माझ्याच दारी अनोळखी मी


 माझ्याच दारी अनोळखी मी

सूर्योदयापूर्वी घर सोडतो मी

चंद्र ही अर्ध्यावर असतो तेंव्हा

कसाबसा घरात पोचतो मी...


गुऱ्हाळाला जुंपलेला बैल मी 

दिवेलागण क्षण विसरलो मी

चहाचं आधन ही आटून गेले

शुभंकरोती ही आठवत नाही


बेल वाजताच पळत येणारे

येऊन फ़क्त डोकावून जातात

आलो की नाही पाहतात मी

निद्रिस्त त्या घरात घुसतो मी


ती आता वाट पाहत नाही माझी 

कितीही पाहून येतच नाही मी

फक्कड चहाचे घोट हरवले

गप्पांचे ते फड ही स्तब्ध झाले...


इच्छा असून ही रागावत नाही

चूक यात कोणाचीच नाही

भांड्याचे आवाज ही दबलेत

भयानक शांतता घेऊन येतो मी


मनातले अनेक किस्से विरतात

सांगायचे सतत राहून जातात 

संवाद हास्य सारं  हरवल आहे

जगणं पार उतरंडीत गेल आहे


नित्यब्रम्हकर्म ही विसरलो मी

देवपूजा ही होत नाही कधी 

फ़क्त होत जोडून निघतो मी

रामरक्षा गीता सारं विसरलो मी...


आज  वेळेत घरी पोचलो मी

मलाच नव्याने भेटलो मी

दुसरं तिसरं काही नाही

माझ्याच घरात अनोळखी मी..


शरद पुराणिक

191224

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती