चौर्यकर्म ...खोट्या प्रतिष्ठा, ईर्षा
चौर्यकर्म ...खोट्या प्रतिष्ठा, ईर्षा
आज मी जो विषय घेतला आहे तो अनेकांना थोडा असह्यनिय असेल, बोचणारा असेल ही. पण मग या मुखवट्या आतले खरे चेहेरे...त्यांचा एकंदरीत नाटकी वावर आणि ते आभासी विश्व ज्यात ते जगतात याची त्यांना जाणीव करून देणे क्रमप्राप्त आहे.
सध्याच्या या तांत्रिक माध्यमातून अनेक नव कवी, लेखक, साहित्यिक आणि अजून काय असे प्रत्येक क्षणाला अवतरत आहेत. मी ही त्याच गर्दीतला एक भाग आहे, पण मी फ़क्त आणि फक्त प्रामाणिकपणे व्यक्त होण्यासाठी ते वापरतो आणि त्यातून इतरांना फक्त आनंद, जुन्या आठवणी असं वाटून घेऊन ती आनंदाची अंगत पंगत करतो. मी स्वतः ला आज ही लेखक, साहित्यिक किंवा कवी असं अजिबात समजत नाही, कारण त्या साठी लागणारी वाचन उपासना, इतर साधना मी अगदीच किरकोळ किंवा नाहीच केली म्हणा हवं तर. कुठल्याही पदवी, पद किंवा प्रतिष्ठा या साठी एक विशिष्ट, प्रामाणिक आणि सततची साधना लागते मग ते कुठलेही क्षेत्र घ्या. त्या साठी घोर तप, कष्ट, अभ्यास आणि त्या सोबत विचार आचारांची परिपक्वता लागते, तर आणि तरंच तुम्ही त्या विशाल सागरात निदान काठावर उभे राहू शकता. घणघोर परिश्रम, व्यासंग आणि सतत विचारांची देवाण घेवाण केल्या शिवाय कोणीही स्वतः ला अशा उपाध्या किंवा बिरुद देऊच शकत नाही. आणि अशी बिरुद किंवा उपाध्या या तुमच्या वाचकांनी, समाजाने तुम्हाला देऊ केल्या तरंच त्या घेऊन मिरवण्याची ती मजा आहे. नाही तर मग ते अगदीच त्या सोंगाड्या, बहुरूपी किंवा रायरंद सारख होतं.
व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर पोस्ट च्या पोस्ट रोज पावसा सारख्या बरसत राहतात. ईथे पाऊस हा संदर्भ या साठी की तो ही पुनुरुज्जीवनाचा एक मोठा आधार आहे, त्याच्या येण्याने अनेक गोष्टी साध्य होतात. कचरा, घाण वाहून जाते, पाणी स्वच्छ होतं, झाडं नव्याने बहरू लागतात, शेत ही नवं रूप घेऊन पुन्हा नवसंजीवनी घेत. तसंच चांगल्या विचारांचं आहे, ते मनातली जळमटे दूर करतात, चांगल्या विचारांचे वाण घेऊन येते आणि तुम्ही ही या प्रक्रियेत तसेच स्वछ, निर्मळ होता. पण पाऊस ही सतत बरसात करत राहिला तर तो आपत्ती घेऊन येतो. अति तिथं माती. तेंव्हा आपण ही माध्यम वापरताना साहजिकच खूप सावधानता बाळगली पाहिजे, जेणे करून फक्त चांगलं आणि इतरांच्या फायद्याचं आहे तेच पेरावे.
माझा मुख्य विषय आहे तो म्हणजे इथे लोक अगदी सहजपणे दुसऱ्यांनी लिहिलेलं आपल्या नावावर पाठवून देतात. बरं हल्ली मी वर उल्लेखिल्या प्रमाणे पोस्ट चा ढीग असतो त्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट वाचूच शकाल असं नाही मुळीच. पण मग आलेल्या त्या कचऱ्यातून आपल्या कामाचं बाजूला काढून बाकी निर्माल्य विसर्जित केलं तरी चालत. पण मग त्या साठी तुम्ही वाचन गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की हे पूर्वी आपण कुठे वाचलंय का? मग थोडी शोधाशोध केली तर ते कळतही लगेच, तशी प्रभावी माध्यम आहेत, ज्या मुळे ते शक्य आहे. पण माझा राग, विरोध किंवा नाराजी आहे ती आशा लोकांवर की जे इतरांचे विचार "आपले" म्हणून पाठवतात. आता आपल्याला दोन ओळी जरी लिहायच्या असल्या तरी आपण तीन वेळा विचार करतो. असं असताना, ज्या व्यक्तीची पोस्ट आपण "खपवतोय" त्यांचा विचार करा, त्यांनी ते लिहिण्यासाठी किती विचार, वेळ आणि मन ओतून ते लिहिलं असेल. एवढंच नाही तर लिहिताना अनेक संदर्भ असतात आणि त्यांना जुळवुन तो व्यक्त होत असतो, मग असे उसने ...खरं तर उसने हा शब्द ही चुकीचा आहे कारण तिथे आपण समोरच्याला मागतो ..पण इथे तो अनभिज्ञ असतो ...तेंव्हा हे चौर्यकर्म या प्रकारात मोडते. मला हे ही मान्य आहे की ते चांगले विचार तुम्ही इतरांना चांगल्या उद्देशाने पाठवता, पण खऱ्या लेखकाच्या नावासाहित, किंवा शक्य असेल , आवश्यक असेल (काही खाजगी संदर्भ असल्यास) तिथे त्या लेखकाची परवानगी घेऊन पाठवा. या प्रकारे तुम्हालाही त्याचा आनंद मिळतो आणि ज्यांनी ते लिहिलं त्यालाही बरं वाटतं. हे अशा साठी काही मोठी मंडळी जे या क्षेत्रात प्रस्थापित आहेत, किंवा काही त्या मार्गावर आहेत तेंव्हा त्यांना हे साहित्य पूर्व प्रकाशित आहे किंवा नाही, असल्यास त्याचे संदर्भ द्यावे लागतात. त्या साठी आवर्जून इतरांच्या नावाचं लिखाण कधीही आपल्या नावावर पाठवू नये. माहिती नसल्यास तसे लिहावे.
यात दुसरा प्रकार म्हणजे थोडे हुशार असलेले विद्वान. हे असं कोणी तरी पूर्वीच लिहिलेले किंवा छापलं गेलेलं साहित्य थोडं इकडं तिकडं करून, त्यात स्वतः चे चार वाक्य घालुन आपल्या नावे पाठवतात. थोडी रंगरंगोटी, चार शब्द हेर फेर करणे, हे चुकीचे आहे. खोट्या प्रतिष्ठा किंवा उगाच स्पर्धा, ईर्षा म्हणून असे करणे टाळावे. त्या उलट तुम्हीच स्वतः स्पष्टपणे लेखकाचा उल्लेख करून टाकलं तर ते या खोट्या प्रतिष्ठे पेक्षा तर हे केंव्हाही चांगलंच आहे. निदान अशी प्रामाणिक पणे सांगावे की सदरील संदर्भ हे अमूक या लेखातून असे असे इथे वापरून, मी माझे विचार मांडत आहे.
तसं तर अनेक लेखक ही कोणाचे ना कोणाचे संदर्भ देऊन लिहितात, कारण वैचारिक देवान घेवाण ही त्या शिवाय पुढे जाणार नाही आणि वाचन संस्कृतीचे संवर्धन ही होणार नाही. पण ही मंडळी तसा प्रामाणिक नमोल्लेख एक तर त्यांच्या पुस्तकाच्या, काव्य संग्रहाच्या किंवा कादंबरी च्या अगदी सुरुवातीलाच देतात. अर्थात हे मी प्रकाशित साहित्या विषयी लिहितोय, पण मग या ही माध्यमात ती जबाबदारी आपण जाणली पाहिजे.
सध्या माझे अनेक मित्र या माध्यमातून फार सुंदर व्यक्त होतात. काही जणांचे वाचन एवढे अगाध आहे की त्यांनी जेवढी पुस्तके वाचली आहेत याची यादी ही दहा बारा फुल स्केप कागदांची किंवा त्या पेक्षा जास्त होइल, मग ते मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सर्व साहित्यावर आहे. त्यांचा पुस्तकांचा संग्रह ही एवढा आहे की परवा एका ने अनेक पुस्तके " घरी या आणि घेऊन जा" अगदीच काही देणार असाल तर एक कप चहा द्या, असं म्हणुन अक्षरशः वाटली. काही जण तर महिन्याला आपण किराणाची यादी करतो तशी दर महिन्याची पुस्तकांची यादी करून दुकानात रांगेत उभे राहून ती नियमाने घेतात. अर्थात इथे दर महिन्यात माल वेगवेगळा असतो. ☺️
आता मला सांगा एवढा अभ्यास करून कोणी लिहीले असेल आणि ते जर कोणी इतरांनी त्यांच्या नावावर "खपवले" तर त्या व्यक्तीची आपण किती प्रतारणा करतो.
"बौद्धिक संपत्ती अधिकार" हा कायदा ही खूप कडक आहे जो जास्त करून संशोधन प्रक्रियेसाठी अमलात आणला जातो. पण वैचारिक लेखन आणि त्याचा संदर्भ जुळवून आपली विचार संपत्ती ही अशीच बौद्धिक संपत्ती आहे. पण चांगल्या गोष्टींची देवाण घेवाण ही समस्त पिढी आणि पिढ्यानपिढ्या प्रगल्भ करत असते त्या साठी इथे कठोर निर्बंध नाहीत.
बरं ही खोटी प्रतिष्ठा शाश्वत नाहीच, एक दोन वेळा लपते, पण मग जेंव्हा ती उघडी होते तेंव्हा तुमच्या असलेल्या प्रतिभेला ही डागाळते. हे मी सध्या प्रचंड वादातीत असलेल्या व्यक्तीविषयी आवर्जून लिहिलेले नाही याची नोंद घ्यावी. हे सर्व साधारण आजच्या सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमाशी संबंधित लिहिले आहे. उगाच तो लिहितो मग मी ही लिहून काढतो असं इर्षे पोटी करू नये, तसं करायला ही हरकत नाही पण मग ते प्रामाणिक असावं असं मी म्हणतो.
दुसरा अजून एक वर्ग आहे जो वाचतच नाही ...ते असलं आपण वाचत नसतो ..किंवा ह्हे त्याचं काय वाचायचं असा उपहासात्मक विरोध. खरं तर तुमच्या वाचण्या न वाचण्याने त्या लेखाचं मूल्य तसूभरही ही कमी किंवा जास्त होत नाही. उलटपक्षी तुम्ही काही तरी चांगले संदर्भ, माहिती या साठी मुकलेले असता. पण अज्ञानात आनंद ...जय हो.
शरद पुराणिक
19082020
Comments