नमस्कार,
कालच्या माझ्या कोरोना अनुभवाच्या लिखाणावर व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर शेकडो प्रतिक्रिया आल्या. माझ्या साहित्यिक समूहावर, हैदराबाद च्या समूहावर आणि असंख्य इतर ठिकाणी ही आल्या. सर्वच पाठवणे शक्य नाही पण माझ्या दोन मित्रांच्या फारच बोलक्या प्रतिक्रिया आवर्जून इथे पाठवत आहे. ही आत्मस्तुती नसून किंवा जास्तीचं कोड कौतुक नाही, पण प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडतं आणि त्याचं योग्य विश्लेषण आहे म्हणुन. ज्यांची प्रतिक्रिया ईथे टाकू शकत नाही त्या साठी माफी मागून या दोनच प्रातिनिधिक स्वरूपात इथे कॉपी करतोय.
माझा मित्र मदन देशमुख ::
छान वाटलं शप्पू...! तुला ॲडमिट केल्याचं विश्वास ने कळवलं होतं. काळजी वाटत होतीच. पण तुझ्याशी बोलून ती तुला कळवण्यात काहीच राम नव्हता. या संकटात केवळ धैर्य आणि सकारात्मक मानसिकताच तारून नेते हे आता सर्वश्रुत आहे. या आजाराला सामोरी जाणारी बरीच मंडळी नेमकं हेच विसरून परिस्थिती अधिक चिंताजनक बनवतात.
पण अगदी मनापासून सांगतो.. तुझ्या बाबतीत ही काळजी मनात आलीच नाही. तुझ्या आचार-विचारात, अशाच नव्हे तर बहुतांश प्रसंगी दिसणारं, आध्यात्मिक संस्कारातून आलेलं एक सुस्थिर मानसिक अधिष्ठान आहे. ते या ही प्रसंगी तुझ्यासोबत आहे याची खात्री होती.
आणि आपलं कुटुंब तर चेतनेचं.. चैत्यनाचं स्त्रोतच असतं..! तोच तर कणा असतो... आपल्या कणखरतेचा..! आपल्याच मुलांच्या समजूतदारपणाचं कौतुक खरंतर आपणच नकोच करायला.. पण जेंव्हा याचा अनुभव येतो तेंव्हा मात्र आपल्यातला बाप हळवा होतो हे खरंच..!
अनिताच्या रूपात असलेल्या आदिशक्तिला नमन...!
काही तरी पुण्य घडलेलं आहे आपल्या हातून... म्हणून आपली लग्नगाठ भगवंताने अशी मारलेली आहे.. असं तू मान्य करायला हरकत नाही..!
बायको म्हणजे
म्हणायला जोडीदार...
पण खरं तर
असते आधार...
बायको म्हणजे
म्हणायला फणा...
पण खरं तर
असते कणा...
बायको म्हणजे
म्हणायला घाट कळसाचा...
पण खरं तर
असते दगड पायाचा...
ती जोडीदार.. तीच आधार...
ती फणा... तीच कणा...
ती कळस... तीच पाया...
बायको म्हणजे
कुटुंब गुंफणारा बंध...!
बायको म्हणजे...
नवरा नामक कापसाचा...
फाया करणारा गंध...!
कापसाच्या बोळ्याचा फाया करणारी गंधीत सहचारिणी परमेश्वराने दिली आहे.. जी स्वतः याच संकटाला झेलत असूनही तुझ्याही सोबत उभी होती.. हे पुण्यफल आहे मित्रा..!
या संकटातून सुखरूप बाहेर पडला आहात हे वर्तमान फार सुखद आहे..!
आता विश्रांती घ्या.. ठणठणीत व्हा... काळजी घ्या..!
शुभेच्छा..!
🙏🙏🌹🌹
Comments