काळरात्र.... पुण्याई...माणसातले देव आणि साक्षात्कार
काळरात्र.... पुण्याई...माणसातले देव आणि साक्षात्कार
आजचा हा लेख म्हणजे जगण्यामरण्यातल एक सुईच्या टोका एवढं अंतर जे मी प्रत्यक्ष अनुभवले त्या विषयी. घटना कलपोकल्पित नसून मी दि 22 डिसेंबर च्या मध्य रात्री जे काही जगलो वाचलो त्या विषयी आहे. लिहिण्याआधी समस्त देव, स्नेही, कुटूंब आणि परिवार जन या सर्वांचे अब्जावधी आभार मानतो.
गेली 3 ते 4 वर्ष झाली मी दर आठवडा, कधी पंधरवडा असा पुणे हैदराबाद पुणे प्रवास करतोय. कधी रेल्वे, कधी बस तर कधी विमान. प्राप्त परिस्थिती आणि जमेल तसं प्रवास करतो. त्यातील गमती जमती ही आपणा सोबत वाटून घेतो. पण आजचे प्रवास वर्णन हे माझ्या प्रवासातला एक मरणांतिक यातना देऊन, किंबहूना आकस्मित क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणारी घटना अनुभवली आणि माझा आत्मविश्वास डगमगला.
घरी एक विवाह समारंभ साजरा करण्यासाठी रेल्वेचे अगोदरच आरक्षण केले होते, पण कार्यालयीन कामकाज ऐनवेळी आल्याने ते रद्द करून बस ने प्रवास केला. खरं तर मला बस ने (म्हणजे रात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या volvo) प्रवास आवडत नाही. पण नाईलाज होता अन जाणे भाग होतेच.
नेहेमीप्रमाणे ती बस उशिरा आली. थोडंस खाउन घेतलं अन गाडीत बसलो. गाडीत बरेच सीट रिकामे होते त्यामुळे दर कोस दर मजल करत तो "सीट भरत" होताच. साधारण दोन तासांनी तो जेवायला थांबला, एक कॉफी घेउन मी गाडीत आलो. त्याच ते भरणं अजून सुरू होतं. मध्यरात्री एक दोन वेळा तो थांबला. साधारण 3.05 मिनिटांनी एक प्रचंड मोठा धक्का बसला, कर्कश आवाज, घर्षण आणि असह्य किंचाळया ..मी तसा सावध झोपतो म्हणुन मी उठुन पाहू असं म्हणे पर्यंत माझ्या वरच्या सीटची व्यक्ति खाली पडली , अशी 3 ते 4 लोक अजून पडले, आत बर्थ वर जाण्यासाठी ज्या शिड्या असतात त्या ही काही तुटल्या. कसा बसा मी उठुन बाहेर जाउन पाहु असं विचार केला तर सर्वच जण खाली उतरून त्या अरुंद बोळात जमले आणि काहीही दिसत नव्हते. काही लोक येऊन ड्रायव्हर ला मारहाण करण्याचा आवाज आणि अस्खलित श्लोक कानी पडले. कसं तरी करून, माझी लॅपटॉप ची बॅग गळयात घेऊन उतरलो.
समोरचं चित्र अतिशय वेदनादायी होतं. समोर उभ्या असलेल्या एका बस वर आमची बस अक्षरशः आदळून, तिची केबिन त्या गाडीत अडकली होती. त्या भल्या मोठ्या बसचा समोरचा भाग चक्काचूर झाला होता. ड्रायव्हर चे दोनीही पाय त्यात अडकले, पण ते लगेच बाहेर काढले आणी तो आत एका सिटवर येऊन बसला. कारण त्या बसचे प्रवासी, ड्रायव्हर अशी मंडळी त्याला मारण्यासाठी सरसावत होते.
समोरची बस रस्त्यात आडवी उभी होती, कारण तीचं एक चाक फुटून बाहेर आले होते ते चाक बदलण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यातील प्रवासी रस्त्याच्या कडेला त्या कडाक्याच्या थंडीत उभे होते. म्हणून हानी टळली. कारण आमची गाडी त्याच्या गाडीत घुसली अन मागचे 4 ते 5 सीट वाकडे झाले. त्या गाडीचे दोनीही इंडिकेटर सुरू असल्याने याला वाटलं तो आपल्याला बाजूने जा असा इशारा करतोय, हा बाजूला होणार एवढ्यात डाव्या हाताने एक कंटेनर आला आणि आमच्या ड्रायव्हर ला समोर फक्त त्याची गाडी नियंत्रीत करणे एवढंच लक्ष होतें. तीन ते चार वेळा त्याने ब्रेक दाबून वेग कमी केला पण अंतर एवढं कमी होतं की तो वाचूच शकला नसता, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून, स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि तो ज्या बाजूला होता त्याच बाजूने समोरच्या बस वर आदळला. त्याची केबीन समोरच्या गाडीत पूर्णतः रुतली. दुसरा कोणीही असता तर त्याने उडी टाकून आपला जीव वाचवला असता, पण प्रवाशांच्या जीवसाठी स्वतः च्या जीवावर उदार होऊन त्याने आमचे सर्वांचे रक्षण केले. त्याचे पाय अडकले तरीही कसलीही जखम नाही आणि तो सुखरूप होता. त्याच्या समयसुचकतेला आणि हिमतीला सहस्त्र नमन.
आता आम्ही सर्व प्रवासी ही खाली उतरलो कारण अजून एखादी गाडी येऊन विचित्र अपघात शक्य होता, कारण दोन मोठी वाहन अशी रस्त्यात कुठल्याही दिव्याशिवाय इतस्ततः उभी होती. पहाटेचे 3.30 झाले होते, कडाक्याची थंडी अन रस्त्याच्या कडेला खाली दोन गाड्यांचे प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत उभे होतो. कोणीतरी highway हेल्पलाईन ला फोन केला आणि 40 km दूर असलेली ती टिम मोजून 17 मिनिटात तिथे अवतरली आणि त्यांचा म्होरक्या श्री संतोष खडके संचारल्या सारखा अवतरला अन सूचनांची सरबत्ती करून दोनीही ड्रायव्हर ला सोबत घेतलं, एक Ambulance ही ते सोबत घेउन आले. एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि एका crane ची व्यवस्था केली. त्या निर्मनुष्य ठिकाणी जिथे मदत पोचणे केवळ शक्य नव्हते, ते ही रात्री 3 वाजता. दोन गाड्या ज्या एकमेकांत विलीन झाल्या होत्या त्यांना त्या क्रेन च्या साह्याने विलग केलं. समोरची गाडी सुरु ही झाली आणि मग पोलीस, राज्य महामार्ग मदत पथक यांनी रस्त्यावर वाहन थांबवून त्यातील प्रवाशांना त्यात बसवून ती सोडली. नंतर चौकीत हजर राहण्याचे संदेश ही दिले.
आमची बस पुर्णतः बंद, आणि हलवणे शक्य नव्हते, तिलाही क्रेन ने दूर 1 km वर नेऊन उभे केले. या दरम्यान काही प्रवासी शेकोटी करून या आणि इतर अनेक अपघातांची चर्चा, शिव्या आणि भीती अशा संमिश्र भावनांचं पांघरून घेऊन पहाटेच्या त्या थंडीला आपलसं करत कालपव्यय करत होते. मी मात्र त्या ऊर्जेने ओतप्रेत भरलेल्या संतोष खडके ला न्याहाळत होतो. अगदी 30 मिनिटात संपूर्ण परिस्थितीवर ताबा मिळवून, उत्कृष्ट नियोजन, सोबत कडक आवाज आणि अतिशय योग्य रित्या ते सर्व हाताळत होता. खरं तर काही क्षणापूर्वीच आपण एका अत्यंत अप्रिय घटनेतून वाचुन हे सर्व पाहत आहोत याचा विसर पडला. काही प्रवासी या दरम्यान ही विनाकारण इकडून तिकडे करत होते, समोर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या त्यांना torch च्या प्रकाशात थांबवून बाजूने जाण्याचं सांगायचं हे जिकरीचे काम, अन काही मूर्ख लोक त्या वेळेसही रस्ता पार करण्याचा प्रयत्न करताना त्याना रोखणे आणि मदतकार्य सुरू ठेवणं अशी तिहेरी भूमिका ते निभावत होते. खडके साहेब स्वतःस्टेरिंग वर बसून दोनीही वाहनांना मार्गी लावण्यात यशस्वी झाले होते. आम्हाला दुसरी गाडी पुण्यावरून आल्या शिवाय पर्याय नव्हता, त्याचा अंदाज ही ते अधून मधून घेत होते. आता 4 वाजून गेले होते आणि आमची दुसरी गाडी पुण्यावरून निघाली. अपघात स्थळा पासून पुणे 185 किमी होतं, म्हणजे त्याला 4 तास लागणार होतेच.
आता दोनीही गाड्या रस्त्यावरून गेल्यानंतर तिथे काचांचा खच पडला होता, साहेबांनी कर्मचाऱ्यांना आदेश देऊन अक्षरशः तो संपूर्ण भाग झाडून, काचा बाजूला केल्या,जेणेकरून दुसरा अपघात होऊ नये. हे सुरू असताना मी खडके साहेबांशी बोलत होतोच, ते त्यांचे विविध अनुभव सांगत होते. काही महत्वाच्या सूचनाही ही दिल्या, जागोजागी लिहिलेले मदत क्रमांक कायम पाहत चला, दर 50 किमी ला एक अशा टीम कार्यरत असतात, त्यांच्या दिमतीला क्रेन, आणि इतर अत्यावश्यक आशा सुविधा ही असतात. टोल च्या पावत्या नीट वाचा त्या वर तो भाग, त्याचा विभाग आणि कुठल्या हद्दीत आहात ते नमूद केलेले असते, जेनेकरुन तुम्हाला योग्य टीमसोबत संपर्क होतो आणि मदत निश्चीत मिळते. खडके साहेब हे एका खाजगी कंपनीत आहेत ज्यांना टोल कंत्राटदार कडुन हे काम मिळालेले आहे. या संपूर्ण कामाचा शून्य मोबदला आहे आणि ही सेवा विनामूल्य आहे हे ही ते सांगायचे विसरले नाहीत. ते म्हणाले साहेब luxury चा accident कळलं अन मी 6 अंबुलन्स ची व्यवस्था करत इथे पोचलो, पण सुदैवाने एक ही ambulance लागली नाही. प्रचंड आत्मविश्वास, काळजी अशी शब्दां शब्दांत दिसत होती. ते मला नाव ही सांगायला तयार नव्हते आनि प्रसिद्धी वगैरे तर नकोच म्हणाले. त्यांच्या इच्छे विरुद्ध मी फोटो घेतला. सोबत खडके साहेब त्यांची टीम, पोलिस टीम, आणि अपघाताची चित्र ही जोडली आहेत.
पहाटे 3 सकाळी 8.00 पर्यंत तिथेच आम्ही उभे, बसून होतो शेवटी दुसरी बस आली, आणि 8.30 ला आम्ही त्या "काळ्या" सभोतलाचा निरोप घेऊन निघालो.
पण या दरम्यान माणसातला देव पाहिला, काही पुण्याई ही सोबत आहेच जेणेकरून अगदी खरचटले ही नाही, थोडा मुक्का मार अगदी थोडा जो या सर्व घटनेच्या दृष्टीने काहीच नाही ..अन पुन्हा देव आहे याची प्रचिती आली... ड्रायव्हर अब्दुल, खडके साहेब आणि टीम आणि पोलीस अशा समस्त लोकांना माझा साष्टांग नमस्कार...
या थरारक अनुभवानंतर न भूतो न भविष्यती असा आनंद लुटलेला एक विवाह सोहळा ही अनुभवला त्या विषयी पुन्हा लिहिणार आहेच . ...
प्रवास सुरु आहेच...थांबतो..
शरद पुराणिक
271220
कोणार्क एक्सप्रेस
Comments