येक श्लोकात भरून येत होतं...या अफाट शक्ती आणि ही दैवी रूपं अशी सतत आपल्या सोबत असतात त्याची प्रचिती ही अशी असते....त्या क्षणी समोर उभ्या असलेल्या गौरींकडे लक्ष गेलं अन् त्यांच्या चेहेऱ्यावर उमटलेली प्रसन्नता पाहून ते पुन्हा पटलं.... ज्याच्या त्याच्या श्रद्धानुरुप सेवनुरुप त्याला त्याला विवध रुपात ही प्रचिती मिळत असते... ती पाहण्याची दृष्टी असावी एवढंच. 


काही ठिकाणी सून जावा नातवंडे येतील या  प्रतीक्षेत  कंबरेत वाकलेली गावाकडची माउली त्या येणार नाहीत हे कळल्यावर ही पदर खोचून तयारीला लागते ....पण मला खात्री आहे तिच्या मदतीला गौराई स्वतः येत असावी.... अन्यथा हे अशक्य ही शक्य होत नाही. 


या शक्ती मुळेच कुटुंब व्यवस्था, संस्कृती , आपलेपण आणि परंपरा या पिढीतून त्या पिढीकडे जाताना अजून सशक्त, समृध्द होत जात आहेत.  


ज्या घरात आम्ही जन्म घेतला अर्ध आयुष्य काढलं त्याचं घरातले रीती रीवाज लग्न करून आणलेली धर्मपत्नी शिकवते, त्याची उजळणी करून घेते.... एवढंच नाही ज्या घरातून आपल्या घरात आलीं त्या घरचे संस्कार रीती ही तिकडच्या लोकांना आठवणीने सांगत राहते.....


घरच्या लेकी बाळीचे माहेरपण करते ...तिला भलेही साडी चोळी न व्होवो पण त्यांना करण्यासाठी आग्रह करते ....ती खरी लक्ष्मी आणि तिचा खरतर  एक वेगळा सण व्हावा ही माझी मनोमन इच्छा.... संस्कृती जपणारा हा  आधार स्तंभ सजवावा म्हणून हा शब्द प्रपंच.  खाली नमूद केलेले  सर्वांना माहीत असलेले लक्ष्मी अष्टक माझ्या या भावनां सहित त्यावर सोन चाफा म्हणून वाहतो...


नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।

शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।।


नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयज्र्रि ।

सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि ।

सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि ।

मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि ।

योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे ।

महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि ।

परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते ।

जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। 


जय जय महालक्ष्मी आई वससी व्यापक रूपे तू सर्वा ठाई!!


शरद पुराणिक 

१५०९२४

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती