दोन तीन लग्नाची एकच गोष्ट.... लग्नसराई अन् बरच काही
दोन तीन लग्नाची एकच गोष्ट.... लग्नसराई अन् बरच काही
'विवाह’ हा एक संस्कार, आणि आनंदाचा एक सोहळादेखील आहे. या रेशीम गाठी च्या नाजूक बंधनात गोवली जातात वधूवरां सोबतच दोन ही कुटुंब. जवळच्या व्यक्तीचं लग्न ठरलं की आपली अशी लगबग सुरू होते की विचारू नका....मुहूर्त, केळवण, देव ब्राम्हण, देव कार्य आणि मंगलाक्षत हा रम्य प्रवास सगे सोयरे या साठी ही तितकाच आनंद उधळत असतो..त्यात ही हल्ली आमच्या विवाह संस्थेवर इतर राज्य, धर्म, अशा विविध संस्कार आणि पद्धतीच आक्रमण झालं तर आहेच ते काही अंशी मान्य...पण अनुकरण प्रिय आपण ती अशी काही भिनवून घेतो की ते सारं आपल वाटायला लागते. काही असो पण या निमित्ताने आपली विवाहसंस्था ही या नवनवीन दगिण्यात खुलते आहे ते पाहून ही बरच वाटतय ..
गेल्या आठवड्यात दोन तीन निकटवर्तीयांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला. आणि संस्कार, जबाबदारी आणि कर्तव्यपुर्ती नी ओसंडून वाहणाऱ्या क्षणांचा साक्षीदार झालो त्या साठी हा लेखन प्रपंच. एरवी मी लग्न आणि त्याची गंमत या विषयी लिहितोच पण आज याची दुसरी बाजू उलगडावी अस वाटलं... कदाचित ज्यांच्या विषयी लिहीत आहे त्यांना याचं काय वाटेल याचा विचार करत एक दोन दिवस गेले पण आज न राहवून....
एक सोहळा मेहुण्याच्या लग्नाचा ज्यात भावंडांनी बहिणींनी एकत्र येऊन पिढीतल्या सर्वात छोट्या भावाचा देखणा विवाह सोहळा केला आणि आपल्या परंपरेत विवाह संस्था ही अशी मजबूत होताना पाहून मी गहिवरलो...हे तेच सारे आहेत ज्यांच्या विषयी मी सण वार या विषयी लिहितो तेच ते .... स्वयंस्फूर्त संस्कारांची त्यांची शिदोरी अशीच ओसंडून वाहावी ....
लगेच काही दिवसांनी एका मेहूनीचा विवाह सोहळा पार पडला....या दोन कार्यात अगदीच आठवड्याभराच अंतर असल्याने एकत्र केळवण.... औक्षवन, पंच पक्वान्न भोजन, अनोखे स्वागत्त अशी ही मालिका ही महिनाभर सुरूच होती...त्यात अनेक गमती जमती ...हलली व्हॉटसअप मुळे सर्व असं साक्षात होतय की काय अशी अनुभूती असते...
सोबतच खरेदी, देणे घेणे वर वधूची विशेष खरेदी ..हे ही सोहळेच असतात...त्यात आमच्या सौ बहिणीच्या या सोहळ्यात अथ पासून इती पर्यंत अशा काही गुंतल्या होत्या..की विचारू नका.
आता या कार्याला एक दुःखाची किनार आहे .. श्रद्धाचे बाबा चारच महिन्यापूर्वी अचानक हे जग सोडून गेले आणि त्याच दरम्यान तिचा विवाह ठरला... एकीकडे आनंद होताच पण मग तिची ती भावनिक गुंतागुंत ...पण या प्रसंगात बाप म्हणून खंबीरपणे उभे राहिलेले तिचे काका यांचा आवर्जून उल्लेख.... एकत्र कुटुंब म्हणून एकमेकावर जीवापाड प्रेम करणारी ही लोकं या निमित्तानं खूप जवळून अनुभवता आली आणि त्यांच्या विषयीचा आदर, प्रेम भाव उंचावला...
एखादा बाप ही पोटच्या मुली साठी जे करणार नाही ती प्रत्येक गोष्ट, हट्ट, हौस या दत्तात्रय कुलकर्णी गरजकर नावाच्या काका आणि त्यांची सौ यांनी केली. त्यांची दोन्हीही मुलं निखिल विशाल ,श्रद्धाचा भाऊ स्वप्नील आणि मावशी या सर्वांचा तो "अवघा रंग एक झाला " असा तो ठळक प्रेमभावे थबथबलेला कर्त्यवपूर्तीचा सोहळा अनुभवला. बहिणीच्या आनंदासाठी काय पण ...तू फक्त आदेश कर...अन् गोष्ट हजर . असं सारं सारं त्या बहिणीसाठी करणारे भाऊ...बहिणी... लग्नाच्या दोन दिवस अगोदर हळद, संगीत, मेहंदी अशी मेफिल अन् त्यात आनंदाने बेधुंद झालेली ती भावंडं ... धमाल मस्ती पाहिली....मग पिढ्यन्पिढ्या जपलेली आमची ही नाते संस्था अशी ताठ मानेने मिरवताना पाहताना होणारा आनंद तंतोतंत शब्दातीत करणे शक्य होणार नाही पण मग त्याचा उल्लेख व्हावा हा उद्देश.
आजच्या या स्वार्थी, स्वयमकेंद्रित, फक्त माझं माझ करत जगणाऱ्या गर्दीत हि अशी लोकं आहेत ही आमच्या संस्कृती, संस्कारांची आभूषणे आहेत. आर्थिक परिस्थिती असून ही हे सार मनापासून कराव वाटण ही भावना मला फार भावली... बर हे सारं करताना कुठलाही अहंभाव नाही ...तो मिरवण्याचा सोस नाही...पण मी सर्व घटनांचा साक्षीदार असल्याने ते वेळोवेळी टिपत होतो. अनेक कार्यात सख्खा भाऊ अगदी पाहुण्यासारखा येतो...तर कित्येक ठिकाणी कार्यबाहुल्यामुळे येऊ न शकल्याची कारण मीमांसा देत येतच नाही... असे असताना हे पाहताना मला जे वाटलं ते इथे प्रकट करतोय... पितारुपी या काकांचे आणि त्या सबंध परिवाराचे हे एकरूप होणं मला जास्त भावले... त्यांच्या या प्रेमाला माझा हा शब्दांचा काळा तिट...
श्रद्धा चा विवाह सोहळा हा माझ्या सासरच्या मेहुणे मेहुण्याच्या पिढीतला शेवटचा सोहळा होता ... त्यात सारीच मंडळी आनंद उधळत होते...सर्व खरेदीत सौ अनिता एक दोन वेळा संभाजीनगर पुणे असा प्रवास करून जाऊन येऊन केलं.... गेला आठवडाभर सूर्य आग ओकत असताना तकडबंध होऊन छ्त्रपती संभाजीनगर ची अख्खी बाजारपेठ पादाक्रांत करत त्या तयारीत हिने खारीचा वाटा उचलला याचा मनोमन आनंद आहेच. मी तिच्या नियोजन नेटकेपणा आणि व्यवस्थापन कौशल्यावर अनेक वेळा लिहिलं आहेच..पण स्वतः वर माई होण्याच्या या वयात तिचा हा उत्साह, उमेद म्हणजे सलाम. कोणाला कदाचित ते खटकल ही असेल पण केवळ बहिणीच्या प्रेमापोटी निरपेक्ष भावनेने ते तिने केलं. या मागे एक भावनिक धागा काकांच्या नसण्याचा होता जे अनिता वर ही लेकी सारखी माया करायचे...
संदर्भ म्हणून...ज्या दिवशी श्रद्धाच लग्न ठरलं त्या दिवशी लिहीलेला शुभेच्छा संदेश इथे पुन:प्रसारित करतोय...
खरतर दुःखाच्या लहरीवर क्षणिक फुंकर घातली गेली आजच्या या प्रसंगाने.... प्राक्तन नशीब आणि काळ या साऱ्यांची ही गट्टी फार विचित्र.... आजचा हा प्रसंग जर यांनी अगोदर घडवून आणला असता तर या आनंदावर दुखांची ती झालर न वाटता रेशीम धाग्यासारखी लकाकी असती अन् मुलीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या त्या पित्यास आनंदाची परिसीमा... किंवा कुठल्याही तराजूत न तोलता येणारा आनंद झाला असता की...पण तिकडे जरी गेले तरी परिवारासाठी आणि विशेषतः मुलीसाठी व्याकूळ होऊन विधात्याला विनवणी करून तर हा बेत त्यांनी घडवून आणला नसेल ना....
