बस झाल आता हे बायकोचे गुणगान :( आता फ़क्त राडा, अरर रा, अरर रा, प्रेमाचे तीन तेरा...चिरफाड च जणु..
बस झाल आता हे बायकोचे गुणगान :( आता फ़क्त राडा, अरर रा, अरर रा, प्रेमाचे तीन तेरा...चिरफाड च जणु..
नाही आता अजिबात नाही ....ह्या रागाला औषध नाही, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अन अलोपॅथी कुठलंच नाही. आता फक्त आणि फ़क्त धुरळा, राडा, भांडण अन तक्रारी. किती दिवस गप्प बसणार राव. मी आपलं काहीच बोलत नाही, सतत आपलं कौतुक कौतुक आणि कौतुक. सारखं गोड खाऊन खाऊन जिभेवर आता मिरचीचा झणझणीत ठेचा पाहिजे म्हणजे पाहिजे. उतारा म्हणा हवं तर नाही काही बाही म्हणा. पण मी आता हे आतल्या आत जास्त मुरू देणार नाही, लोणच्याच्या खाराला पाणी सुटायच्या आत ते झाकण उघडणार म्हणजे उघडणार. आमच्या चांगुलपणाचा हा असा कोणी गैरफायदा घेणार असेल तर ...चुकीला माफी नाही (इथे मकरंद देशपांडे यांच्या आवाजात ऐका...नाहीच आठवलं तर निलेश साबळे च्या मेकओव्हर च्या मॅक सरांचा आवाज ऐका)....आता क्षमा नाही ...शिक्षा आणि फ़क्त शिक्षा ....
तसा विषय जुनाच आहे पण ती आग आज जास्तच पेटलीये म्हणुन हा त्रागा.
आता मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे ...आम्ही फिरून आलो, मज्जा मज्जा केली आता त्या वर मी आपलं व्यक्त झालो, बरं नेहेमीप्रमाणे आधी तिलाच पाठवलं ...अन सोडलं ...काही फोटो ही टाकले. खूप प्रतिक्रिया ही आल्या. आता गुण्या गोविंदाने हिने प्रतिक्रिया द्यावी तर उखडली ना राव, अन जे तक्रारीची यादी सुरू केली की विचारूच नका.. तुम्ही माझे फोटोच का टाकले ..आता तुमच्या सोबत फोटोच काढणार नाही. उगाचच आपलं काढायचे फोटो की टाकायचे. कितीदा सांगुन झालं की आपण कुठे गेलो ते लगेच सर्वांना कळायलाच पाहिजे का ? काही आपलं म्हणून आहे का नाही. काढ फोटो की टाक ...उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग. बरं काही तास काय जाऊन आलो त्याचा एवढा डंका कशाला. आपण जो आनंद घेतो तो काय दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो की काय ?
आता मला सांगा राव काय चुकलं माझं ...इथे लोक कुठे न जाता जुने पुराणे शोधुन शोधून फोटो टाकतात ...नाहीच जमलं तर स्वतः च्या गॅलरीत, सोसायटीच्या बागेत, अगदी मॉर्निंग वॉक चे ही "पावटे, दिवटे, वाकडे, कान्हे" असे मुद्दाम काढून टाकतात ...मग आम्ही हे का नाही टाकायचे. पण छे ..हिला चालतच नाही राव, खाण्याचे, तिचे आणि बाहेर चे फोटो असे टाकले की जाम वैतागते राव... आता तुम्ही म्हणाल उगाच खोट बोलतोय पण शप्पथ..आजवर लिहिलेल्या अनेक लेखात जिथे जिथे म्हणुन असे दाक्षायनी फोटो मी टाकले तेंव्हा तेंव्हा हे वाद झालेत. किती किती म्हणून मी सहन केलंय माझं मलाच माहितीये... तुम्हाला काय लागतंय हसायला. जावे त्यांच्या गावा तेंव्हा कळे.
अजून एक मोठी तक्रार आहे ...बायकोनी कधी तरी बायको सारखे वागावे का नाही राव. तरंच तर या नवरा बायकोच्या नात्यातला मसाला खमंग, खुसखुशीत किंवा चरचरीत होतो. जरा ठसका, डोळे चुरचुरने, असलं काही नाही. याला काय अर्थ आहे का. आता तुम्ही सांगा बायको म्हणुन कधी तोडा हट्ट करावा, रुसावं, फुगून बसावं ...पण हे आमच्या नशिबात नाहीच न राव. कधी कुठला हट्ट नाही, रागावणं तर कधीच नाही ...फुग्गा तर अजिबातच नाही. गेल्या 24 वर्षात कसला कसला हट्ट, मागणी किंवा कोणाची बरोबरी नाही. तिच्या साड्या आणण्यासाठी मीच जास्त वेळा गेलोय तिच्या पेक्षा.. ज्या आणल्या त्यातली एक ही कधी बदलली नाही अगदी एक रंगी, पद्धत असली तरी. जे आणले त्यात समाधानी ...हे जरा जास्त होतंय राव, म्हणून आज मी उद्विग्न आहे. चुकुन कधी मैत्रीणीसोबत जाऊन काही घेतलं तर लगेच फोटो दाखवून विचारते, किंवा ऑफीसमधुन आल्या आल्या दाखवते ..अन तुम्हाला आवडलं नसलं तर परत करते... ही म्हणजे हद्द... कुठला नवरा हे सहन करेल ते सांगा.
नात्या गोत्याचं ही तेच, सगळीकडे तितकीच आवडते, सासरी अन माहेरी ही हसून खेळून राहते ..अगदी आशा ही लोकांकडे की जे फ़क्त आपला अपमान, उपहास, उपमर्द करतात ...पण म्हणते आपण चुकायचं नाही ...हे तर आपल्याला अजिबातच पटत नाही आणि या साठी मी तिला आता बदलायला भाग पाडणार आहे .. खुप दुःख आहे हो माझ्या जिवनात, कसं आणि किती सांगु.
आता तुम्ही मला सांगा कुठली बायको नवऱ्याला त्याच्याच घरच्यांना फोन नाही केला म्हणुन भांडते ...ही चक्क असं करते ..अनेकदा फोन करून आठवण देते देवाने एकच आई दिलीय तिला निदान चार आठ, दिवसांनी किंवा दोन आठवड्यानी फोन करावा.. खुप झालं तुमचं काम, काम आणि काम. 2 मिनिटं बोललं तरी खूप आहे .. कधी भावाला, बहिणीला फोन करावा.. निदान तुमच्या लोकांना तरी बोलत जा रे बाबा...कसा हा माणूस एवढा दगड आहे असं बोलते राव ?? हे जरा जास्तच होतंय की नाही.
खाण्यपिण्याचं तर विचारू नका.. सुटीच्या दिवशी आपण डोक्यात विचार करतो आज इकडे जाऊ, तिकडे जाऊ हे खाऊ ...कसलं काय आपण झोपेतून उठोस्तोवर हिचा चारी ठाव स्वयंपाक तयार. पदार्थांच नाव जरी चुकून निघालं तर तो लगेच तयार ...अशी बोलायची ही चोरी ...खरं तर असं बायकोचे गाऱ्हाणे करू नये ...पण आज करतोय... नाईलाजाने.
स्वतःच असं काहीच नाही, सर्वस्व कुटुंबासाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी अशी सर्वांचीच ...तिच्या या स्वाभावचा खूप राग आलाय मला . कधी तरी स्वतःसाठी, आपल्या आपल्या इच्छा साठी जग ना राव...आहे त्यात कायम समाधानी ..याचा जास्त वैताग ..म्हणुन आज हे भांडण ...
मित्र मैत्रिणी बाबत ही तेच ...आपण जरा सांगितलं की उद्या अमुक अमुक ठिकाणी आम्ही जाणार आहोत ..जाऊ का विचारण्या आत हो म्हणते राव ..उलट सांगते बऱ्याच दिवसात तुम्ही भेटला नाहीत ..जाउन या तेवढंच बरं वातेल..म्हणजे आम्हाला बायको नाही म्हणतेय हे कारणच सांगता येत नाही.....स्वतः मात्र जात नाही, अगदी तिला जबरदस्ती ने तयार करून पाठवाव लागतं.. कुठलाही दामडॉल नाही ...नट्टा पट्टा नाही ..उगाचंच अविर्भाव नाही ...हे काय राव. ही यादी संपणारी नाही उगाच तुम्ही पुन्हा चिडणार ...तेंव्हा आवरतं घेतो
अन ठरलं म्हणजे ठरलं आता माधुरी दीक्षित चे फोटो टाकणार पण तिचे टाकणार नाही...काय व्हायचं ते हाऊ दे ...
बस्स बस्स झाला आता हा खेळ ...
शरद पुराणिक
हैदराबाद
190321
Comments