घरची तुळस कोमेजून गेलीं


 कित्येक वर्षापूर्वी सासू सुनेला सांगायची अग बाई अंगणातल्या तुळशीला रोज पाणी घाला ...दिवे लागणीला दिवा बत्ती करून देवा समोर ही दिवा बत्ती करून कपाळी कुंकू लाव...थोरा मोठ्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घे... बिच्चारी सून डोक्यावर पदर घेऊन हे सगळं करत असे...काळ थोडा बदलला कुटुंब मोठी झाली अन घर छोटी झाली... तस कुटुंब ही विभक्त झाली...मुख्य घरची तुळस कोमेजून गेलीं ..एरवी चार चार जणी तिला पाणी घालणाऱ्या आज स्वतःच घरच पाणी भरता भरता नाकी नऊ होऊ लागले ...स्वतः च्या राबत्या मध्ये जुने संस्कार उतरंडीला गेले...तिकडे गावी अंगणातली तुळस यांच्या येण्याची वाट पाही ...सण वार असला म्हणजे ती आनंदानं झुलायची फुलुन यायची...कारण घरात प्रवेश तिला पाहूनच होतो ..तीच आधी स्वागत करते..तिला नमस्कार करूनच घरात पाऊल पडे... चार दोन दिवसांत परतीला निघाले की तीपुन्हा कोमेजायची... जाणारी सून ल्योक नातवंड डोळे भरून पाहून घायची ...तस मंडळी ही पाणावल्या डोळ्यांनी तिचा निरोप घेऊन उंबरठा सोडायची... काळ जरा अजून बदलला ...गावी जाण येणं कमी झालं ..जुने वाडे पडले ...मानस विखुरली ..दुभंगली.. विभागली अन माझी तुळस माय पार नामशेष झाली... कुणाला तिची आठवण म्हणून ती छोट्या रोपट्यातून विभागून मिळाली आणि वेगळ्या बिर्हाडा त वाटली गेली... कुठे पत्र्याच्या डब्यात ।।कुंडीत.. जुन्या तुटक्या लोखंडी बादलीत ..मिळेल त्या जागेवर राहू लागली... शहर मोठी झाली आणि घर अजून छोटी झाली माझी तुळस माय जवळ जवळ नाहीशी झाली..... मधल्या काळात समाजाला अनेक दृष्टांत झाले आणि नाहीश्या झालेल्या तुळशीचे महत्व कळू लागले... कोणी तिला औषध रूपात तर वास्तु शास्त्रात तर कोणी धर्म रूपात तिला पुन्हा स्वीकारले.... माझी तुळस माय पुनरुज्जीवित झाली... हळू हळु तिला सदनिकात स्थान मिळाले...मोठ्या मोठ्या बंगल्यात तिला जागा मिळाली...जिच्या विवाहाला पूर्वी एक ऊस आवळा कऊट ...नवरदेव म्हणून देव घरातील रंगनाथ (विष्णु) ..अन प्रसाद म्हणून थोडं कांही तरी गोड... दिवाळीची उरलेली... लपवुन ठेवलेली फटाक्यांची एखादी लड... अगदी साधं साध असायचं सगळं जे ही पूर्ण थांबले होते...त्याच तुलशी विवाहाचे या वर्षी सोहळे पाहिले ...अनेक छायाचित्रे पाहीले आणि तिची श्रीमंती पाहुन माझे डोळे लकाकले विस्फारले... कोणी पैठणी नेसवली.. उंची ऊंची दागिने घातलें.. पत्रिका छापल्या.. मेजवान्या घातल्या... अन एका गरीब फाटक्या बापाची पोर राजघराण्यातील सून व्हावी आशा काही भावना माझ्या झाल्या..."किंवा आयुष्य भर राबून काबाड कष्ट करून खंगलेल्या आईला एकदम भरजारी साडीत आन गळा भर दागिन्यात मढवून ती अशी सोन्यासारखी पिवळी गर्द व्हावी तसेच काही भाव आज माझ्या मनात आहेत.... जय तुळसी माई...


आज आलेल्या अनेक पोस्ट... व्हाट्सएपच्या संदेशावरून सुचलय आणि लिहिलंय....शरद पुराणिक ..हैदराबाद...

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी