| ही दैवी परीक्षा आहे ||




 |  ही दैवी परीक्षा आहे || 


देव परीक्षा घेतच असतो अन आपण त्याच्या भक्ती, अनुभव आणि वेळोवेळी देणाऱ्या दृष्टांत याच्या अखंड अभ्यासातून, सेवेतून ती प्रामाणिक पणे द्यायची असते.  जगताना वरच्या वर्गात जाण्यासाठी तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. 


आजच्या विषयाला अनेक संदर्भ आहेत. मी मागील वर्षी गौरी पूजेनंतर ही लिहिलं होतं, तसच काही. संदर्भ तसे वेगळ्या धाटणीचे आहेत. 


गौरीनंदन आले ...गेले... ते सर्व छान संपन्न  झाले. पण त्यापूर्वी चे काही अनुभव आणि घटना घडल्या त्याचा उल्लेख. 


आता सणवार आले की मध्यम वर्ग आपली जी काही छटाक भर सोनेरी रुपेरी संपत्ती घ्यायला बँकेत जातात तिथे गेलो. एक तर कोरोनाचे कडक नियम, सौ आत गेल्या त्याना जाऊन तासभर झाला तरी आली नाही, मग मी गेलो तर कळले जे लॉकर आम्ही गेले 7 ते 8 वर्ष वापरतोय ते आम्हाला issue झालेले नाही, म्हणजे तशी संगणकीय नोंद तिथे नव्हती. आता बोंबला, एक तर आम्ही 30 वर्ष corporate जगतात काम करून असल्या गोष्टी पचनी पडत नाहीत (digest होत नाही). पण या सरकारने अधिकृत म्हणुन सांगितलेल्या बँक मध्ये हे आणि असे इतर अनेक किस्से क्षणोक्षणी  होतात त्या विषयी सविस्तर पुन्हा केंव्हा तरी. जे काम अर्ध्या तासात होणार तिथे संपूर्ण दिवस गेला, उपवास होता अन कोरोनात बाहेर कुठे पाणी ही पिण्याची भीती वाटतेय. तसं car मध्ये पाण्याची बाटली होती पण पुणे तिथे "पार्किंगची जागा दूर दूर न मिळे"  म्हणुन ते शक्य नव्हतं.  असं करून ते छटाकभर "मौल्यवान" सामान एकदाचं घेऊन आलो. अगदी कुठला तरी किल्ला जिंकून तिथला खजिना घेऊन या थाटात, कारण आज पहिल्यांदाच एवढे कष्ट झाले. यादीतील एक काम झालं. 


नंतर मार्केटयार्ड येथे जाऊन भाज्या, फुलं असा एक कार्यक्रम एक दिवस झाला.  उगाच कोरोनात तिथे कशाला गेले असे प्रश्न विचारून पुणेरी अपमान करू नये.  कारण तिथे ही पार्किंगला एवढे कष्ट की अगदी अजून एक लढाई जिंकावी लागणार असे वाटले. अन एरवी 30 रु किलो मिळणारे फुलं 240 ते 300 रु किलो असे भाव, भाज्या मात्र जरा बुद्धीला पटेल अश्या भावात होत्या. इथे मात्र ते खजिन्या पेक्षा जास्त ओझं होतं, पण मज्जा आली. छान अनुभव होता या दिवसात. 


असं करत करत कधी मी श्री ज्येष्ठा कनिष्ठा गौरी देवता, आगमानार्थे, आवाहानार्थे अक्षतां समर्पयामि असं म्हणत गौरी मंडपासमोर बसलो कळलंच नाही.  (फोटो जोडलाय सोबत) 3 ते 4 तास तयारी करून अनिता ने जणू नवरी सजवून मांडवात ठेवाव्या अश्या उभ्या केल्या. सर्वच घरांत हे असतंच, आणि सर्वच गृहिणी ते आवडीने करतात.  पण गेली साधारण 21 वर्ष झाली ती हे एकटी करतेय (अगदी तयारी ते विसर्जन) याचं विशेष कौतुक, आईची मदत कायम असायची पण हल्ली ते शक्य नाही. पण मग तिला जमेल ती मदत करते.


आणि तो दिवस आला जो या सणाचा गाभा, हृदय अन काय काय ..तो गौरी पुजन दिवस. सर्वच गोष्टी एका विशिष्ट लयीत आणि लक्ष्मी प्रेरणेने ओतप्रोत असतो. त्या विषयी खूप लिहिलं गेलंय, जातंय म्हणुन पुढे सरकतो. 

3 सुवासिनी, 2 ब्राम्हण, कुमारिका आणि आम्ही सर्व असा छान भोजनाचा कार्यक्रम झाला अर्थात सालंकृत पुजा विधी नंतर. 

त्या दिवशी आमचे एक बंधु विशेष अतिथी होते,  आम्हाला एक दुसर्यांना खुप लळा आहे, तो ही तितकाच जीव लावतो. आमच्या कुटुंबाविषयी भरभरून बोलतो आणि अगदी छोटे छोटे संदर्भ लक्षात ठेवले आहेत. तसं पाहायला गेलं तर आम्ही त्याच्यासाठी काहीच जास्त केलं नाही प्रेमाशिवाय, पण त्याला त्याची जाणीव आहे. तो स्वतः तसा एक self made मोठा माणूस आहेच, ज्यांनी स्वतः सोबत इतरांना खूप खूप सहकार्य केलं आहे, म्हणून त्याचा अभिमान आहेच.

या उलट काही आपलेच लोक ज्यांना आपण, किंवा अशी वडिलांनी खूप खूप सांभाळलं असतं, ते सर्व हे विसरुन आम्ही त्या गावचे नाहीच असं जेंव्हा वागतात तेंव्हा वाईट वाटते. असो... जेवताना असे अनेक विषय होते आणि आम्ही सर्व संध्याकाळी 7 पर्यंत अशाच गप्पात रंगून गेलो. बरेच दिवसांनी तो योग आला. सोबत मानसी मनोज आमचे दुसरे स्नेही, सखे, मित्र आणि बरंच काही. तश्या त्या सुग्रास आणि पदार्थानी खचाखच भरलेल्या जेवणा नंतर ही एकदा चहा, अन भैरवी coffee ने झाली. 


असं हे आनंदाचं गाठोडं अन शीन आलेलं शरीर घेऊन जरा अंथरून जवळ करावं असं वाटलं. इतक्यात अनिता च्या फोन वर एक SMS आला अन आमच्या पायाखालची जमीन सरकली, तो बँकेचा message होता आणि कोणीतरी तिचे सर्व खाते on-line transaction करून पुरते साफ केले. मी इथे रक्कम लिहीत नाही, विनाकारण कोणाचे डोळे विस्फारतील,  आणि ज्यांना हे कळल्यावर आनंद होइल त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही,  पण खुप मोठी रक्कम होती.  जगात काही लोक देवाला स्वतःच भलं व्हावं म्हणून पूजतात तर काही लोक इतरांचं वाईट होण्यासाठी. राम, रावण सर्वत्र आहेतच, अन कलीच्या या काळात तर विचारूच नका. 


ही वेळ रात्री 1 ची होती, फोन वगैरे आटोपून मी 2 वाजता अलंकार पोलीस चौकी गाठली. तेवढ्या रात्री ही अतिशय आस्थेने आमची तक्रार ऐकून त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. खरं तर त्या सर्वांचे नाव विचारले नाही, त्यांचे अनंत आभार.  मध्यरात्र उलुटून गेली आणि 3.15 ला आम्ही घरात आलो. आणि झोप कसली पडलो म्हणा हवं तर साधारण 4 वा. 


घरात गौरी होत्याच अन दुसरे दिवशी ही त्यांचं दहीभात, खीर, काणवला, पोळी, 2 भाज्या, चटणी, भजी असा  नैवेद्य करून आम्हाला बँक गाठायची होती. खरं तर अनिताची ती गेल्या काही वर्षाची पुंजी होती. अतिशय सचोटीने ते सर्व संचित आज गौरी म्हणजे साक्षात लक्ष्मी पूजेच्या मध्यरात्री गेले, तिची अवस्था काय असेल याच विचारात मी झोपु शकलोच नाही. ती पुन्हा सकाळी 6 ला उठली (फ़क्त 2 तास के तो शरीराला आराम) सर्व तयारी करून, स्वयंपाक, नैवेद्याची तयारी आणि आमच्या सर्वांचं करुन ती माझ्या आधी तयार झाली. खरं तर या अवस्थेत एखादी स्त्री सतत डोळे अखंडपणे वाहत ठेऊन रडत बसली असती, पण ही माउली शांततेत सर्व करत होती, अगदी सकाळचा चहा ही रोजच्या सारखा माझ्या हातात आणून दिला ते निघताना माझ ताट हातात देण्यापर्यंत.  काय तो संयम, धीर आणि हिंमत. नाही तर कोणी बेड वरून उठलं नसतं एवढं ते नुकसान. त्यात या कोरोनाच्या काळात जिथे आवक कमी आहे यात हा फटका तसा मोठा होता. मी स्वतः तर व्यक्तच होऊ शकत नव्हतो, पण मग तिला पाहुन धीर येत होता. 


असो आम्ही बँकेत गेलो, तिथला अधिकारी ही खूप चांगला वागला आणि सर्वतोपरी मदत केली. नंतर आम्ही cyber crime पोलीस ऑफिस ला गेलो, तिथले ही अधिकारी खुप व्यवस्थित मार्गदर्शन करून, आमचे मनोबल वाढवत होते तिथे ही आमच्या सारख्यांची अक्षरशः रांग होती. पुन्हा बँकेत जाऊन पोलीस विभागाची कागदपत्रे त्यांना दिली आणि घरी आलो. 


घरातल्या गौरी तशाच, किंबहुना अजून जास्त खुलून दिसत होत्या, सकाळी माळलेला गजरा, वेणी अजून खुलली होती. पुन्हा जेवणं केली अन सर्व आवराआवर करून अगदी त्याच अविर्भावात, काहीच झालं नाही असं तिने सर्व आवराआवर केली, काही सुवासिनी आजही आल्या. गौरींना ही  "पुनरागमनाय" असं म्हणावं लागतं, तस झालं अन पुजेत अनेक सकारात्मक दृष्टांत, शुभ संकेत लक्ष्मी ने दिले, ते इथे न सांगणच योग्य. 


गौरींना बोळवून आम्ही झोपण्याची तयारी करत असताना मात्र तिचा थोडा बांध फुटला, पण म्हणाली गौरी आपल्या घरात असताना आपण रडून कसं चालेल. काय ती निष्ठा आणि श्रद्धा, एवढं होऊन ही याचा दोष तिने आपल्या प्राक्तणाला दिला, पण गौरींना हे कळू ही दिलं नाही. मग आज मात्र तिचा बांध फुटला, ते होणे ही गरजेचे होत. तिने व्यक्त होऊन भावनांना वाट केल्याने आतील मळभ दूर झाले आणि पुनःश्च " मी बॅंक ला सोडणार नाही" अशी सकारात्मक ऊर्जा चेतवून ती पुन्हा उभी आहे, तशीच. तीच माझी लक्ष्मी, तीच माझी गौरी. या वर्षी पुन्हा एक वेगळ्या रुपात दिसली.


आता वाट ते पैसे परत मिळतील का याची ..


ही कथा काल्पनिक नसून 100% सत्य आहे, आत्मस्तुती किंवा इतर अनुषंगाने वाचून उगाच गैरसमज करू नये.


तर वाचक हो यातून एक शिकलो :


कितीही उशिरा आला तर sms वाचत चला

Savings ला जास्त पैसे ठेऊ नका

लगेच संबंधित बँकेला कळवा

सर्व जण सर्वतोपरी सहकार्य करतात


जय गौरी


शरद पुराणिक

280820

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती