वारी - एक दिव्य अनुभूती - काया वाचा मन सिद्धी






वारी - एक दिव्य अनुभूती - काया वाचा मन सिद्धी 



संतकृपा जाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे रचिले तें आवार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।

तुका जालासे कळस । भजन करा सावकाश ।।


गेली अनेक वर्षे राहून गेलेली एक संकल्प पूर्ती या वर्षी झाली. ३० जून रविवार आणि वाढदिवस असा एक योगायोग आणि त्याच दिवशी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपुरी निघण्याचा तो दिव्य मुहूर्त.....एरवी तेच पक्वान्न भोजन नवनवीन कपडे आणि केक असा वाढदिवस करण्यापलीकडे आपण तरी काय करतो .. तेंव्हा बायकोला विचारलं चल या वर्षी आळंदी ते पुणे पायी वारी अनुभवू....ती तर साक्षात चैतन्य मूर्ती, लगेच हो म्हणाली. कुठल्या समूहाचा काही संदर्भ लागतो का पाहिलं, अन् IT Dindi चा संपर्क झाला.  


जुजबी सेवा शुल्क भरून जन्मदिनी ब्रम्ह मुहूर्तावर स्नान उरकून पहाटे ३.५० ला कर्वे पुतळ्या पाशी येऊन थांबलो...समोर चार दोन शुभ्र वस्त्रात काही मंडळी उभी होतीच.... पाहता पाहता ती संख्या ५० च्या पुढे गेली...एका मागोमाग एक बसेस आल्या आणि एकंदर सर्व मिळून १६०० वारकरी त्या दिंडीत सामील झालो... आळंदीच्या अलीकडेच आम्ही उतरलो आणि एका दिव्य अनुभूतीच्या साक्षात्कारी सोहळ्यास सुरुवात झाली...


IT इंजिनीअर्स, ceo, मालक अश्या विविध हुद्द्यावर असलेले हे लोक आज वारकऱ्यांच्या भूमिकेत असे काही सजले होते विचारू नका....नियोजन, शिस्त , आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, भक्ती आणि सेवा अस बहुआयामी ते रूप ... शुभ्र वस्त्र, कपाळी चंदन टीळा, ध्वज पताका, टाळ, चिपळ्या, अभंगाचे मोहित करणारे सुर आणि त्या सुरात सुर मिसळून भक्ती भावाची उधळण..... अहाहा काय मोहित करणारं ते वातावरण....तुम्ही कल्पना करा त्या ध्वनी लहरींची...झांज, टाळ, मृदंग, चिपळ्या यांचा तो एकत्र करणारा नाद अन् त्यावर देहभान हरपुन थिरकणार शरीर ज्यान आपलं स्वत्व हरवून तो देह विठ्ठल चरणी लीन केलं.....


भान हरपून खेळ खेळतो,

दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा…

भक्तिने भारलेला रिंगण सोहळा,

पाहावा याचि देही याचि डोळा…


राज महाल हॉटेल ला न्याहारी ची सोय होती पण १६०० लोकं... रांगा लावल्या अन् न्याहारी, चहा (या चहाची चव जणू अमृत - हे अशासाठी एवढ्या लोकांचा चहा तयार होता पण फक्कड झाला होता)....तो वर समोर पटांगणात रिंगण सुरू झाले ...समोर दिंड्या मार्गस्थ होत होत्या... त्यांची तो भजन, नाम संकीर्तन आमच्या या सुरात मिसळत होती...code लिहिणारी लोकं अभंग गात होती...एरवी शिस्त सांगणारा साहेब तल्लीन होऊन नाचत होता...yes sir, yes,madam निघणाऱ्या मुखातून फक्त हरिनाम विठ्ठल माऊली हे उच्चार.... हसण्यासाठी व्यायाम करायला लागतो ज्यांना ते चेहरे असे प्रफुल्लित झाले होते की ते स्मित आनंदी हास्य आपसूक उमटत होत....त्या गर्दीत कुठे तरी "कर कटेवरी" ठेऊन पांडुरंग हसत पाहत असेल नक्की. 


