वैकुंठ एकादशी...तिरुमला... ते 33 तास...सुटलेले हात
वैकुंठ एकादशी...तिरुमला... ते 33 तास...सुटलेले हात
ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।
ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।।
वरील मंत्र हा भगवान श्री विष्णु यांची प्रार्थना रूप आहे.... खरंतर आजच्या या लेखात याचा उल्लेख अगदी सहज केला, कारण या लेखाचा विषय वैकुंठ एकादशी ...त्या निमित्ताने आम्ही मित्र तिरुपती ला जायचो त्या आठवणी आणि काळ आमचे काही सोबती घेऊन गेला त्या विषयी आहे.
काल तिरुमला ची रोषणाई, विविध रंगी फुलांनी केलेली सजावट असे सर्व फोटो पाहिले आणि मला आम्ही याची देही याची डोळा साक्षात अनुभवलेली "वैकुंठ एकादशी" आठवली.
आम्ही अंबाजोगाईकर मित्र दर वर्षी एकत्र येण्यासाठी म्हणून तिरुपतीची एक यात्रा म्हणा, ट्रिप म्हणा किंवा अजून काही ज्या निमित्ताने सोबत प्रवास, चार दिवस राहायचं, मज्जा मस्करी असं सर्व एकत्रित करायचो.
नितीन जोशी जो आज नाहीये ...तो याचे चोख नियोजन करायचा... तो गेला अन ही यात्रा ही नंतर काही घडली नाही....साधारण जानेवारी महिन्यात हा कार्यक्रम असायचा... एक वर्षी आम्ही तिरुपती ला पोचलो आणि स्टेशन पासून सर्व दूर प्रचंड गर्दी.... परिसर सजावटीने लक्ख ..गोविंदाच्या नाम घोशात कपाळी साक्षात व्यंकटेशाला लाऊन...लुंगी वरचे आणि इतर लाखो भाविक यत्र तत्र सर्वत्र. वाट काढत आम्ही हॉटेल वर पोचलो....होय आम्ही नेहेमी खाली तिरुपती त राहायचो कारण वर तिरुमला राहिलं तर व्रत वैकल्य होत नाहीत.... तयार होऊन दर्शनाची रांग शोधत पोचलो तर काय....त्या दिवशीचा दर्शन कोटा पूर्ण झाला होता आणि सर्व दर्शन हॉल, मंदिर परिसर, आत बाहेर... अगदी मंदिराच्या बाहेर समस्त तिरुमला ला वेटोळे करत ती रांग बाहेर पर्यन्त होती....अनेक अयशस्वी प्रयत्न करून आम्ही परत हॉटेल वर आलो....आता दर्शन कसे होईल काय होईल...की नाही अशा अनेक सुफळ निष्फळ चर्चा... Rummy चा रंगलेला डाव....आनंद पश्चात्ताप.. गमती जमती करत दिवस उतरणीला लागला....परतीची तिकिटं उद्याचीच होती त्यामुळे द्विधा....पण जेवन आटोपून आम्ही रात्री उशिरा काही घडतय का ते पाहू म्हणुन पून्हा बारी पहिली, चित्र बदललं नव्हतंच, उलट अजुन अजून गर्दी वाढत होती...उद्या वैकुंठ एकादशी म्हणून ही तो भक्तीचा महासागर तिथे होता...
रात्रीचे साडेअकरा वाजले... आणि जिथे दर्शन बारी सुरू होते त्या बाहेर थंडीत लोक बसून होते, नंतर कळलं रांगेत जाण्याचा तो एक मार्ग होता....अनेक कसरती करत, एक एक जण आम्ही त्या गर्दीत मिसळलो अन आता काही तासात दर्शन होणार हा आनंद वेगळा होता...जो जास्त काळ टिकला नाही , कारण रात्र भर आम्ही कसेबसे पहिल्या दर्शन खोलीत शिरू शकलो.... प्रत्येक हॉल खचून भरलेला.. रात्र उलटून गेली दोन चार तास उलटून आम्ही दुसऱ्या हॉल मध्ये जायचो.. सोबत ढोला पश्या ...प्रशांत वैद्य ज्याला diabetis होता आम्हाला त्याची काळजी होती....त्याच्या सोबत काही dryfruits biscuits असं होतं.. माझ्याजवळ ही मिक्स dryfruits बायकोने भरुन दिलेले सोबत होतेच....दिवस उगवला ...दुपार ही झाली तरी आम्ही रांगेत होतो..... पण आता मागे जाणं शक्य नव्हतंच.... किती चाललो होतो कल्पना नाही....ती रांग थांबली की बसून घ्यायच..गर्दीतल्या गमती जमती आणि वैकुंठ एकादशी चं आमचं ज्ञान वाढतंच होतं....हा एकच दिवस मंदिरातील वैकुंठ महाद्वार उघडतात (बाकी माहिती गूगल करू शकता)... चिडचिड..., आनंद... गंमत....आणि या साऱ्यात सोबतची ती लाखो लोक पाहून काही तरी दिव्य घडतय असं मनात कुठंतरी वाटुन जात होतं....रात्र झाली, आम्हाला रांगेत 24 तास होऊन गेले होते ....बरं दर्शन होणार या आशेने चालत होतो...मधेच उपिट, दुध कॉफी भात असं काही काही खायला येतच होतं पण सर्व विधीवर नियंत्रण राहण्यासाठी खाण्यावर ही बंधन होतंच.... मंदिर आता टप्य्यात दिसू लागले...
रात्री दोन वाजता मंदिराच्या मुख्य दारापाशी आम्ही पोचलो अन "गोविंदा गोविंदा" गजर पुन्हा नव्या जोषाने त्या वातावरणात मिसळत होता.... मंदिरात आलो एकदाचे....दिव्य तेजोमय विलोभनीय ते व्यंकटरमण रुप डोळ्यात साठवल....अन लगेच वैकुंठ महाद्वारी पोचलो.... साक्षात स्वर्ग की काय इतकं अद्भूत अभूतपूर्व विहंगम (शब्द कमी आहेत) ते दृश्य ...पदोपदी ईश्वर साक्षात्कार अनुभवत आम्ही ते विलोभनीय दर्शन घेतलं आणि तीस तासांची ती तपश्चर्या फळाला आली ...फोटोतुन आपण ते अनुभवू शकता....
परतीच्या मार्गावर प्रसाद घेऊन एक अजून मोहिम फत्ते करायची होती ती म्हणजे प्रसादाचे लाडू.... तिथे ही तीच परिस्थिती....कसेबसे लाडु मिळवले.... मंदिरासमोर तेवढ्या पहाटे एक ग्रूप फोटो काढून त्याची प्रिंट ही घेतली ....चपला कुठे होत्या, फोन कुठे होते हे आम्ही विसरलो होतो कारण दोन दिवस त्या गर्दीत कशाचा कशाला ताळमेळ नव्हता ....परतीची तिकिटं नव्हती....जे मिळेल ते असं ठरवून प्रथे प्रमाणे इतर सारे दर्शन घेऊन हॉटेलात.... जणू एक लढाईच जिंकली होती....दोन दिवस आमचा त्या विश्वा व्यतिरिक्त इतर कोणाशीही संपर्क नव्हता...
असा तो भव्यदिव्य वैकुंठ दर्शन सोहळा ज्याच्या मुळे घडला तो नितीन, diabetis असुनही संपुर्ण वेळ आनंदात चालत राहिलेला प्रशांत वैद्य ....आणि क्षणोक्षणी गमती घडवणारा मिट्टया ...श्रीपाद हे तिघेही आमची साथ सोडुन गेले ...आणि आमची यात्रा ही परत घडलीच नाही....असो ...
एक विलक्षण अनुभुती होती तीस तासांहून अधिक काळ रांगेत असण्याची......एक आवर्जुन सांगतो या काळात जात असाल तर सर्व नियोजन करून जा अन्यथा अशक्य आहे दर्शन... राहणं... फिरणं...
सोडून गेले तरी सोबतच असलेल्या आणि सोबत असणाऱ्या साऱ्या मित्रांना समर्पित....."गोविंदा गोविंदा"
शरद पुराणिक
110125
Comments