श्रद्धा मी ही शब्दात व्यक्त करू शकत नाही .. इतका आनंदी आहे ... खरतर गेले चार पाच दिवस चर्चा होती आणि एरवी फोन कडे तास न तास न पाहणारी तुमची माई मिनिटा गणीक चाचपडत होती...दुपार पासून चार पाच वेळेस तरी विचारून झालं.. ठरलं असेल श्रद्धाच, तिचा किंवा कोणाचा तरी फोन येईल... तेवढ्यात श्रद्धाचा फोन आला...हिने अशी धूम ठोकली पण फोन काहीतरी नटण्याविषयीचा होता...बोलून तिने घाईत ठेवला... पुन्हा तेच...वाट पाहतच होतो आम्ही अन् फोन वाजला आणि ज्या बातमीची उत्कंठा होती आणि आतुरतेने वाट पाहिली ती गोड बातमी कळाली... तेंव्हा कुठे आमची ही माऊली स्थिरावली... मनमुराद हसली..बोलली...
अभिनंदन श्रद्धा आणि समस्त गारजकर कुलकर्णी परिवाराचे....
खरतर या आनंदाच्या प्रसंगी मी काही उल्लेख आवर्जून टाळू शकलो असतो पण राहवलं नाही.... माझ्या वाचनात आलेली एक कविता तुझ्यासाठी...
शब्दात अर्ध-होकार
ओठात लाजूनी आला
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
जीव घाबरा झाला
मज सांग आई, तू सांग
हा खेळ असे कि नाते
ज्या वाटेवर मी फुलले
ती वाट पोरकी होते
गांव आता बदलेलं
मिळतील नवी मज नाती
काळीज मात्र व्याकुळ
तुटतुटेल तुमच्यासाठी
अडखळेल पाऊल हळवे
मी सोडून जाता, जाता
राहील उभा नि:शब्द
मग वाटेवरती दादा
मज स्मरेल जेव्हा घर हे
श्रमसरत्या शांत दुपारी
मी बघेन देव्हार्यात
पितळेचा कृष्णमुरारी
(काव्य संकलित आहे...माझे नाही)
श्रद्धाची आई , छाया मावशी म्हणजे एक निस्वार्थ निस्पृह बाई सर्वस्व कुटुंबासाठी दिलेल्या या माऊलीच्या भावना विवाह सोहळ्यात प्रत्येक वेळी दिसून येत होत्या.... नवऱ्यानंतर चार गोष्टी जिच्याशी बोलाव्यात तिचं आज हे घर सोडून तिच्या संसारात प्रवेश करतानाचे संमिश्र भाव.... एकटेपणाची जाणीव ... त्यांची ती घालमेल पाहवत नव्हती...
खरतर गेली दोन दिवस कपडेलत्ते गंमत जमत, फोटो , सेल्फी, थट्टा मस्करी करत .सर्व विधी अनुभवत ..साडे सूनमुख झाले ...अन् हा आनंद सोहळा आता उत्तरार्धात गेला... गहिवरलेले चेहरे.... अंतर्मन आसवे गाळत असताना ती घटिका आलीच....एरवी अल्लड, छोटीशी किंबहुना आपली मुलगीच असावी अशी ती श्रद्धा गाठ बांधलेल्या त्या शेल्याला सावरत निरोप घेत होती तसतसे माझा चेहेरा ही आसवांनी ओला....मी अनेक मुली सासरी जातानाचे क्षण अनुभवले पण या वेळी मी ही खूप रडत होतो आतल्याआत.... काका काकु ज्यांचा उल्लेख तिने उखण्यात माता पित्यापेक्षा श्रेष्ठ असा केला..भाऊ, बहिणी, या सर्वांचा निरोप घेताना मी पुरता गहिवरलो ... खरतर तिथे थांबायचं नाही अस ठरवलं होत पण बरं दिसत नाही म्हणून थांबलो...
गाडी आली ती बसली...काळजी घे असं सांगून तिला निरोप दिला....
पण ज्या काकांनी आणि सर्व भाऊ बहिणींनी हा सोहळा पूर्तते कडे नेत तो संकल्प सिद्धीस नेला... त्यांची पाठ थोपटली .... राहिलेले भाव या लेखात देऊन त्याची पूर्तता करतो..
याच दरम्यान बालमित्र अजयसिंह दीखत याच्या मुलाचा विवाह ही होता...अनेक वर्गमित्र मैत्रिणी भेटल्या अन् दोन तीन लग्नाच्या एकाच गोष्टीत आनंदाची शिदोरी भरुन गेली...अन् पिशव्या, बॅगा, नी भरलेला तो आनंद काल इतस्ततः विखरून घरातल्या कोपऱ्यात विसावलाय...
श्रद्धा आणि प्रदिप आयुष्यातल्या या नवीन वळणावर भरघोस शुभेच्छा... आनंद....Congratulations..
Comments