!! ते 24 तास आनंदाच्या झाड सावलीत !!
!! ते 24 तास आनंदाच्या झाड सावलीत !!
समस्त वाचकांना दीपावली शुभचिंतन 🙏🏻
आजचा विषय म्हणजे एक 24 तास जगलेलं वेगवान rapid जगणं. किती आनंद वेचला म्हणून विचारू नका. परडी, टोपली, डाल, अन सगळ्या थैल्या भरून ओसंडून वाहिल्या, काही वेचता वेचता पडले ही असतील. कुणी वाटसरू ते उचलतील ही अगदी प्राजक्ताच्या अंगणभर आच्छादित सड्यातून लाल देठ अन नाजूक आकाराची फुलं वेचावीत तशी.
झालं असं की लॉकडाऊन नंतर आताच नोकरी सुरू झाली अन दोनच आठवड्यात दिवाळी आली. काहीही झाली तरी हा सण असा एकट्याने कुटुंब सोडून बाहेर साजरा होउच शकत नाही ...निदान या क्षणापर्यंत तरी तसा कमनशिबी योग आला नाही... या साठी देवाचे आभार. पण या वर्षी जरा कठीण वाटलं होतं.
शुक्रवारी सकाळी सुटी नसतानाही हैद्राबाद वरून मित्राच्या कार ने 550 किमी प्रवास करुन पुण्यात पोचलो. देवासारखा तो भेटला नाही तर ऐनवेळी बस, विमान, रेल्वे असं काहीच शक्य नव्हतं. त्या मुळे या आनंदाचे वाटेकरी क्रमांक 1 आमच्या पुणे सहप्रवासी समूहाचे सदस्य श्री राजेंद्र. सोबत एक अजून जण होता जो मार्च नंतर नोव्हेंबरमध्ये घरी निघाला होता. एकदम सुखकर प्रवास पुणे पर्यंत झाला. कधी एकदा घरी जातो अशी भावना आता हरवली अन घरात पोचलो. घरी आधीच सर्व लख्ख होतं त्यात माझ्या येण्याच्या आनंदात फुललेले चेहेरे अन वातावरण अजून चमकुन गेलं. लक्ष्मी पुजन झालं ज्याचे काही क्षणचित्रे आधी टाकलेच होते. अन आवरासावर करून काल सकाळी 10:15 ला गाडी काढली अन थेट औरंगाबाद गाठलं. खरं तर सौ अनिता चं म्हणणं होतं, तुम्ही अगदीच दोन दिवस आहात तर दिवाळी पुण्यात करू आणि नंतर आम्ही औरंगाबाद ला जाऊ.. पण माझ्या साठी त्यांच्या आनंदाला मी का मोडता घालु, किंवा आनंदावर विरझन ...आता काही लोक असतात जे स्वतः च्या स्वार्थासाठी किंवा अडेल पणासाठी इतरांच्या आनंदावर विरझन घालतात, जे स्वतः ही आनंदी जगत नाहीत अन इतरांना ही तो पुर्णतः उधळू देत नाहीत. पण मी किंवा सौ असं काहीही कधीच करत नाही. मला त्रास होण्यापेक्षा आनंदच होणार होता. गेल्या 8 ते 10 महिन्यात सहकुटुंब असं बाहेर जाणं कोणालाही शक्यच नव्हतं तसं आम्हालाही. अन घरात ही सर्वच स्वावलंबन तत्वावर सर्व सण वार, सोहळे साजरे झाले, त्या साठी एक छोटा मानसिक ब्रेक गरजेचा होता.
अन आम्ही निघालो त्या अमुल्य क्षणांना वेचण्यासाठी. प्रवासात गाडीच्या बाजूने असंख्य दुचाकी ज्या वर बाळ, आई एक दोन पिशव्या असे असंख्य सह प्रवासी त्या क्षणांना आपलसं करण्यासाठी धावत होते. असंख्य चारचाकी अन काही अगदी टेम्पो, रिक्षा असं निघाले. आमची गाडी ही अगदी उतू गेली होती इतक्या पिशव्या, त्यात दोन दुष्ट लॅपटॉप ही होते. अन दोन तीन मोठ्या फराळ पिशव्या ...साधारणपणे 15 घरात पोचतील आशा..त्याचे वयक्तिक पॅकिंग, भेट वस्तूंच्या दोन पिशव्या. कपडे...छोट्या बाळांचा खाऊ वेगळा. असा तो भरगच्च प्रवास सुरु अन मायेचे फोन अन संदेश सुरू झाले अन ती अनामिक हुरहूर.
तिकडे सासरी पोचलो, दारात तुकडा ओवाळून स्वागत झालं... हा एक क्षण आतुन ती मायेच्या ओढीने पाहणारी माय, भावजय, भाचे भरल्या नजरेनं पाहतात अन सुखावतात. काहीं आसवं ही चमकून लुप्त होतात. आताशी त्या झाडाच्या आसपास पोचलो असतो आपण. सहभोजन, चहा पाणी झालं. या आनंदाच्या झाडाचं एक दुसरं खोड आमची तितक्याच आतुरतेने वाट पाहत होत. ते म्हणजे संजू आणि पालकर परिवार. या परिवाराविषयी मी पूर्वी ही लिहिलं आहेच. संजू अनिताचा मामे भाऊ, पण वडील गेल्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्या तो अति उत्साहाने पार पाडतो. सोबत सचिन अन आशिष या बंधूंची बरोबरीने साथ हा गाभा आहे. भावाच्या संकल्पात मम म्हणुन झोकून देणारे हे सर्व भाऊ अन त्यांच्या सहचारिणी रेणुका, मोहिनी आणि अस्मिता आणि आदरणीय मामी. ज्यांच्या सहभागाशिवाय हा संकल्प सिद्धीस जाणे शक्यच नाही. अशा या यज्ञात यजमान म्हणून संजु ने घेतलेल हे आसन म्हणजे दिव्य संकल्प. तो सतत फोन करून लवकर येण्यासाठी आग्रही होता, एवढंच नाही तर त्याने स्वतः केलेल्या तीन प्रकारच्या भाज्या, त्यांची तयारी असे फोटो पाठवुन तो अजून गंमत करत करत बोलवत होता. काही क्षणात इथे पोचलो, इथेही पुन्हा तसेच पोळीचा तुकडा ओवाळून स्वागत झाले, अन मी पुन्हा शहारलो. इतर काही ठिकाणी अगदी तोंड वेडेवाकडे करून किंवा कपाळाच्या आठयांनी स्वागत करणारे लोक आणि इथे हे. किती तफावत. काही ठिकाणी आनंदाचे फटाके तर काही ठिकाणी अनावश्यक शब्दांच्या फटाक्यांच्या आवाजात स्वागत. मला आनंद देणारी, तो यथेच्च उधळणारी अन निखळ लोक कायम भावतात अन मग माझ्या लेखी ते इतर सर्व पुसून जातं. हे सर्व इथे कायम आहेत अन म्हणुन मला ते भावतात.
आम्ही पोचता क्षणी भोजनासाठी आग्रह झाला पण राजू अंजु म्हणजे आमचे मेहुणे आणि सासूबाई यांचा आग्रह झाला आणि 4.30 ला जेवलो होतो, त्या मुळे मी नंतर जेवू असं ठरवुन त्या आनंदाच्या झाडाच्या सावलीत सुखावत होतो. घरात साधारणपणे 50 ते 55 लोक होती. आता कोरोना काळात 50 लोकांची परवानगी वगैरे विचारू नये. वडिलांच स्वप्न असलेला तो चंद्रमा बंगला साधारण 25 खोल्यांचा आहे. त्या मुळे जागा हा प्रश्न नव्हताच मुळी. पण जागा असूनही ही निर्मनुष्य बंगले इह आहेत पण यांना अन्नपूर्णा प्रसन्न आहे आणि कायम एक डझनभर लोक तरी वास्तव्यास असतात अधून मधून. हळूहळू गर्दी वाढत गेली अन ते झाड आता डोलायला लागले. खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू, हास्याचे स्फोट, टाळ्या, समोर बाळगोपाल फटाक्यांच्या आवाजात स्वागत करत होते. आत गरम गरम मुंगभजी तयार करत व्यस्त भगिनी, काही कोशिंबिरी, चटणी, भाजी यांची मांडामांड अशी लगबग सुरू. अगदी परवा व्हाट्सअप्प वर एक जुने दिवाळी तयारीचे चित्र आलं तसंच काही तरी. आलेल्या लेकींचे गालगुच्चे तर कचकटुन मिठ्या,नमस्कार अशी प्रेमळ क्षणांची बरसात झाली. जेवणाच्या ताटात पदार्थांची गर्दी, गप्पांचा पाऊस, अन हास्याचे लोट यात किती पोळ्या हाणल्या याचं भान नाही, पण अतिथीभोजनाची तृप्ती अनुभवली. त्याच महालात निद्रामंच ही होता, पण कोपऱ्या कोपऱ्यात वय मान परत्वे छोटेखानी समुह दबक्या आवाजात चर्चेत होते, सोबत मेहेंदीचा कार्यक्रम असा सुरू होता. झोप कधी लागली कळलंच नाही. 24 तासातले 12 ते 14 तास होऊन गेले.
आज पाडवा अन भाऊबीज असा दुहेरी संगम. उटणे आणि तेलाने अक्षरशः मी न्हाउन निघालो, साधारण डझनभर बहिणी, मेहुण्या, सासवा अन भाच्या यांनी औक्षवन केले, सुगंधी उटणे, तेल लाऊन अभ्यंगस्नान झाले ...मधेच पुन्हा औक्षवन .. अन मी पून्हा गहिवरलो. माझ्या वाट्याला आलेला हा सुखाचा ठेवा कुठल्या झोळीत मावणार? तुम्हीच सांगा. सोबत नाश्त्यासाठी गरम बटाटेवडे, भेळ असा बेत मग मी ही 2 ते 3 किलो इम्रती आणली अन त्या पुण्याच्या पुरात एक थेंब मिसळला. सर्वांचे फराळ वाटप केले.
आता अगदीच 3 तास माझ्या हातात होते. त्यात ज्येष्ठ बंधु, वहीनी आई यांची जलद भेट, औक्षवन, नमस्कार करून ज्येष्ठ भगिनी कडून औक्षवन, देवाण घेवाण अन प्रेमाची उधळण. ही बहीण म्हणजे एक दिव्य रसायन ...आज पर्यंत कधी हिने मला दुखवलच नाही, अति प्रेमळ मूर्ती. तसेच आमचे भाचे. लगेच मोर्चा छोट्या बहिणीकडे वळवला ..इथे जिजाजी नसल्याने एक दुःखाची झालर कायम झाकण्याचा मी प्रयत्न करतो. पण तिथेच तिचे सासरे, सासू, दिर होते, पुन्हा औक्षवन, देवाणघेवाण पणतिकडे तिच्या सासर्यांची नजरानजर झाली अन आसवांचा बांध फुटला..पुन्हा डोळे पुसून सुखावलो अन दुःखाला मागे टाकलं.
या 24 तासातला शेवटचा 1 तास, त्यात राजू म्हणजे आमच्या सासुरवाडीत अनेक गोड बातम्या, स्वादिष्ट रुचकर पक्वान्न भोजन प्रतिक्षा करत होते ..पुन्हा संजु, आशिष अतुल, राजू यांच्या सोबत गप्पा झाल्या अन बायको पोरांना तिथेच ठेऊन मी हैदराबाद ची रेल्वे गाठली.
गाडी लागली होती, डब्यात अनेक नववधू माहेरची चोडी बांगळी घेऊन पुन्हा सासरी निघाल्या होत्या अन बाहेर त्यांची आई आसव पदराला पुसत उभ्या होत्या.. बाप भाऊ आसवं लपवुन होती, अन आत ही धायमोकलून रडत होती... नकळत माझे गाल ही आसवांनी भरले अन ते 24 तास सावली देणारे झाड दृष्टीआड होत गेलं ...पण ती सावली अनंत काळ पुरणार आहे ...
आज झाडाच्या दुसऱ्या खोडावर पुन्हा दिवाळी तेवत आहे जिथे हिचे मामा, अर्चना मामी,अमोल अभिजित, नीता, बाली आणि इतर यजमान आहेत जीथे मी नाहीये ...त्या विषयी पुन्हा ..क्रमशः
बायकोच्या सर्व बहिणी स्वाती, नम्रता, श्रद्धा, सर्व भावजया रेणुका, अंजु, मोहिनी, नीता, श्रद्धा, अस्मिता, अदिती, सासूबाई, मंगल मामी, अर्चना मामी, बेबी मावशी, छाया मावशी हे म्हणजे अनुक्रमे रंगीबेरंगी फुलझड्या, गर गर फिरणारे भुईचक्कर, अन झाडं (नळे)....मयूर, स्वप्नील, निशांत, हर्षल, हे सुतळी बॉम्ब, तर लवंगी फटाके म्हणजे चिल्लर पार्टी ( दीड डझनभर)...अन सर्व काका, मामा. यांच्या मुळे दिवाळी रंगत जाते बहरते ...त्या दिवाळीच्या पुनःश्च शुभेच्छा ....
शरद पुराणिक
ट्रेन 07050
औरंगाबाद ते हैदराबाद डेक्कन
161120
Comments