जीवन एक खळखळता प्रवाह
जीवन एक खळखळता प्रवाह
ओढ्याच अन नद्यांचे पाणी जसं बदलत जातं प्रत्येक पावसाळ्यात, नवीन पाणी येतं अन जातं, तसंच नवीन घटना, प्रसंग येतात अन जातात. दिवस तर जातातच पण त्या घटना ही त्यासोबत जातात तशाच.
गोष्टी जेंव्हा कळत नसतात तेंव्हाचा तो आनंद किंवा तो आनंद आहे की दुःख हे ही न समजणारी परिस्थिती, अगदीच मजेशीर असते. अन जेंव्हा त्या आठवतात तेंव्हा अलगद हसतो नकळत आपण स्वतःला, कधी पश्चात्ताप होतो, अरे तेंव्हाच कळलं असतं तर, पण तो काळ त्या गोष्टी काळण्याचा नसतो हे समजते आणि हताश होतो आपण.
वयात यायला लागल्या नंतर घरच्यां पेक्षा मित्र जवळचे वाटू लागतात. या वयात मित्राला कसं ओळखावं, तो आपला मित्र एवढंच मनात पक्कं केलेलं, पण जेंव्हा तो हात देतो तो होणारा पश्चात्ताप, काय फ़रक वरील स्थितीत आणि याही, अगदी काहीही नाही असं नाही, पण झालेली चूक लक्षात येते. ती पून्हा होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असतो.
आता हवे तेच मित्र असतात, जवळीक वाढते, एकमेकांविषयी भावनिक होतो, चर्चेचे विषय वाढतात. घरात न बोलता येणाऱ्या गोष्टी मित्रांपुढे बिनधास्त चर्चिल्या जातात. आर्थिक अडचण, मानसिक त्रास, सुख दुःख सारं सारं भडाभडा ओकायचं, ती उलटी आपोआप येते कारण पित्त तेवढं तिव्र असतं.
मित्र अचानक दुरावले जातायत की काय असं वाटतं एक दोन दिवस भेट नाही झाली तर. नंतरच्या भेटीत त्याची खरडपट्टी करायची हे ठरवुन जायचं, तो येतो नेहेमीप्रमाणे सफाई देतो, विषय संपला. मन मात्र या सबबींवर विश्वास ठेवायला तयार नसतं. पण समजुतीने घ्यायच. पुन्हा गप्पांना रंग चढतो, घड्याळ वेड्यागत पळत असतं पण त्याचं कोणालाही सोयर सुतक नाही. घड्याळ पाहताक्षणी विषय तिथेच थांबवुन घरी जाण्याची प्रगट इच्छा एका बाजूला, पण विषयाचा रंग फुलत जातो, पाऊल उचलत नाही.
एका खोल शांततेत घरात पाऊल टाकायचे, कधी काळी येता क्षणी आपुलकीने विचारणारे बाबा, पाठ फिरवून तसेच दिवाणखाण्यात जातात. स्वयंपाक घरातून आई एक रागाचा कटाक्ष टाकून जेवणाचे वाढते सोबत भांड्यांचा आवाज करत. दीदी दारात थांबून सगळं पाहत असते, तिचाही चेहेरा तसाच. जेवण झाल्याक्षणी किंवा न जेवताही पुन्हा त्याच कट्ट्यावर जाऊन बसावं हे आतुन आर्त घालणारे भाव, जिथे स्वागत होईल, गमती जमती होतील. इतक्यात पेपर हातात घेऊन बाबा येतात, दिवस भराची कमाई काय हे विचारतात, त्यांना उत्तर द्यायचं नसतं कारण ते नसतंच. दिवस भरात काहीही केलेलं नसतं, तरी त्यांचं हे विचारणं मनाला पटत नाही.
रात्री अंथरुणावर पडल्यावर लक्षात येतं, आई बाबा असे वागले का वागले, पण त्याचं ते योग्यच असतं. दुसरे दिवशी सकाळीच नोकरी शोधत निघायचं असं अनेक वेळा ठरवून ही होत नाही. दिवस येतो तो, कॉल घरी येऊन पडलेला असतो पण घरच्यांना त्याचं काही वाटत नाही, सगळे नकारार्थी विचारात बुडालेले, तिकडे बाहेर मित्र पार्टी साठी दात कोरुन बसलेले.
आज हजर होण्याचा दिवस, बाबा सवयीप्रमाणे सर्व सूचना देतात. सगळं कसं नवीन नवीन. आज मित्रांचा विचार मनात येत नाही. येन केन प्रकारे नोकरीत स्थिरावतो.
अशात मित्रांच्या भेटी होत नाहीत याची खंत असते. असो, आपली नोकरी महत्वाची, ऑफिसचे उद्याचे ढीगभर काम डोळयांसमोर , साहेबांचे रागावणे, प्रमोशन ची टांगती तलवार, पुन्हा थोडं अस्थिर.
आता एका अगदी जवळच्या सल्लागाराची आवश्यकता असते, अडचणी मित्रांजवळ सांगून उपयोग नाही असं मनात वाटू लागतं. ऑफिसातली ती उगाच डोळ्यासमोर तरळू लागते, ती दिसली की प्रश्न, अडचणी दूर राहतात. तिचं पाहणं, हसणं, डब्यातल्या गोष्टी खण्यासाठी लंच टेबल वरचा तिचा आग्रह, सतत समोर फिरत राहतं. हे काय होतंय नेमकं ही न समजणारी परिस्थिती, किंवा जे होतंय ते चांगलच असं आत वाटतं.
दुसरे दिवशी ऑफिस सुटल्यावर तो सिनेमा ला जायचा आग्रह करते. सिनेमा पाहून येताना इराण्याच्या हॉटेलात रंगलेल्या गप्पा, मनमुराद आनंद, आता ऑफिसची प्रत्येक गोष्ट तिला सांगावीशी वाटते.
आता हे असंच चालतं राहावं असं दोघांनाही वाटतं. दिवसामागून दिवस मजेत जातात. इकडे घरांत लग्नाची घाई चालू होते, त्याला ते आवडत नाही आणि सत्य सांगता येत नाही. तिच्या घरी अडचण नाही ती सांगून टाकते अन मग ती ही याला घाई करते. हा हे टाळत असतो प्राप्त परिस्थितीत. आता ती हट्टाला पेटते, पून्हा मित्रांची खूप आठवण येते, जाऊन सांगावं त्यांना सगळं अन लग्नाविषयी सल्ला विचारावा. मित्र योग्य सल्ला देतात, ठरतं लग्न.
अगदी भातुकलीच्या खेळात मांडाव्यात गोष्टी तसंच काही एका मागून एक घडत राहतं, मात्र डाव अर्ध्यावर मोडणार नसतो इथे. ती आणि ततो आयुष्यभरासाठी सखे होतात, मित्र होतात.
जीवन एक खळाळता प्रवाह, पाणी येत जात राहतं, बदलतं ही.
शरद पुराणिक
जुनं हस्तलिखित साहित्य टंकलिखित केले आज
दि 10 नोव्हेंबर 2019
हैदराबाद
Comments