त्याला डिवचू नका, तो आहे विषारी साप..

 तो पाहत नाही जात धर्म पंथ

तो पाहत नाही पक्ष संघटना गट 

तो पाहत नाही पद प्रतिष्ठा सामान्य असामान्य

तो पाहत नाही श्रीमंत मध्यमवर्गीय गरीब 


त्याने असंख्य गिळंकृत केलेत असेच

कोणी धडाडीचे, हिंमतवान, रक्षक

नेते राजकारणी साहित्यिक नट 

त्याने उजाडलेत अगणित संसार


त्याने हीरावलेत कुटुंबाचे आधार

घरचे, गावचे, राज्याचे, देशाचे आधार

उध्वस्त केलंय तुमचं आमचं जगणं

तो एक विनाशकारी प्रलय आहे


उध्वस्त झालेत बंगले महाल झोपड्या

प्रत्येक गावात, राज्यात देशात, जगात

कुठे माणुसकी पार हरवलीये

कुठे माणुसकीचा महापूर ही आहे


या ही अवस्थेत बोकाळला भ्रष्ट्राचार

दुष्ट समूह खेळतायेत अघोरी खेळ

औषधांचा अन उपचाराचा बाजार

कुठे फेडाल रे हा पापांचा भार


आज गरज आहे माणूस असण्याची

माणुसकी दाखवून सुरक्षित जगण्याची

बंद करा हेवे दावे आरोप प्रत्यारोप

संकटात या लावू एकजुटीचे रोप


शाश्वत आता काहीच नाही या जगण्यात

तुमचाच श्वास करतोय तुमचा घात

तेंव्हा जागे व्हा, विसर्जन करा त्या विचारांचं

तुझं माझं करत आपसात भांडण्याचं


अनेक देवदूत ही अवतरले विविध रुपात

अखंड रुग्णसेवेचा घेतला मनी  ध्यास 

खाजगी क्षेत्र ही सरसावले यांच्यात

चला सर्वजण देऊ त्यांची साथ ....


तेंव्हा बाबांनो एकच विनंती

उतू नका मातु नका 

घेतला वसा टाकू नका

असाल तिथे सुरक्षित राहा


त्याला डिवचू नका, तो आहे विषारी साप..


शरद पुराणिक

160521

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती