माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ
माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ
परवा संजूचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी माझी सांस्कृतिक कारकीर्द कशी सुरू झाली या भूतकाळात जाताना माझ्याच या प्रवासाच्या अंधुक छटा पाहू लागलो.
तशी या सांस्कृतिक जीवनाला शाळेत सुरुवात झाली. जिथे प्रार्थना मी आधी म्हणायचो आणो त्या मागून शाळेतील इतर विध्यार्थी, खड्या आवाजात भारत माझा देश आहे असं म्हणायचा तो कालखंड 1 ली ते 7 वी पर्यंत नित्याचा होता. त्या सोबतच प्रत्येक महापुरुषाच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त भाषण देणं हा ही ठरलेला कार्यक्रम होता. फार बौध्दिक पातळी नसताना मास्तरांनी लिहून दिलेलं भाषण पाठांतर करून, दोन्ही हातांची घडी करून सांगण्याची ती मजा औरच होती. टिळक, आगरकर, आंबेडकर, गांधी, चाचाभाई नौरोजी, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज अशी अनेक मंडळी त्या त्या दिवशी अंगी संचारायची.
गल्लीतल्या गणेशोत्सवात मेळा हा हमखास मनोरंजनाचा कार्यकम असायचा. त्याचं आता विविध गुणदर्शन अस नामकरण झालंय. गल्लीतल्याच एका वाड्यात या मेळ्याच्या तालमी व्हायच्या, समूह नृत्य, नाटिका, संगीत असा तो आज ही मनांत घर करून बसलेला मेळा, हे या सांस्कृतिक प्रवासाचं पुढचं पाऊल. गल्लीतल्या प्रत्येक वयोगट यात सहभागी असायचा. लोखंडी ड्रम वर पत्रे, त्यावर जरा वाळू अन त्यावर सतरंजी घातली की स्टेज तयार. बाजूला 2 बांबू आणि त्यावर 2 लाईट लावले ती सजावट. समोर जर्मन च्या डब्याला मागे कापून त्यात एक बल्ब लावायचा आणि समोरच्या बाजूला रंगीत कागद लावलेले पुष्ठे अगदी मध्यावर ठेवून त्याचा फोकस म्हणून वापर व्हायचा. समोर जमिनीवर बसलेला प्रेक्षक वर्ग म्हणजे गल्लीतली परिवार मंडळी आणि मुलींना पाहण्यासाठी आलेली बाजूच्या गल्लीतली 2 ते 4 टुकार टाळकी, शिट्ट्या वाजवण्यासाठी आणि गर्दीतून अलगद आपलं सावज गर्दीत नेमकं कुठे आहे हे शोधणारी नजर.
पुढे महाविद्यालयीन जीवनात अनेक वेळा वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत भाग घेतला आणि बक्षीस मिळवले. आजही अंबाजोगाईला कॉलेजमध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी जिंकलेल्या एका ढाली च्या बाजूला मी, माझे मित्र जोगेंद्रसिंग बिसेन (ते आज कुलगुरू आहेत) यांनी जिंकलेली ढाल थाटात मिरवते आहे. पुढे युवक महोत्सव स्पर्धा आल्या, मी आणि जयराज ने स्वतः किंकाळी नावाची एकांकिका लिहिली आणि सादर ही केली, बक्षीस मिळालं नाही, पण प्रचंड शाबासकी आणि प्रतिक्रिया मिळाल्या.
तिकडे संजय सुगावकर, संजय पाटील देवळाणकर, ही लोकं बक्षिसावर बक्षिसे जिंकून त्यांच्या प्रवासाचा मार्ग यशस्वीपणे मार्गस्थ करत होते. सोबतच माझे मित्र प्रशांत कुलकर्णी, भगतसिंग, दासू वैद्य, ही मंडळी ही त्याच मार्गावर होतीच. या दरम्यान अंबाजोगाई ची नाट्य चळवळ भर तारुण्यात पुन्हा आली होती, वैद्य सर, प्रयाग सर यांनी अनेक तीन अंकी नाटकं उभारली. त्या नाटकांचे नेपथ्य तयार करण्याची जबाबदारी होती. रात्र रात्र त्या तालमी, गप्पा गोष्टी. एक दोन नाटकात मलाही काम मिळालं. कलाकार आणि बॅकस्टेज असा तो दुवा असायचा. नितीन जोशी सारखा तंत्रज्ञ होतात. आणि याच काळात मी नोकरीसाठी औरंगाबाद ला आलो, आणि ही सर्व मंडळी नाट्यशास्त्र विभागात विद्यापीठ येथे आली. त्याच काळात मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई ही जोडी त्यांचा नाट्य प्रवास यशस्वी करत होती.आजही खादि कुर्त्या पायजमा आणि गळ्यात शबनम असणारा मकरंद आठवतो. त्याचा त्या काळच्या हजरजवाबी अंदाज फार प्रसिद्ध होता.
मला आठवतंय विद्यापीठ ते संत एकनाथ रंग मंदिर हा प्रवास इह वेळा आम्ही पायी केलाय. जरी मी वेगळ्या खोलीत राहत होतो, तरी दर शनिवार रविवारी विद्यापीठ हॉस्टेल वर जायचो, सर्व जण एकत्र बसून डबे खायचे आणि नंतर पत्ते खेळणे असा बेत असायचा. प्रत्येकाच जीवन वेगवेगळ्या मार्गानी धावत होत, आणी नोकरी व्यवसाय निमित्त सर्व दुरावले. दासू लिखाणात रमला, आणि आज तो एक प्रस्थापित आहे. संजय अंबाजोगाई ला नाट्य शास्त्र विभागात लागला, प्रशांत नोकरी आणि उच्च शिक्षण असं दोनीही करू लागला, भगतसिंग वकील झाले. या काळात प्रत्येकाची आयुष्य बदलत गेली. त्यात ही मी डॉक्टर आप भी या नाटकाचं संगीत आणि नेपथ्य केले. आशुतोष भालेराव दिग्दर्शक, एक वेळा चंद्रकांत कुलकर्णी पण फिनिशिंग टच साठी आला होता, विजय दिवाण सर, सुजाता कांगो, समीर पाटील, सुनील अष्टपुत्रे, माधुरी दातार अशी कलाकार मंडळी होती. 4 ते 6 महिने एक वेगळा प्रवास केला. त्याचे अनेक प्रयोग ही झाले. नंतर ही सर्व मंडळी जी जिगिशा ची होती ती मुंबईत स्थिरावली आणि ते आज आपापल्या ठिकाणी यशस्वी आणि ठाम आहेत.
हे सर्व घडत असताना आमची नाटक या विषयी ची आसक्ती किंचितही कमी नव्हती होणार नाही. पुढे अंबाजोगाईची दुसरी बॅच औरंगाबाद ला आली, त्यात बाळू मुकादम हा नाट्य वारसा लाभलेला एक कलावंत होताच, तिकडे अंबाजोगाईला राज्य नाट्य ची तयारी असायची, येन केन प्रकारे आम्ही तिथेही हजर असायचोच. प्रशांत कुलकर्णी ने ही नंतर स्थानिक नाट्य चळवळ चालू ठेवली, लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनय असा त्याचा प्रवास चालूच आहे. भगतसिंग हे या सर्व गोष्टींचा एक अविभाज्य घटक आहेत. त्याला आवाजाची उत्तम ठेव भगवंताने बहाल केली आहे. प्रचंड वाचन आणि अनुभव पाठीशी असल्यामुळे एक दिग्गज समीक्षक तो होऊच शकतो.
खरं तर लिखाणाला मर्यादा आहेत, पण या प्रवासात अनेक गमती, किस्से, राग, लोभ, प्रेम, थोडाफार मत्सर अशी सगळी झालर होती, पण मायेचा ओलावा आजही तसाच आहे. फार सुंदर जगलो आम्हि तो काळ.
प्रचंड कष्ट, अपार मेहेनत घेत आमचे मित्र संजय सुगावकर कुलकर्णी आज या क्षेत्रात स्थिरावले आहेत, हे पाहून आपलीच कारकीर्द यशस्वी झाली अस वाटतं. संजूचा हा प्रवास जवळून पाहण्याचं भाग्य लाभले.
शरद पुराणिक, हैद्राबाद
नोव्हेंबर 9, 2019
Comments