तसा खादाड नाही, पण चवीने खातो
खरं तर घरातील सर्वच सदस्यांचा या लिखानाला कडाडून विरोध होता, अगदी मुलांचाही. त्यांना वाटतं पदार्थ तयार करायचे आणि खाऊन आनंद घ्यायचा. उगीच त्याचं प्रदर्शन नको. मला ही ते पटायचं पण आतून वाटायचं की हा आनंद वाटायला पाहिजे. असं ही या काळात लोक भेटणं, येणं जाणं जास्त नसल्याने तसं प्रत्यक्ष चव देणं शक्य नव्हतं. निदान पाहिल्या तीन ते चार महिन्यात. नंतर मात्र थोडी ये जा सुरू झाली. असो सर्वांचा विरोध पत्करून आणि माझे फेसबुक मित्र श्री प्रशांत कुलकर्णी यांची प्रेरणा. कारण या विषयावर त्यांच्या इतकं चवदार कोणी लिहू शकत नाही. आणि त्या काळात फेसबुक, व्हाट्सअप्प वर आणि इतर माध्यमावर ही या विषयी लिहून यायचं, फोटो ही यायचे ते मला सतत खुणावत होते लिहिण्यासाठी. पण खुप आवर घातला. पण वाटलं एकदा सगळ्यांचे होऊन जाऊ दे मग आपण बघु.
एक तर बाहेर अशी भयाण परिस्थिती, अगदी भाजीपाला, सामान आणण्यासाठी काही तास मोकळीक असायची, सर्व बंद बंद, कुठे नोकऱ्या गेल्या तर कुठे पगार मिळणे दुरापास्त. आशा या काळात ही खाऊगिरी दाखवणे म्हणजे जरा विचित्र वाटत होतं. असो आता घेतलं लिहायला.
पाकपुरी आणि रगडा पॅटिस ने सुरू झालेली ही खाद्य यात्रा अनेक वळणं घेऊन उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशी परिक्रमा करत करत अजून सुरूच आहे. खालील फोटोत पाकपुरी, रगडा या सोबत चैत्री अष्टमी कुलाचार विशेष नैवेद्य ठोंबरा अन जाड भरडाचे डाळीचे ढोकळे.
फ़क्त भारतीय पदार्थ नाही तर पाश्चात्य पदार्थ ही होते. अगदी नकट्या देशातील ज्यांनी हा आजार सर्वत्र पसरवला त्यांच्या चवीचे ही झाले. यात मोमोज, शेजवान राइस अन फ्राईड राईस असे विविध चवीचे पदार्थ चाखले. मुलांचं विशेष कौतुक कारण हा सहप्रवास त्यांच्या सहकार्याशीवाय शक्यच नव्हता. एरवी आजचा मेनू काय एवढं विचारून, घाईघाईने खाऊन पळायची सोयच नव्हती या काळात.
आता पहा, मोमोज, सँडविच च्या गर्दीत भाजी भाकरी अन कारले ही डोकावले. काय मज्जा असते राव हे पदार्थ तयार करण्याची अन ते ही एकत्र मिळून अन खायची. त्यात आमच्या सौ अनिता च्या हातचे कारले ही खमंग treat असते. तस तर तिच्या प्रत्येक पदार्थाला अप्रतिम चव आहेच. ज्या प्रसन्नतेने ती हे सर्व पदार्थ करते तेंव्हा तिच्यातली अन्नपूर्णा झाकाळते. साधी कोशिंबीर ही इतकी चवदार होते की काय सांगु. बरं हे सर्व पदार्थ करताना मातोश्री ना तिखट, कांदा विरहित तेच पदार्थ करायचे, ते ही ती तितक्याच उत्साहाने करते.
अनारसे (हे अधिक मासाचे नव्हेत, हे फ़क्त खाण्यासाठी केले) अधिक मासाचे पुन्हा वेगळे झाले. ते ही अगदी 33 च्या सेट मध्ये, धोंडे जे की अधिकमास चा खास पदार्थ आहे तो ही अनेक फॉर्म्स मध्ये झाला, तळून, उकडून आणि दान धर्म झाला म्हणून त्याचे फोटो नाहीत. फक्त एकच अनारसे चा फोटो आहे.
नागपुरी गोळाभात, त्या आधी कढी गोळे असा एक आगळा वेगळा बेत ही झाला.
कॉर्न समोसे ची गंमत म्हणजे मार्केट यार्डातुन भरपूर भाजी आणली त्यात अर्ध पोतं कणीस आणले अन त्यात अनेक विविध प्रकार झाले. कॉर्न राइस, पॅटिस, उकडलेले कॉर्न अन गॅस वर भाजून बटर, मिठ मसाला लाऊन खाल्ले. पॅटीसला सोबत दलिया खीर होती. दरम्यान अधिक मासासाठी घरात ये जा सुरु झालीच होती.
पाणीपुरी, दहिवडे हे असे काही पदार्थ आहेत की किती ही वेळा तयार झाले, अन कितीही खाल्ले तर अजून अजून अस करत जिथे आपण 4 च खाऊ असा विचार करतो, तिथे 7 ते 8 खाल्ले जातात. तेच इडली ला पण 8 वर थांबू म्हणता म्हणता कधी 12 होतात कळतच नाही. काही पदार्थ पुन्हा पुन्हा झाले, ते म्हणजे दालबाटी, आलु टिक्की, इडली, अप्पे, भजी (हे तर अनेक वेळेस अनेक फॉर्म मध्ये). नागपंचमी ला तवा नाही, काट छाट नाही त्या मुळे पुरणाचे कडबु, डाळ बाटी असा भारी बेत.
हे ही नसे थोडके म्हणुन येता जाता तोंडात टाकायला विविध चिवडे डबे भरून होतेच. पुरवणी म्हणुन भेळ, फरसाण, चिक्की अन, खारे दाणे, आंबा भडंग. बिस्किटे तर विचारू नका. दिवसाआड पिशवी घेऊन हे सर्व भरायचे अन तसेच खाली करायचे.
चकल्या तर विचारू नका, म्हणजे तळताना किती इतक्या खाल्ल्या की ज्या खरं तर दोन डबे व्हायच्या, त्या एकाच डब्यात मावल्या. सोबत करंजी, रवा अन खोबऱ्याचे लाडु, पौष्टिक लाडु, बेसन लाडू, अन काय काय विचारूच नका.
बरं फक्त तिखट अन मसालेदार पदार्थ चालत नव्हते, त्या सोबत काही गोड आवश्यक. बरं नुसता शिरा, खीर किती खाणार ? तर या पदार्थाला सुट्टी म्हणून मग चॉकलेट पुडिंग, ice cream, विविध फळांचे शेक, जुस. अन आमच्या मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे जेली केक. फारच भन्नाट आहे हा पदार्थ.
कितीही विरोध, किंवा आरोग्यास अपायकारक आहे अशी जाहिरात सतत होत असली तरी ब्रेड हा पदार्थ पुर्णतः टाळू शकलो नाहीत. मग त्याचे विविध पदार्थ, ब्रेड पिझ्झा, पाव भाजी, मिसळ पाव असे बहू आयामी ब्रेड साहेब ही अधून मधून ताटात चमकायचे. आता त्या सर्वांचे फोटो नाही ठेवले, किंवा काढले ही नाहीत. पण काही विशेष फोटो आहेत. मुलांचा यात विशेष सहभाग होता. वरती उल्लेख केल्या प्रमाणे अति उत्साहानी त्यांनी हे सर्व केले त्याचं जास्त कौतुक.
बरं या मोसमात उन्हाळा, पावसाळा, असे दोनीही ऋतू होते. हापूस तर एवढा खाल्ला की विचारूच नका. सोबतच इतर फ्रीज मध्ये ठेवलेले आईस्क्रीम, पुडिंग, जेली अन कधी cadbury silk तर वेळोवेळी मिळालेले विविध चॉकलेट. अशी सरमिसळ होती. मुबलक भाजी अन फळे ही मिळाली अन ही एक जास्त जमेची बाजू. खरं तर सर्वच मिळत होत. नव्हतं त्या भेटी, गर्दी अन सोहळे. अगदी विविध रंगी फुलं ही भरपूर मिळाली पण ती मुख्य बंदी उठल्यावर.
या सर्व पदार्थांची यादी 70 हुन जास्त होती, सर्वच फोटो उपलब्ध नाहीत. हे म्हणजे आपल्या सर्व सण वार , कुलधर्म, कुलाचार यात होणाऱ्या पदार्थां व्यतिरिक्त. ज्यात आषाढ श्रावण उत्सव, गौरी, गणपती, विविध कुलाचार अन परवाच संपलेले नवरात्र यातील पंच पक्वान्न सोडून केलेले पदार्थ. पुरणपोळी (किमान 5 ते 6 वेळेस), साखरभात, पायस, खिरी, मोदक, गौरींचा फुलोरा ज्यात पुरी , अनारसे, करंजी, चकली, लाडु दोन प्रकारचे, विविध भाज्या, चटण्या, भजी, कुरडई पापड अन कोशिंबिरी. याची वेगळी मोठी यादी आहे. नवरात्र उपवासाच्या पदार्थाचा एक ही फोटो नाही, पण 8 दिवस एक ही गोष्ट repeat नाही.
कधी तरी लहर म्हणुन मुलांनी केलेली मॅगी, ब्रेड बटर, टोस्ट, शेक हे ही या व्यतिरिक आहे.
अबब अबब काय ती खाऊगिरी ...तुम्ही म्हणाल एवढं कठीण संकट असताना तुम्ही मज्जा मारली, पण मग मन गुंतवून ठेवायला आणि एकत्र घट्ट होण्यासाठी हा एक छान मार्ग होता. असं ही पोळी, भाजी, भात याला ही तितकेच कष्ट अन खर्च होतो, कदाचित थोडा कमी लागत असेल. पण जो आनंद यांनी दिला त्याची तोड नाही.
या सर्व प्रक्रियेत आमच्या अन्नपूर्णा देवी हिचा मोलाचा वाटा, तिच्या उत्साह आणि संयमाला तोड नाही. मुलं, मित्र, मैत्रिणी आणि सर्व, अगदी वाणी, भाजीवाले, दूधवाला, शेतकरी ज्यांनी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या.. त्या सर्वांना मनःपूर्वक आभार.
एवढं खाऊन वजन सीमित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी होती, न चुकता रोज चालून खाऊगिरी पचवली एकदाची.
तसा खादाड नाही, पण चवीने खातो
शरद पुराणिक
291020
Comments