आज मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे
आज मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे
वाढदिवस तसे दरवर्षीच येतात, साजरे होतात आणि निघुन जातात पुढच्या वर्षी फिरून येण्यासाठी. पण हा वाढदिवस इतकी अफाट संपत्ती सुबत्ता आनंद समाधान आश्चर्य प्रेमाचा महापूर भावनांचा खळाळता सागर माया आपुलकी देऊन गेला की जगातल्या सर्व बँकेच्या तिजोरीत मावणार नाही , इतकं प्रचंड देऊन गेला. तसही रविवार असल्यामुळे मी हैदराबाद हुन इथे पुण्यात असणार होतोच. तसा मी आधीच आलो काही कामासाठी, थोडंफार काम उरकून घरच्यांना जरा बाहेर जेवायला जाऊन हा साजरा करण्याचा माझा मानस होता. सकाळी औक्षण वगैरे करून मी पूजा पाठ करे पर्यंत अनिता ने पंच पक्वान्न तयार केले त्याचा देवाला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसलो, तशी घरात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली, पण हिने मला अगोदर काही कहाण्या सांगून माझ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला. जेवणानंतर सर्व मंडळी त्यांच्या विविध कामांसाठी बाहेर पडली. संध्याकाळी मी बाहेर जेवायला जाण्यासाठी घाई करत होतो तसे ही लोकं जरा निवांत होते. आम्ही तयार झालो, इच्छे विरुद्ध मला सूट घालावा लागला. निशांत ने आज कधी नव्हे ते गाडी मी चालवतो अस सांगून गाडी काढली, डेक्कन ला जायचे असताना त्याने गाडी मधेच एका वळणावर घेतली आणि एका कार्यालयासमोर उभी केली.
काही क्षणात चित्र पालटले , समोर माझ्याच घरी आलेले पाहुणे, इतर सोयरे , अनेक मित्र त्यांचे कुटुंबीय असे सगळे माझ्या स्वागतार्ह तिथे फुल हातात घेऊन उभे होते, मी गाडीतून उतरताच त्यांनी पुष्पवर्षाव केला आणि एका स्वप्नवत रोमहर्षक आश्चर्यकारक भाव मुद्रेने मी पुरता हरपून गेलो. एका दिमाखदार सजावटीच्या रुपानं बहरून गेलेला तो हॉल होता. काहीच समजत नव्हतं काय होतंय, आणि या सर्व गोष्टींची मला पुसटशी शंका येऊ नये असं जबरदस्त नियोजन होतं या कार्यक्रमाचं.अनिता तू एक सुविद्य सहृदयी प्रेमळ आणि उत्तम जोडीदार आहेसच पण हे सर्व तू घडवून तुझ्या मर्यादांची उंची जिथे आमचे विचार ही पोचू शकणार नाहीत अशा ठिकाणी नेऊन ठेवलीस. मी तिथेच खरं तर नतमस्तक होऊन तुला व्यक्त होणार होतो पण आपल्या संस्कृतीत त्याला तशी निदान अशी उघड परवानगी नाही. वैशु ने निवेदन करून त्या अविस्मरणीय जगण्याची सुरुवात केली. मी मुद्दाम जगणं म्हणतो आहे कारण मी ज्या क्षणी भानावर आलो तेंव्हाच एका वेगळ्या भावविश्वात होतो आणि तेच जगत होतो आणि अजून ही तिथेच प्रत्येक कोपर्यात मी जगतोय. औक्षण परत झालं, दिवे ओवाळले आणि मग सुरू झालं ते फार अफाट होतं प्रचंड होतं , सर्वांची मनोगत झाली, विडिओ झाले जे येऊ शकले नाहीत त्यांचे. त्या काही क्षणात मी स्वतःला माझ्या 50 वर्षाचा प्रवास करताना पाहिलं.
कुठून कुठे झालेला हा प्रवास असे काही वळण घेणार याची जरा ही कल्पना नव्हती आणि सगळं अनपेक्षित पण आनंदी भावनिक आणि मन फुलवून टाकणारं घडत होतं. आयुष्याच्या या एका महत्वाच्या अनिता तू माझं जीवन पुन्हा एकदा रिचार्ज केलंस पुन्हा तेच दिवस परत परत तितक्याच आनंदात आणि निरागस पणे जगण्यासाठी. प्रत्येक क्षणाला कार्यक्रमाचा रंग वाढत जात होता आणि बहरत होता. तू केलेली अपार मेहनत त्या प्रत्येक गोष्टीत उजळून दिसत होती. आपलीच सहचारिणी जीच्यासोबत आपण गेली 23 वर्षे विविध छटा मधून आयुष्य बघत होतो तिच्याच कलेतून साकारलेला हा प्रचंड अफाट भव्य दिव्य कॅनव्हास माझ्या आयुष्याला एक मोठ आवरण म्हणून कायम राहील राहणार आहे , आणि मी तो ठेवणार आहे अगदी माझ्या काळजापाशी.
तुझ्या सोबत आपली मुलं , निशांत, हर्षल आणि शौनक यांनी जे अपार कष्ट घेतले आहेत त्या साठी मी त्यांचा आयुष्य भर ऋणी राहणार आहे. तू नेहमी म्हणायचीस आपली मुलं फार वेगळी आहेत आणि वेळ आल्यावर ते त्यांचं कसब दाखवतील ते तंतोतंत खरं आणि पटलं सिद्ध झालं.
दिवस भर आलेल्या व्हाट्सएप फेसबुक आणि linkedin अश्या माध्यमातून आलेले हजारो संदेश आणि त्यावर तुझ्या या कार्यक्रमाचे आभाळभर आच्छादन यांनी हा दिवस प्रत्येक श्वासासोवत मी जगणार आहे.
तुझ्या सोबत ज्यांनी याला छुपी साथ दिली त्या सर्वांचे आभार कसे मानू कळत नाही, पण त्या पेक्षा त्यांच्याही ऋणात राहने आवडेल. आवर्जून उल्लेख करावा अशी अनेक नांव आहेत पन मुद्दाम उल्लेख टाळतोय कारण एखाद् दुसरं नाव विसरलो तर पंचाईत व्हायची ।।
म्हणून ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ त्या सर्वांचा मी आयुष्यभर ऋणी आहे.
शरद पुराणिक
कोणार्क एक्सप्रेस
जुलै 1, 2019
Comments