एक जखम, आज तिला फुंकर घातली मनाने...
एक जखम, आज तिला फुंकर घातली मनाने...
आज जरा भावनिक अशा आशयावर लिहीत आहे. जो माझ्या स्वतः साठी तसेच आमच्या समस्त कुटुंबासाठी ही अत्यंत वेदनादायक आहे. जखम जुनी असली तर आत ती तशीच तप्त आहे, काल पासून मन सतत फुंकर घालून ती पुन्हा पुन्हा धगवत आहे, मन सतत हेलकावे खात होतं, लिहू की नाही. कोणाला काय वाटेल, ज्यांचा हा विषय आहे ती लोक पुन्हा अस्वस्थ होतील. तर या संवेदनशील विषयावर व्यक्त होऊन माझ्या आत पेटलेला काहूर शांत करावा का ? आपण शांत होऊ ही कदाचित पण इतरांचं काय, हा कोलाहल सुधरू देत नव्हता. पण हिंमत करून लिहिले सर्वांची माफी मागून, नाईलाज आहे !!
आज 29 जून महेश राव (माझ्या बहिणीचे यजमान आपल्यात शरीराने नाहीत) यांचा जन्मदिवस.
1996 साली माझं लग्न ठरले, नंतर सविताचे ही ठरवले आणि हे दोनीही विवाह सोबतच पार पडले. 15 मे 1997 ला त्यांचं आणि 17 मे ला माझं. सविताच्या लग्नाचं मी माझ्या मित्रांच्या मदतीने ठरवलं होतं. सुशांत कुलकर्णी (आज त्याचा ही जन्मदिवस आहे) सुनील देशपांडे, सुहास जोशी याचा ही यात सहभाग होता. आणि लग्न ठरले. सविता शास्त्रीय संगीत विशारद तर महेश राव उत्कृष्ट तबला वादक असा तो दुग्ध शर्करा योग जुळून आला.
सतत हसतमुख, दिलखुलास, हरहुन्नरी व्यक्ती ती, साखरपुडा झाला आणि आमच्या दोघांचे नाते नकळतपणे कधी मैत्रीत बदलले ते कळलेच नाही. लग्नाची लगबग सुरू झाली, जसं जसं लग्न जवळ येत होतं तसा मी व्याकुळ व्हायचो, एक भाऊ बहिणीच्या लग्नाच्या विचाराने होतो तसंच काही तरी. पण यांच्या सारखा एक गुणी, मित्र माणूस मिळाला याचा आनंद ते सर्व विसरायला लावायचा.
आमच्या दोनीही लग्नाची खरेदी मी आणि महेश राव यांनी सोबत केली. एकदा तर आम्ही त्यांच्या bike वर औरंगाबाद ते नगर ला गेलो, त्या काळी किंबहुना आज ही लग्नाची खरेदी अहमदनगर ला करण्याचा मान आहे. लोक अगदी 2 ते 4 मोठी वाहन घेऊन जातात आणि हा एक मोठा कार्यक्रम असतो. असो आम्ही तिथे गेलो दोघच, त्यांच्या आवडीचे कपडे घेतले, कारण माझे कपडे आमचे सासरे घेणार होते, अर्थात त्या साठीही ते माझ्या सोबत होतेच.
Belt, tie, couplings, shoes अशी सर्व खरेदी करून आम्ही त्या रात्री परत आलो. अगदी कुर्ता, जीन्स ते कोल्हापूरी चप्पल असं सर्व एकसारखे घेतले. लग्न झालं, त्यांच्या सीमंतिनी च्या दिवशी बहारदार संगीत रजनी झाली. दोन दिवसांनी माझं लग्न ही थाटामाटात झालं.
आता जे मी सांगणार आहे ते वाचुन तुम्ही विचारात पडाल. आम्ही honeymoon ला ही 3 जोड्या मिळुन गेलो, यात आमचे एक बंधू जयेश ज्यांचं लग्न 8 मे ला झाले, तो हो आमच्यासोबत जाण्यासाठी थांबला होता. आमचे एक जीवश्च मित्र सुहास यांचे लग्न ही त्याच महिन्यात 24 ला होते, ते आटोपून त्या नंतर आम्ही 3 जोड्या निघालो. बंगलोर, उटी, म्हैसूर, कोडईकानल ला गेलो.
पहा बहीण भाऊ आणि एक मावसभाऊ अशी ही honeymoon यात्रा केली. हे सांगण्याचा अट्टहास एवढ्यासाठी की त्या पातळीची मैत्री आमच्यात होती. यातील तिसरा माणूस जो आणि मी शिक्षण, नोकरी, लग्न असा सहप्रवासी आहे, या दुनियदारीत सध्या दुरावला आहे, कामाच्या व्यापात असतो, चालतं वक्त वक्त की बात है. पण संबंध चांगले आहेत.
असा हा दिलदार, अजातशत्रू, हसतमुख जावई कधी जावई म्हणुन वागलाच नाही. आमच्या औरंगाबाद आणि पुण्याच्या वास्तव्यात अनंत वेळेस घरी आलेच आहेत. आला की सरळ स्वयंपाक घरात येणार, तिथे आत बसून चहा पिणार. जेवायला सर्व सोबत गोल मंडळ करून बसायचो. कधीही फॉर्मलिटी म्हणून जावई प्रोटोकॉल त्यांनी वापरू दिलाच नाही. त्यांचं येणं कायम हवं हवं वाटायचं. एक ऊर्जा स्तोत्र, हसण्यावारी नेऊन अनेक समस्या अशा चुटकीसरशी दूर करण्याचा आत्मविश्वास, तितकाच प्रेमळ माणूस.
1997 ते 2010 या दरम्यान एखादी दुसरी वगळता सर्व दिवाळी आणि अनेक सण वार आम्ही एकत्रित साजरे केले. अनेकदा माझ्या घरचा आकाशकंदील महेश राव आल्यावर त्यांनी लावले. चहाची लहर आली तर अनिता ला अगदी किचन मधे जाऊन सांगणार आणि तिथेच फतकल मारून गप्पांचा फड बसायचा. रात्री रात्री उशिरा असे हे फड रंगत असायचे.
कुठल्याही प्रसंगात मदतीसाठी दत्त म्हणून हजर. आणि उत्सवी वृत्ती, आनंद लुटण्याची प्रबळ इच्छा इतकी की त्यांचा भाऊ मंगेश च्या लग्नात त्यांच्या पायाला plaster होते, पण हे त्या प्लास्टर सहित नाचले. अशी कायम आनंदाची उधळण करणारा हा अवलिया. माझ्या मुलांच्या मुंजीत 2008 साली ही एक संगीत रजनी करायचा विचार मी बोलवुन दाखवला, आणि त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवला. कोणी कितीही रागावले तर अजिबात न चिडणारे, प्रचंड थट्टा मस्करी पण कधी ही कोणाला दुखावलं नाही.
एक ना या अनेक अशा अनंत आठवणी साठलेल्या या नात्याच्या कोठीत सुरक्षित आहेत.
पण म्हणतात ना " जो आवडे सर्वाना तो ची आवडे देवाला" असं त्यांना खूप लवकर देव घेऊन घेला. जानेवारी 30, 2010 ची ती काळरात्र मी विसरुच शकत नाही. आजवर अनेक दुःख मी झेलली पण ज्या क्षणी ही बातमी मला कळाली मी अक्षरशः कोसळलो. घटना झाली तो दिवस सविता माझ्याकडे होती, तिला संध्याकाळी सोडलं, आणि महेश राव शी आम्ही बोललो ही. अन त्याच रात्री ते सर्व संपलं ....आयुष्यावर झालेला तो प्रचंड मोठा आघात .... पुढे अनेक प्रसंग आले पण दादा आणि परिवार खंबीरपणे उभे राहिले..त्यांचा आधार, आणि सविताच्या हिमतीवर ते कुटुंब आज स्थिरावले... त्या माझ्या बहिणीला देवाने कायम सुखात आणि आनंदात ठेवावे हीच ईश्वराला प्रार्थना... जखम कायम ओली च ती कधी कधी किंबहुना प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगातून दुखावते. दरम्यानच्या काळात शनिवारी, रविवारी औरंगाबाद ला गेलो. कार्यालयीन बाबती पूर्ण करण्यासाठी आणि थोडा मानसिक आधार म्हणुन.
त्याच महेश राव यांचा आज जन्मदिवस ...जिथे असतील तिथे ते नक्कीच आठवत असतील हे सर्व ...अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...
पण म्हणतात ना genes , शौनक (बहिणीचा मुलगा) त्यांची च छबी आहे, तसाच हसरा चेहेरा, विविध वाद्य वाजवण्याची कला, तितकंच प्रेम आणि माया. गेल्यावर्षी माझा जो Surprise 50th कार्यकर्मात त्याचा हिरीरीने सहभाग होता, आमची मुलं आणि तो म्हणजे एक वेगळंच रसायन आहेत. अगदी तशीच नात्या पलीकडले मित्र, जिवाभावाचे. तशीच माझी सई बाई सुगुना, अर्थात शर्वरी.
माझ्या मनाची ही अवस्था कायम होते, मग ते marriage anniversary असो की वाढदिवस तो ही असा मागे पुढे येतो आणि मी गहिवरतो.
शरद पुराणिक
290620
Comments