आणि मी पुन्हा पोरका झालो .... दुःखाची मालिका

 आणि मी पुन्हा पोरका झालो .... दुःखाची  मालिका


मागच्या धक्यातून सावरत सावरत जरा कुठे स्थिरावलो होतो आम्ही सारेच एक कुटुंब म्हणून... वाईट काळाला मागे टाकत सर्वांचीच आयुष्ये उजळून निघत यशस्वी मार्गस्थ होत होती ...पण अचानक काहीतरी अघटीत घडलं....जावयांचा फोन आला, घाबरलेल्या स्वरात त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून मी स्तब्ध झालो... आमचे मोठे भाउजी गेले ...एकच दिवसापूर्वी राखी पौर्णिमेनिमित्त अक्काशी बोलणं झालं... माझ्या ऑफिसच्या व्यापामुळे फार बोलणं नाही पण क्षेम कुशल आशीर्वाद शुभेच्छा आणि नमस्कार...अहो हसत्या फुलत्या आयुष्याला हे अस खत अधून मधून टाकलं की आयुष्य समृध्द होतात...त्या आनंदात फोन ठेवला.  माझी बायको नेहेमी या वरून मला बोलते दोन चार दिवसांनी जरा फोन करून बोलत जा रे बाबा.. जगात काय तू एकटाच नोकरी करत नाही, अन् कितीही व्यस्त असलास तरी हा वेळ काढलाच पाहिजे हा तिचा अट्टाहास असतो...आज तेच झालं मी करू करू म्हणे पर्यंत बहिनीचाच फोन आला... विचारपूस झाली आणि आवर्जून भाऊजीला नमस्कार सांग म्हणालो....


दुसऱ्या दिवशी तिची मुलगी अक्कानी दिलेली राखी घेऊन घरी आली... संध्याकाळी मी ती बांधली ही ...ती अजून हातातच होती आणि हा फोन आला....

लगेच निघणं हा एकमेव पर्याय पण तासभर काहीच सुचत नव्हतं... मुलांनी मदत करून बॅगा तयार केल्या, cab बोलावली ... अशा प्रसंगी मुलांची समयसूचकता आणि धीर देणं हे पाहताना आपण मोठे झालो आहोत या पेक्षा ही पिढी मोठी होत आहे ही भावना आधार देते... खरतर एक जण dengue ने बरा होऊन कालच घरी परतला होता... दुसरा ligament injury ने घरात जायबंदी झाला...पण आमची काळजी सोडा आम्ही manage करतो म्हणत त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं....


गाडीत बसल्यावर आम्ही दोघेही आमच्या दरम्यान ची भयाण शांतता अनुभवत होतो... एरवी प्रवास निमित्त आणि हे निमित्त किती विचित्र ...झोप येणे केवळ अशक्य... तस क्षणोक्षणी आठवांचा मागोवा घेत मन सैरभर पळत होत... नुकतीच लग्न झालेली बहीण त्या वेळी अगदीच चौथी पाचवीत होतो आम्ही... भौजिंची बदली बीडलाच होती...मग निघायचं तिच्या घरी जायचं नव्या कोऱ्या त्या छोटेखानी संसारात गरम गरम भाजी पोळी जेवायची..जरा वेळ खेळायच अन् परत घरी.... तिथल्या तिथे एक दोन घर बदलली कारण त्यांचा स्वतःचा टोलेजंग वाडा माजलगाव ला होता.. भौजींची बदली माजलगाव ला झाली ...मग तर सुट्ट्या मध्ये आम्ही तिथेच... तिच्या सासऱ्यानी मला रामरक्षा, भगवद्गीता असे सुसंस्कार केले...या विषयी मी पूर्वी माझ्या लेखात संदर्भ दिलेलाच आहे. 


पुढे त्यांची बदली गेवराई अंबाजोगाई बीड अशी होत राहिली... अक्काची संसार वेल फुलत होती.. मुलं शाळा कॉलेज असं करत करत लग्नाची झाली या दरम्यान... मराठवाड्यात राहून ही शांतता संयम आणि मृदू स्वरात बोलण्याचे आणि सारेच सुसंस्कार या दोघांनी या मुलांवर केले...एक यशस्वी आई वडील म्हणून त्यांची एक वेगळी प्रतिमा खुलून दिसत होती.


सरकारी नोकरीत एका पगारात चार एक लग्न थाटामाटात, सर्व सण वार, देणं घेणं यात कुठलीही कसर न करता फक्त आणि फक्त स्वबळावर, उत्तम नियोजन करून केले...आज तागायत कधीही त्यांनी त्यांची दुःख अडचण साधी बोलून ही दाखवली नाहीत... किंवा अडचण येऊच दिली नाही.... मुळातच भाउजी मितभाषी... हसून उत्तर देऊन मोकळे... कसला आवाज नाही... तक्रार नाही .आहे त्यात समाधानी...पण पक्के आर्थिक नियोजन याचं मला नेहेमी कौतुक वाटत. 


मुलं मोठी झाली... सून जावई नातवंडं सोबतच व्याही मंडळी असा पाहता पाहता वाढलेला बहिणीच्या संसाराचा तो व्यापक वेल छान घेर धरून डौलदार होता...या सर्वात बहीण एक भक्कम आधार मार्गदर्शक आणि माया अशा बहुरंगी भूमिकेत चोख भूमिका निभावत त्या वेलाची मुख्य फांदी बनून राहिली ...आणि मोठी म्हणून आम्हालाही मौलिक सल्ला, आधार, काळजी असं सतत आमच्या सोबत राहत गेली ...हा तिचा प्रवास खूप मोठा आहे...पण मी म्हणजे तिच्या लग्नापूर्वी ती गायन पेटी च्या क्लास ला एक लींबू टिंबु म्हणून जाणारा भाऊ,  ते शाळेत जाताना गंध पावडर करणारी बहीण, नंतर पोलका ते साडी अन् नवी नवरी ते आता अनेक नातवंडांची आज्जी म्हणून प्रत्येक टप्प्यावर यशस्वी मार्गस्थ होतानाच तिला पाहत आलोय....त्या मुळे तिच्यासोबत अस काही तरी घडेल हे मनी न मानसी अन् त्या मुळे हा धक्का असह्य झालाय.... एखाद्या उडणाऱ्या पक्षाचे पंख छाटावेत अन् त्याला जायबंदी करावा किंवा त्या ही पेक्षा क्रूर नियतीचा हा आघात...


मुलं बाळ स्थिर स्थावर झाल्यानंतर तर या दोघांच खर एकमेकांसाठी जगणं सुरू होतं ...त्याला सुखाची एक मखमली झालर... सर्वांचं सुरळीत सुरू आहे, जो तो त्याच्या जागेवर चांगला....तीन ही मुली एकत्र कुटुंब पद्धतीत चोख संसार करतायत, पोरगा आणि सून तर जणू यांचीच एक दुसरी स्त्यप्रत...अगदी त्याच नेटाने संसार करतायत... जावई ही त्याचं रंगात मिसळून गेलेले...एक आनंदी गोकुळ ते .... त्याला कोण्या दुष्टाची नजर लागली कोण जाणे...अन् घडू नये ते घडलय....


मी माझ्या बहिणीचा नेहेमी मातेसमान असा उल्लेख केला....ती खरच आईसारखी काळजी करते ...तिचं ते सौभाग्य नियतीने हिसकावून नेलं....2006 साली वडिलांच्या जाण्याने एकदा पोरका झालेला मी आता पुन्हा एकदा पोरका झालो ... छोट्या बहिणीचे यजमान ही असेच काळाने आमच्यापासून हिरावून घेतले होते  त्या दुःखाची झालर आम्ही सारे जण कसेबसे या सुखाने झाकत होतो आज ती झालर ही निसटली अन् दुःखाच्या त्या जखमा अजून ओरबडल्या हो....जी आयुष्यभर साथ म्हणून राहिली आज तिचं सांत्वन कसं करणार हो मी....आई तर या दुःखाच्या निखाऱ्यात जणू होरपळली...पोटचा मुलगा, नवरा अन् दोन जावई असं हे दुःखाचं ओझं कशी पेलवणार आहे तिला.... तिचं सांत्वन करू .. बहिणींचं करू...भाच्याच करू...की कोणाचं ... जबादारीपासून दूर जाऊन एक हक्काची जागा असते मांडीवर डोकं ठेऊन विसरण्यासाठी...त्या मांड्या आधीच बधीर झाल्यात त्यांच्याच दुःखाच्या ओलाव्याने.... शोधू कुठे मी ती शाश्वत जागा....


शरद पुराणिक ©️

250824

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती