काम धंदा ...पोट पाणी ...कष्ट आणि जिभेचे चोचले

काम धंदा ...पोट पाणी ...कष्ट  आणि जिभेचे चोचले

(औरंगाबाद) 


आजचा विषय आहे माझ्या नोकरीच्या काळात अनुभवलेल्या विवीध चवी ज्या खरं तर चोचले या प्रकारात मोडतात.  खरं तर प्रत्येक नोकरीत खुप काबाड कष्ट केले, अगदी सुरुवातीची नोकरी ते आज पर्यंत कधीच फ़क्त आठ तास काम नाही केलं किमान 10 ते 12 तास, किंवा त्या पेक्षाही जास्त वेळ काम. आमच्या नशिबात कधीच 9 ते 6 अन सुट्टीचा दिवस निर्धास्त अशी नोकरी अजून कधी मिळालीच नाही. असो, हे सर्व जरी असलं तरी आम्ही इतके नशीबवान नक्कीच आहोत ...की एकदम चांगले, सुस्वभावी, प्रेमळ आणि जीवापाड प्रेम करणारे बॉस लोक आणि सहकारी लाभले आणि हा प्रवास इतका सुखकर झाला की विचारूच नका. तशाच चांगल्या आणि मोठ्या कंपन्यात ही काम करायला मिळाले. त्याच प्रवासाचा एक वेगळा टप्पा आज इथे विस्तृतपणे मांडतोय.


1989 गरवारे ला लागलो,  औरंगाबाद ला आलो. शिक्षण अजून सुरू होतं, पण नोकरी मिळाली अन तडक निघालो. नोकरी करत करत शिक्षण पूर्ण केलं अन दोन पदव्युत्तर  पदव्या ही मिळवल्या (double PG).  पहिलीच नोकरी काहीच अनुभव नाही, पहिले काही दिवस अक्षरशः घामाघाम अन हळूहळू स्थिरावलो. नोकरी वाळूज ला, बसने प्रवास , सकाळी मेस चे डबे उचलायचे अन निघायचं.  अडमीन मध्ये असल्याने थोड्या सुविधा होत्या, पहिला चहा, नाष्टा याची चव घ्यायची अन नंतर प्लांट मध्ये जाणार.  दुधाचा चहा, पारले जी पुडा अगदी पोचता क्षणी टेबलवर हजर.  रात्रीच्या जेवणासाठी मेवाड ला रतीब होतं, यथेच्च थाळी हादडून सही करून पुन्हा खोलीवर. रविवारी सुटी आणि आमची mercedez (सायकल)  काढून कान कापल्या कुत्र्यासारखं फिरायचं , सर्व गाडे, टपऱ्या पालथ्या घालायच्या. 


1990 साली लुपिन ला जॉईन झालो ...आता औरंगाबाद ला चांगलेच स्थिरावलो होतो... नागेश्वर वाडी ते चिकलठाणा असा प्रवास सायकल वर करत पोचायचं. कॅन्टीन चे कुपन असायचे, भरपेट नाश्ता, आठवड्याचा वेगळा मेनु, तेच जेवणाचं ही.  आता चोचले जरा वाढलेच होते, कधीतरी पास काढून मुकुंदवाडी ला खायला जायचं. संध्याकाळी  आसपासचे हॉटेल्स. अशातच आम्ही काही वैद्यकीय चाचण्यासाठी volunteer म्हणुन राहायचो. दिवसाला 300 रुपये अन विशेष नाश्ता, जेवण, दुध, रात्री सिनेमा आणि त्या काळात (1990 ते 1993) वातानुकुलीत व्यवस्था म्हणजे काय !! मज्जा मज्जा.  दरवर्षी सहलीत पुन्हा तेच, चोख व्यवस्था, प्रवास, खाणे पीने, मनोरंजन कार्यक्रम, त्याचं आयोजन अर्थात आमच्याकडे असणार.  दरवर्षी होणारा Lupin Day (16 Jan) एक अनोखी संधी.  त्या विषयी पूर्वी लिहिले आहेच. दरम्यान मित्र परिवार अजून अजून फुलत होता, विवीध समूह, संगीत, साहीत्य तर काही जिवाभावाचे मित्र जे आजही आहेतच.  दरम्यान दुचाकी आली, कधी वेरूळ, खुलताबाद अशा सफरी, धाबे खानावळी सर्व चव घेऊन झाले. गायत्री चाट ची तर अनंत पारायण झाली. काही काही शिल्लक नाही.  याच बरोबर मित्रांच्या घरी स्वतः करून किशोर च्या मौफिलीत अनेक रात्री गेल्या. ऑडिट दरम्यान रात्र रात्र कंपनीत जागून काढायचे पण सकाळी पुन्हा 8.30 च्या काट्याला हजर राहायचे.  पण कधी शीण जाणवला नाही.  


1993 ला Wipro ला जॉईन झालो अन खऱ्या अर्थाने professional  प्रवासाला सुरुवात झाली. संपूर्ण इंग्रजाळलेली मंडळी, IIT, IIM अश्या दिगग्ज संस्थांतून आलेले सहकारी. भले मोठे corporate सोहळे, working lunch अशा नवनवीन गोष्टी अनुभवल्या. शहरातल्या सर्व पंचतारांकित हॉटेल मध्ये अनंत सोहळे, अगदी दिल्ली, पुणे, मुंबई सर्व ठिकाणी  समारंभ आणि  त्याचं नियोजन, व्यवस्था अगदीं अत पासुन इति पर्यंत.  कामाचा व्याप इतका की दुपारचं जेवण ही राहुन जायचं.  मग आजूबाजूचे हॉटेल गाठायचे. त्याच काळात मग सहकाऱ्यांच्या घरी, एकत्र काम, नियोजन आणि मग श्रमपरिहार.  कधी कधी तर वेळ नसेल तर maggie ही चवीने खायची. याच दरम्यान दिल्ली, आग्रा सफर झाली. अगदी cannaught place जिथे सर्व केंद्रीय मंत्री असे लोक राहतात अशा विभागात राहणे, दिमतीला चार चार गाड्या, Narula चे pizzas अन विविध चवी अनुभवल्या. इथला अनुभव आयुष्याला फार वेगळे वळण देऊन गेला. इथले साहेब ही अगदी घरचे. एकदा मला थोडं बरं नव्हतं तर स्वतः माझ्यासोबत येऊन सर्व चाचण्या करून घेतल्या.  इतर सहकाऱ्यांविषयी तर किती लिहु अन किती नाही. 


1999 Wockhardt ला आलो आता एक वैवाहिक आयुष्य सुरू होतं, 1997 लाच दोनाचे चार झाले होते.  इथें ही प्रचंड काम , पण मज्जा ही तितकीच होती. दोन चार समूह होते, घट्ट एकमेकांत गुंतलेले अन जीवाला जीव देणारे. कॅन्टीनमध्ये special जेवण, आम्हाला पाहिलं की नायर मिरच्या तडका देऊन देणार, पण आता आम्ही घरचे डबे घेऊन येत होतो, ती डब्यांची मौफल अशी काही रंगायची की संपू नये असं वाटायचं.  सुटीच्या दिवशी एका शेतात जाऊन दालबाटी, ती ही अगदी जमिनीत खड्डा करून त्यात त्या बट्ट्या भाजुन घ्यायच्या, सोबत गायन, नृत्य, नाट्य अशा विविध गोष्टी, कधी भाकरी भरीत अशा मेजवान्या. अगदीच डबा नसेल तर metro hotel ला जेवायचे.  कधी API च्या कोपऱ्यावर एक ढाबा होता तर कधी कधी woodland ला जायचे.  इथले साहेब तर अगदी देवाचा अवतार. ते अगदी माझ्या घरी मुद्दाम पोहे खायला तर गौरीच्या दर्शनासाठी येत असत. आमरस असेल तर त्यांच्या घरी आमरस पुरी असा बेत सोबत विविध गुजराती पदार्थ. कधी गुजराती मित्राच्या गच्चीवर कठियावडी भोजन, कधी मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश चे चमचमीत जेवण तर कधी नागपुरी ढंगाचे. नवीन वर्ष, christmas असे अनेक समारंभ.  मी कधी संता झालो, कधी गुजराती, राजस्थानी तर कधी मराठमोळ्या अवतारात. इथेही दरवर्षी सहल, त्याचं आयोजन अगदी गाडीत बसताना सँडविच, पाणी बॉटल ते रात्री परत घरी पोचवण्या पर्यंत व्यवस्था. दोन सहलीला तर औरंगाबाद ची प्रसिद्ध "मुस्तफा" ची दम बिर्याणी ( आम्ही शाकाहारी असल्याने चव घेण्याचा प्रश्न नव्हता), विविध खेळ, मनोरंजन असा बहारदार कार्यक्रम.  खेळणा प्रकल्प, भंडारदरा, गौताळा,  H2O  वॉटर पार्क, त्यात एक दोन वेळा बाहेरून कलाकार बोलवून  संगीत मेहफिल ही भरवल्या विशेष लक्षात  राहिले ते  Benchmark येथील प्रतिवार्षिक कुटूंब मिलन  सोहळा. आमच्यात ही गायक वादक होते त्यांचे गाणे ...वा बहारदार. अनेक मैफिली घरात ही सजल्या. हे एक मोठं कुटुंबच होतं म्हणा.  सुखदुःख वाटून घेणारे सहकारी, अगदी अनमोल ठेवा.  या प्रवासात खूप जिवाभावाचे सखे मिळाले जे आज ही जगण्याच्या वाटेवर सोबत आहेतच.


पुढील " पुणे " सफर पुढील भागात ...क्रमशः 


शरद पुराणिक

120621 

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती