फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा....बहरलेल्या वेली वरची कळी फुलली अन दुसऱ्या घरी सजलीये..!!
फिर वही दिल लाया हूं....एक अविस्मरणीय विवाह सोहळा....बहरलेल्या वेली वरची कळी फुलली अन दुसऱ्या घरी सजलीये..!!
परवाच एक दिव्य, अद्भूत विवाह सोहळा अनुभवला. तसं तर हल्ली सर्वच सोहळे दिमाखात साजरे होतात, पण कालच्या या सोहळ्याचं विशेष कौतुक. कारण तो हृदयाच्या कुपीत घर असलेल्या एका मित्राच्या मुलीचा. मी आणि संजय पिंपळकर 1989 साली सोबतच तेंव्हाच्या औरंगाबाद मध्ये आणि आताच्या संभाजीनगर मध्ये एकत्र आलो.... अंबाजोगाई वरून आम्ही दोघेही इथे पोटापाण्यासाठी आलो होतो. ..आमचा तो प्रवास मी काम धंदा, पोटपाणी आणि बरंच काही या लेखातून विस्तृतपणे मांडला होता... पण त्याचा धागा धरून ती माळ तशीच ओवतो.
साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातील आम्ही अगदी सामान्य जीवन जगत होतो, पण मैत्रीचा धागा तलम रेशमी श्रीमंत होता. या धाग्यात एकत्र विणलेले सुहास जोशी, सुनील देशपांडे, विश्वास जोशी, संजय पिंपळकर, मदन देशमुख, प्रशांत कुलकर्णीअसे बहुरंगी धागे त्यामुळे ती वीण अगदी घट्ट, डेरेदार, मजबुत आणि सुंदर होती,आहे आणि राहणार. आमचं सर्वांचे नातं तर विचारूच नका. म्हणजे मुलगी पाहणे, बोलणी, साखरपुडा, लग्न, पहिली अन दुसरी बाळं जन्माला येत असताना ...आणि या प्रवासात प्रत्येक सुखदुःखात आम्ही कायम सोबतच राहिलो. पण आज या रत्नजडित रेशीम धाग्यावर त्या काटेरी आठवणींना फार न गोंजारता पुढे जाऊ. प्रतिकुल नाही पण आहे त्या परिस्थितीत मुलांना योग्य शिक्षण, मार्गदर्शन देऊन ती कालची पाळण्यातली बाळं आज बोहल्यावर सजताना आंतरिक आनंदाला पारावार नाही.
सायलीच लग्न ठरल्यापासून ते अगदी परवा पर्यंत संजय चे सतत निरोप, फोन आणि आग्रह असं सुरूच होतं. खरंतर एवढया आग्रहाची गरजच नव्हती, पण तो जिव्हाळा आणि आपलं सुख आपल्यातच वाटण्याची मनोमन इच्छा त्याला स्वस्थ बसवू देत नव्हती. आणि इथेही साखरपुड्यापासून आग्रहाचे निमंत्रण होतेच. त्याचा तो आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही कार्यस्थळी पोचलो. दिसताक्षणी चमकलेल्या डोळ्यांनी एक घट्ट आलिंगन देऊन ती अर्धवट आसवांची ओघळ थोपवुन एक मस्त चहा घेतला. बरं संजय एकटा नाही तर त्याची सर्व भावंड चुलत मालत सर्वच जवळचे ....कारण हे नाते मैत्री पलिकडचे...अशी सर्वांची भेट घेत घेत स्थिरावलो...
स्वतः संजू आणि सौ अर्चना वहिनी जातीने सर्व व्यवस्था चोख पाहत होते, ती त्यांची लगबग, उत्सुकता, आनंद, उत्साह मी सोफ्यावर बसून न्याहाळत होतो. .
..क्षणातच तो परिसर पुन्हा नव्याने नटला. एक भव्य, सुंदर, सुबक, आकर्षक मंडप, व्यासपीठ , त्यावर रोषणाई अजुन भर घालत होती... व्यासपीठावर सीमांत पुजन, वागगनिश्चय असे विधी सुरु होते..विधी होता क्षणीच त्याच ठिकाणी भव्य संगीत रजनी सजली ...पुन्हा आम्ही अक्खा समुह, बायका, पोरं अन फोटो, मध्येच काही गमतीदार किस्से असं सुरू असतानाच वाद्यांचा गजर झाला अन सायली न शुभमची धमाकेदार एंट्री झाली... आकर्षक मार्गिका, संगीत, हलकेच नृत्य आणि प्रेमाची उधळण, सोबतीला बहुरंगी आकर्षक फटाके....भारावलेल्या धुंद लहरित दोघेही त्या स्थळी पोचले. . मित्र, मैत्रिणी, भाऊ बहिणी, आई मावशी काकू असे दोही अंगी सारेच थिरकले. सायली-शुभम या जोडीने बहारदार नृत्य सादर केले.. ....मुला मुलींचा तो सोहळा कौतुकाने आई बाप अनुभवत होते...आनंदाच्या अन मुलगी आता त्याची होणार या दुःखाच्या अश्रूंनी आई बाप आणि आम्ही साऱ्यांचच मन आंतरिक ओलं झालं ....... बाजूला विविध खाद्य पदार्थ सजले होते... . खवय्येगिरी ची मांदिआळी ..करत आम्ही पुन्हा निवासस्थानी पोचलो.... अर्थात पुन्हा फोटो, विडिओ हे न विसरता..सायली आणि शुभम आणि दोन्हीही परिवाराच्या नियोजनालाला सलाम...ज्या नाविन्यपूर्ण शैलीने त्यांनी हा सोहळा आयोजित केला या साठी त्यांचे विशेष कौतुक.
हल्ली मी पाहतोय, अनुभवतोय की आमच्यासारखी 50 तली मंडळी या सोहळ्यांचा निर्भेळ आनंद लुटतात, अगदी तरुणाईला लाजवेल इतका उत्साह, चैतन्य ....याला कारण म्हणजे सोबत असणारा परीस स्पर्श, अन भोगलेले दुःख, कटू प्रसंग यात विसर्जित करून जीवनाला खळखळाट निर्माण करत नव्या उमेदिने जगण्याची एक संधी ....अगदी तसंच आम्ही सारे याचा आनंद लुटत होतो. आणि मूळात या साऱ्यांचा आनंद लुटावा या साठीच तर ते selfie points आणि झगमगाट केलेला असतो ....नवरा नवरी सोबत आपणही नटण्याचा तर हा सोहळा असतो ....हाय काय अन नाय काय.
दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच आवरून सावरून हजर, सूलग्न, विधी, बारात, अन अनेक ओळखीचे चेहेरे, हस्तांदोलन, गळाभेट अशा एका पुनरुज्जीवित स्वतःला घेऊन मिरवत, दंगा मस्ती अगदी शाळा कॉलेजात करतो तशीच असं होतं...आम्ही बॅक बेंचर्स मनमुराद गप्पा... कुटाळ्या ... विश्वास म्हणजे एक अजब रसायन आहे...एक मस्त मौला कुठेही आणि काहीही जोक करू शकतो .... इतक्यात बँड वाजला ...गाणे वाजले तसा अगदी राजेशाही थाटात नवरदेव आले.....अन् गुलाबानी सजलेली एक डोली नवरदेवाच्या दिशेने मार्गस्थ झाली...त्यात लाल भरजरी महावस्त्रात सजलेली सायली पहिली अन् मन पुन्हा काळा मागे गेलं... आमच्या समूहाच्या प्रत्येक सदस्याच्या अंगाखांद्यावर खेळलेली ती ..संजू अर्चना वहिनीच्या वेलीवरची आकर्षक कळी, सुंदर फुल उमलून आज दुसऱ्या वेलीवर जाणार...ही भावना मन खट्टू करून गेली...
सुंदर संगीत .. विविधरंगी वेश भूषेने सजलेला तो परिसर....आनंद लहरीत मंगलाष्टके झाली.... पुन्हा वाद्य, फटाके.. खाद्यभ्रमंती सुरू झाली...
हल्ली सुलग्न आणि विधी अगोदरच होतात....कन्यादान...कुठल्याही विवाह प्रसंगी हा विधी पाहताना मी व्याकूळ होतो.... लाडात वाढवलेली आणि काळासोबत घराचा आधार होत ...आपल्या प्रत्येक सुख दुःखात बरोबरीने, हिमतीने साथ देणारी मुलगी..हात पसरून व्याही परिवाराला दान करायची... डोळ्यात आसव साचतात....दुःख आनंदाच्या संमिश्र भाव, गुरुजींचे मंत्रोच्चार..ती मुलगी सासरी जाणार या दुःखात असणारे वधुपिता आणि माता दुःख डोळ्यांत ठेऊन ती त्यानं दान करायची....
जेवणावर यथेच्च ताव मारून संजू आणि वहिनींना पुन्हा भेटून ...फिर मिलेंगे रे ...आवाजात घोगरा स्वर, हस्तांदोलनादासाठी जड हात पुढे, गच्च गळाभेट अन पुन्हा ती आसवे थिजवून निघालो आपापल्या घरी.....
या धाग्यात नवीन धागे ही आपला रंग मिसळून त्याची सुंदरता वाढवत आहेत...ते सुनील चे व्याही, श्री नितीन पेडगावकर आणि सौ स्मिता वहिनी यांच्या आग्रही निमंत्रणावरून त्यांच्या डौलदार बंगल्याकडे सर्व वाहने निघाली...चहा पान, पुन्हा गप्पा टप्पा करून दोन दिवस सजलेली ती मैफल भैरवी कडे वळली.... पुन्हा नव्या मैफिलीच्या प्रतीक्षेत...
शरद पुराणिक
081224
Comments