बीड चे जटाशंकर मंदिर जिथे साक्षात पद्मनाभ स्वामी ही आहेत...
बीड चे जटाशंकर मंदिर जिथे साक्षात पद्मनाभ स्वामी ही आहेत...
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥
आज सोमवार सकाळ बीड ला होतो. सौ अनिता आणि मी शुचिर्भूत होऊन श्री जटा शंकर दर्शनासाठी निघालो. नुकतीच शंभू महादेवाची पूजा संपन्न झालेली. आकर्षक फुलं आणि भस्मधारी शिव जी असे काही सुंदर सजले होते. समोर दोन तुपाच्या निरांजन त्याचं ते तेज अजून खुलवत होते अन् आपसूक ओम नम: शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यं शिव स्तुती उच्चारली गेली...."कैलास राणा शिवचंद्र मौळी ...फणिंद्र माथा मुकुटी झळाळी...कारुण्य सिंधू भवदुःख हारी... तुजवीण शंभो मज कोण तारी".. अस स्वतःला शिवमय करून दर्शन घेतलं. ते शिवरूप डोळ्यात साठवून प्रदक्षिणा करत असताना, प्रदक्षिणा मार्गात विविध देव देवता विराजमान आहेत.. श्री गणेश...आणि भव्यदिव्य श्री हनुमान जी आहेत. खरतर पूर्वीची श्री हनुमान जी ची मूर्ती म्हणजे शब्दांत सांगणे केवळ अशक्य एवढी भव्य आणि आकर्षक होती...पण काळाच्या ओघात झीज होऊन त्या जागी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ...पण मला आज ही ती जुनीच मूर्ती डोळ्यासमोर येते....असो या मधोमध एक विशिष्ट मूर्ती आहे. ती मूर्ती म्हणजे वरील श्लोक त्याचे वर्णन अगदी तंतोतंत करतो. आवर्जून त्याचा फोटो ही घेतलाय. एकदा तो श्लोक / प्रार्थना वाचल की त्या मूर्तीची महती विषद होते.
साक्षात श्री पद्मनाभ रुपी श्री विष्णु आहेत. ज्याच्या दर्शनासाठी लोक हजारो रुपये खर्च करून त्रिवेंद्रम ला जाऊन पद्मनाभ स्वामीचे दर्शन घेतो. तीच मूर्ती जी की संपूर्ण पाहता येते आणि जवळून दर्शन घेता येते. तिथे त्रिवेंद्रम ला लुंगी घालून, गर्दीत बारी मध्ये तास न तास उभ राहून दर्शन घेतो, ते ही अगदी मंद दीप प्रकाशात ती मूर्ती संपूर्ण दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अर्थात ते फारच आकर्षक आणि भव्य रूप आहेच. पण मला कुतुहल याचे वाटले आणि आश्चर्य ही की हे असं लोभस रूप आपल्याच गल्लीतल्या मंदिरात आहे.
तर आजच्या या सोमवारी श्री शंभू महादेव यांचं दर्शन झालं पण वेगळी अनुभूती देत ही मूर्ती ही जवळून पाहिली तो म्हणजे अलभ्य लाभ त्याचे प्रासादिक शब्द रुपी आपणा पर्यंत पोचवावे वाटले....या विषयी अधिक माहिती असेल तर तसा उलगडा ही करा, जेणेकरून आपलीच मंदीरे नव्या रूपात पाहण्याचा योग येईल...
श्री विष्णु हे शेष नागावर विश्रांती घेत आहेत, त्याच्या नाभीतून कमळ उमलले आहे ज्यात श्री ब्रम्हाजी बसलेले आहेत, बाजूला शिवलिंग आणि पायाशी श्रीलक्ष्मी आहे...असे हे मोहक रूप आज पाहिले... अर्थात त्रिवेंद्रम चे पद्मनाभ चे दर्शन नक्कीच वेगळी अनुभूती देते तो वेगळा विषय आहे...कारण ते एका राजवाड्यात स्थापित आहे ज्याला दिव्य सुवर्णलांकरित इतिहास आहे....तरीही गड्या आपला गाव बरा...
एकंदरीतच जटाशंकर मंदिराचे स्थापत्य एक वेगळ्या रचनेचे आहे. एकाच मंदिरात दोन भव्य नंदी आहे....ते ही एकावर एक. जसे प्रत्येक शिवमंदिरात समोरच श्री नंदी विराजमान असतात, इथे ही आहे पण याच नंदीच्या गाभाऱ्यावर कळस वजा एक अजून भव्य नंदी महाराज आहेत. सोबत श्री पद्मनाभ जी यांची मूळ मूर्ती जी त्रिवेंद्रम ला आहे आणि जी जटाशंकर येथील मूर्ती आणि सोबत नंदी चे आणि मंदिराचे ही फोटो जोडत आहे..
शरद पुराणिक
जटाशंकर गल्ली, बीड
Comments