आता साक्षात माऊलींची पालखी मार्गस्थ होणार होती.... माऊलींचा अश्व ज्यावर माऊली स्वतः असतात ते दिसत नाहीत, आपण अनुभवायचे असतात...सोबत दुसरा अश्व, बैलगाडीत नगारा आणि २७ दींड्या माउलींच्या पालखी अगोदर असतात....त्या प्रत्येक दिंडीत विणेकरी, टाळकरी, आणि शेकडो किलोमिटर डोक्यावर आनंदाने तुलसी वृंदावन घेऊन माझ्या असंख्य माता भगिनी...तेच हास्य तिचं उर्जा चैतन्य...काही वासुदेव तर काही जण विविध रुपात ती सेवा...आम्ही त्या प्रत्येक दिंडीत थोडं थोडं योगदान देत कधी माऊलींची पालखी येते या प्रतिक्षेत.. फुलांनी सजलेला तो रथ आला...त्या महा जन सागरात ते दुर्लभ दर्शन...हात जोडले....आणि आमची IT दिंडी त्या सागराच्या प्रवाहात मिसळली....


रस्त्याच्या दुतर्फा कुठे पाऊल ही ठेवायला जागा नाही एवढी गर्दी आणि त्याच्या मधोमध भाव भक्तीने न्हाऊन निघत चाललेलो आम्ही...उन पाऊस वारा अशा सर्व नैसर्गिक लहरींची ही भेट ...आणि अक्षरशः फुटा फुटावर दान धर्म करणारे भाविक ....कोणी केळी वाटतोय, कोणी बिस्कीट, राजगिरा लाडू, चिक्की, चॉकलेट, पाणी, कुठे जेवण, कोणी छत्री तर कोणी रेनकोट , नवीन भेटी म्हणजे मोबाईल साठी waterproof pouch.... चहा, कॉफी आणि अगदी अगदी मोफत... पण हे ज्यांच्या साठी वाटलं जातं त्यांना यात रस नसतो...पण फक्त या साठी ही आलेली काही लोकं आहेत जे हे दान घेऊन पुढच्या काही दिवसाची तजवीज करत असतील ..असो माऊलींची कृपा होऊन हे ही जगतात...हेच नियोजन असावं त्याचं....पण एक आवर्जून सांगतो हल्ली दान देणाऱ्यांची, सेवा देणाऱ्यांची संख्या इतकी वाढली हे पाहून मन भरलं...अगदी साधी साधी माणसं, स्त्रिया मुलं वारीच्या संपूर्ण मार्गावर काही ना काही तरी देतच होती ..ही देण्याची भावना रुजवली...ती सारी माऊली कृपा....


खरतर आम्ही केलेला प्रवास फक्त ३० किमी होता पण जे लाखो वारकरी यात सहभागी आहेत ते तर साधारण पणे २०० किमी अंतर  पार करतील....पण काय तो उत्साह...अखंड हरिनाम, फक्त माऊली माऊली संबोधत मार्गस्थ होत राहतात.....सर्व सुख सोयी त्यागून आपलं बाड बिस्तार घेऊन चालत राहायचं.. विसाव्यासाठी..जिथे जागा मिळेल तिथे आपल वर्तमानपत्र किंवा प्लास्टिक पिशव्या टाकून पथारी लावायची... हल्ली सर्वच घरदार सुख सोयीने सुलभ असताना ही तीन आठवडे ते सर्व भौतिक  सुख त्यागून या जन सागरात स्वतःला झोकून देत वारीत चालत राहण्याचा जो ध्यास आहे त्याला वंदन.....कित्येक तर आयुष्याच्या उत्तरार्धात मार्गस्थ झालेले, पायात, कमरेत बाक असूनही ताळ घेऊन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जयघोषात सर्व वेदना दुःख सुख त्यात विरघळून हरी चरणी गुंगून जातात ....काही गृहिणी चिल्ले पिल्ले घरी ठेऊन आलेले, काही नव तरुण तरुणी मध्यम वयीन असे सर्व वयोगट असलेला तो वैष्णवांचा मेळा....आणि त्या खळाळत्या प्रवाहात आपली नाव अशी झोकात डुलत पुढे जाते ... कळतच नाही आपण किती अंतर पार करतोय....ती अनुभूती शब्द बद्ध करणे केवळ अशक्य..


वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला ।

विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ ॥

हरिनामा विनट हरि उच्चारीत ।

सप्रेम डुल्लत भक्तजन ॥  ॥

चालिला सोपान ज्ञानदेव निधी ।

मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥  ॥

निवृत्ति खेचर परसा भागवत ।

आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ॥



आता पुन्हा एकदा जरा उदर भरन सुटी झाली...एका स्मशान भूमी समोर एका हॉटेलमध्ये वडे चहा असं केलं...आम्ही सोबत घेतलेले तहान लाडू, भूक लाडू चाखले....पण जागा आणि गर्दी एवढी की अगदी त्या स्मशानभूमीत ही काही लोक विसावा घेत थांबलेले....


पुन्हा रिमझिम, उन, पाऊस करत मार्गस्थ झालो तसतस वाटनाऱ्यांची, पालखीची दर्शनासाठी  वाट पाहणाऱ्यांची आणि मिळणाऱ्या पदार्थांची संख्या वाढतच होती....यात ही व्याव्यसायीक ही होत.... शिदोरी वाटणारे ते हात आनंदाने देण्यासाठी सरसावत होते, त्यांना नाही म्हणताना उगाच कमी पणा वाटत होता...कारण आम्हाला त्याची गरजच नव्हती ...तरी ही केळी घेतली ...प्रसाद म्हणून....आम्ही जवळपास तीस किमी चाललो एकंदर या पूर्ण मार्गावर दुथडी भरून माणसं होती..... चौका चौकात भाई काका बॉस चे भव्य व्यासपीठ त्यावर आरूढ सुंदर सुबक माय बाप विठ्ठलाच्या मूर्ती, अभंग, गाणी असा एकच कल्लोळ .....त्याच व्यासपीठावरून होणारा अन्न आणि वस्तू वाटप, विणकर्यांचा मान अशी एक ना अनेक कार्यक्रमांची रेलचेल....आता त्यांनाही भक्ती करण्याचा हक्क आहेच की, पद्धत वेगळी असली म्हणून काय झाल...भक्ती ती भक्तीच.....



खरतर भूक अशी लागलीच नव्हती पण चालणाऱ्या शरीराला थोडीशी उर्जा देण्यासाठी पुन्हा ब्रेक झाला.... गंधम सोसायटीचे पूर्ण पार्किंग आम्ही व्यापले....त्यांनी अमृततुल्य ताक तिथे ठेवले होते ...पार्किंगमध्ये स्वयंभू एकमुखी दत्त महाराज प्रतिष्ठित आहेत त्यांच्या समोर आमच्या सर्व दशम्या उघडत गेल्या मिळेल त्या कोपऱ्यात बसून त्या आगळ्यावेगळ्या सहभोजनाचा आनंद म्हणजे व्वा व्वा.....रंगी बेरंगी पदार्थ त्यांचा तो चविष्ट सुगंध रहिवाश्यांनी आग्रह करून दिलेले ताक ...आणि अंगत पंगत करत ... पदार्थांची देवाण घेवाण होऊन गोपाळकाला संपन्न झाला....आधी आम्ही नैवेद्य खाऊन दत्त गुरूंची सामूहिक आरती झाली.... त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन पुढच्या दिशेने.... एव्हाना समूहातील संख्या जरा रोडावली कारण रस्ते बंद असल्याने आपल्या सोयीने मार्गस्थ होत गेले....आम्ही अखंड हरिनाम घेत जंगली महाराज मंदिरं गाठल...पुन्हा रिंगण..मीडिया वाल्यांना बाईट देत देत पुन्हा रिंगण असा करून ती आनंदाची पोटली अंगावर घेतली...

कोथरूड पर्यंतचे रस्ते वाहनास बंद होते ..मग मी आणि बायको जोडीने ती वारी पार करत घरी पोचलो...


IT दिंडीच्या लोकांनी ही अभूतपूर्व भिक्षा आमच्या झोळीत पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना ही वंदन माऊली...पुन्हा भेटत राहू.   


हा तुकोबा रायांचा अभंग सर्वांना माहीत आहे तरी आज तो इथे पुन्हा..


आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥१॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥



गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥



तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने॥ध्रु.॥


जय हरी

जय जय रामकृष्ण हरी

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल


.....


शरद पुराणिक

३००६२०२४ 

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती