Happy New Year ते नूतन संवत्सर शुभाशया: संस्कारांची गुढी उंचावतेय !!


 Happy New Year ते नूतन संवत्सर शुभाशया:  संस्कारांची गुढी उंचावतेय !!


 "परिवर्तनमेव स्थिरमस्ति" 


आज शनिवार, रविवार नंतर ऑफीसला होतो. पण उद्याची गुढी पाडव्याची सुटी असल्याने लोक जरा तुरळक होती. जी आली ती ही चार एक वाजता तर काही त्या अगोदर घाईघाईत निघू लागली.  खरतर मलाही जाण गरजेचं होत पण निघता येत नाही ही खंत. पण इतर लोकांची ती धावपळ पाहून मी मनोमन सुखावलो.  


जरा काळामागे गेलो. काही वर्षापूर्वी अगदी अशीच धावपळ ३१ डिसेंबर साजरा करणाऱ्यांची एक पिढी आपले सर्व संस्कार त्याजून पाश्चिमात्य अनुकरणात इतकी गुंतली होती की ...गुढी पाडवा आणि इतर अनेक सण उतरंडीला जावेत किंवा ते साजरे करणे म्हणजे मागासलेपण वाटावं एवढ आक्रमण संस्कृतीवर झालं. त्या काळातही हे संस्कार जोपासणारा एक वर्ग होताच पण त्या काळी जो तरुण वर्ग होता त्यांची घुसमट व्हायची. एक पाय या उंबऱ्यात तर दुसरा पाय त्या door वर अशी घालमेल.  


वयस्कर पिढी पार चिंतेत बुडालेली की हे संस्कार टिकतील की लोप पावतील. अगदी मंदिरा समोरून जाताना हात जोडण सोडा चेहेरा फिरवून जाणारी एक पिढी मी ही पाहिली आहे.  शाळेतली जयंती पुण्यतिथी आणि सणवार साजरे होण थांबून christmas, new year, पार्ट्या , halloween आणि काय काय आल.  बुड ना शेंडा आणि ते ही काहीतरी अर्धवट माहितीवर आधारित साजरे होताना ...हे दिवस पहायची वेळ आली या चिंतेने ग्रासलेली काही लोक. इंग्रजी शाळाची वाढती संख्या त्यात convent चे संस्कार ....मराठी आणि हिंदी च्या तासाला नगण्य गर्दी... किंबहुना नाहीच अशी अवस्था...


काळ बदलू लागला शाळेत पुन्हा संस्कृत विषय शिकवू लागले. हे संस्कृतीवर होणारं आक्रमण मोडून काढण्यासठी अनेक संस्था आणि लोक झटू लागले. विज्ञान आणि संस्कृती याचा एक सुंदर मेळ जो की वास्तव आहे आणि ते पदोपदी सिद्ध होत गेलं...ही चळवळ यशस्वी होत गेली अन् शाळा पुन्हा नव्याने ही सांस्कृतिक समृध्द आभूषणे घालून मिरवू लागली. शाळेत जन्माष्टमी ला राधा कृष्ण अवतरू लागले, कृष्ण सुदामा, आषाढीला वारकरी ही येऊ लागले तर कोणी विठुरायाच्या वेशात येतायत आता. नवरात्र, गणपती, गुरुपोर्णिमा, दिवाळी साजरी होतेय. हे परिवर्तन सुखावणारं आहेच तरीही काही पलीकडच्या door वर घुटमळत होतेच आणि आहेत. 


काळानुरूप संस्कार शिदोरीची महती पटली.  आई वडील या क्लिष्ट प्रवाहातून जाताना संभ्रमित होते.  पण महत्व आणि महती पटवून देताना आपल्याच सणांचा नव्याने अभ्यास किंवा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी ही परिश्रम घेतले. 


माझ्या पिढीतल्या लोकांसाठी ही परिवर्तनाचं तिसरं आवर्तन घडलय. या तिसऱ्या आवर्तनात संस्कारांना तलम रेशमी चमक आणि भरजरी झालर आली.  तेच सण वार नव्या नवरी सारखे नटून पुनरुज्जीवन झालं. जशी पैठणीवर मोर सजतात तसच काहीतरी. 


एरवी ३१ डिसेंबर साठी बाटल्या  अन् अड्डे शोधत फिरणारी पिढी आणि आज activa वर मागे आई बाबा किंवा मित्रांसोबत गुढी साठी वेळू घेऊन आनंदाने तो मिरवत जाणारी पिढी.   वाइन च्या दुकानाबाहेर उभ्या गाडीवर किंवा बाजूच्या दुकानात चकणा घेणारी लोकं आता चौकातल्या बाजारात फुलं, हारं, साखरगाठी घेण्यासाठी   गर्दीतली पिढी. 


थोड विषयांतर असेल तरीही आषाढी वारीत वाढत जाणारी तरुणाईची संख्या हे याच द्योतक आहे, त्या विषयी सविस्तर पुन्हा कधी तरी. 


केकच्या दुकानात बेरंगी आकारांच्या तुकड्यासाठी जाणारी लोक मिठाईच्या दुकानात श्रीखंड, बासुंदी, अशा विविध व्यंजनासाठी भल्या मोठ्या रांगेत पाहिली की काय आनंद होतो. त्यात पुण्यात चितळे, देसाई बंधु, काका हलवाई, आणि राजस्थानातून इथे येऊन वसलेली अनेक मिठाई दुकानांची गर्दी, त्या गर्दीत रांगा लावून थांबलेली लोकं पाहिलं की मी सुखावतो.  तर यूट्यूब वर का होईना पाहून पुरणपोळी तयार करणारी नववधू, नवीन साडीच्या त्या शुचिर्भूत पेहरावात बटा बाजूला सारून बांगड्यांचा किणकिण आवाज करत पोळ्या लाटत आहे.


सुटबुटातल्या साहेबाला bye bye करून छान सुंदर, आकर्षक रेशमी तर सुती कुर्ते पायजमे, कपाळावर चंदन टिळा घालून आनंदाने या उत्सवात रममाण होणारी तरुणाई.  घरात आई बायको ही भरजरी नऊवारी साडी, ठेवणीतले दागिने, चंद्रकोर आणि चेहेऱ्यावरचा उत्साह या सणांच माधुर्य अजून वाढवतो.  मद्य ते माधुर्य हा प्रवास खरचं खूप मोहक आहे. 


साडेतीन मुहूर्तांपैकी एक ...मग सोने खरेदी, नवीन वास्तू आणि वास्तू खरेदी त्याचा तो निर्भेळ आनंद... साहजिकच तो आनंद इतरांना वाटण्यात जी गंमत आहे त्याला मोल नाही.  विभक्त झालेली कुटुंबे या निमित्ताने दाक्षयनी का होईना एकत्र येत आहेत हे ही नसे थोडके. सोसायट्या मध्ये होणारे एकत्रीकरण हा एक चांगला भाग आहे.  त्यात social media ची ही कमाल आहेच. Status , FB updates ही या साऱ्यांची रंगत अजून वाढवतात. प्रत्येक वेळी social media ला वाईट न ठरवता चांगले ते घ्यावे.  अप्रत्यक्ष एक स्पर्धा असते ती एका हून दुसऱ्याने काही तरी वेगळ्या प्रकारे साजरे करायचे, फोटो टाकायचे like कॉमेंट्स ची आणि शुभेच्छांची देवाण घेवाण ही आधुनिक पद्धत ही खूप भावते.... अर्थात प्रत्येक ठिकाणी अपवाद असतात, त्या कडे दुर्लक्ष करून आनंदाने मार्गस्थ होत आयुष्याच्या सुखद क्षणांचे मोती वेचत राहायचं,  समाधानाच्या लहरित सुगंधित सोन चाफ्या च्या त्या कळ्या गुंफत चालत राहायचे.... हाय काय अन् नाय काय....


अर्थ येवो न येवो पण संस्कृत शुभेच्छा ही मोबाईलच्या दालनात गर्दी करत आहेत, अनेकांना ते अर्थ माहीत ही आहेत.  


गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!


शरद पुराणिक

०९०४२४

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती