संक्रांत , माझ्या आठवणीतली
संक्रांत , माझ्या आठवणीतली
तसं आजकाल सर्वच सणाचं स्वरूप बदलले आहे. अगदी छोट्या छोट्या सनांनाही भव्यदिव्य रूप प्राप्त झालं आहे आणि सर्वांवर एक दिखाव्याची, स्पर्धेची, बरोबरीची चमकती झालर आलेली आहे. त्यात आज साजरा केला जातोय तो संक्रांत हा सण. या एकाच सणाला विविध नाव आहेत आणि प्रांता प्रांतात तो वेगळ्या रूपांनी साजरा केला जातोय. आंध्र प्रदेश मधे संक्रांत, तामिळनाडू केरळमध्ये पोंगल, पंजाब मध्ये लोहरी. तो साजरा करण्याची पध्दत वेगळी असली तरी एक सर्वसमान गोष्ट आहे ती म्हणजे या हंगामातील सर्व पिकणारी धान्य, भाजी पाला, फळे यांची या ना त्या रूपात पूजा होते. निसर्गानं दिलेल्या संपत्तीचा सन्मान म्हणा किंवा त्याची विधीवत पूजा होउन मग ते बाजारात विक्रीला किंवा वयक्तिक वापरासाठी घ्यायचे. त्या सोबतच या थंड हवेत आरोग्यासाठी उष्ण गोष्टींची आवश्यकता असते, त्या म्हणजे तीळ, बाजरी आणि त्याचा समतोल म्हणून थोडा गूळ अशा वस्तू वापरून केलेले पदार्थ आपण सेवन करतो. तसं प्रत्येक सणाला आणी त्या त्या वेळी ग्रहण करतो त्या अन्नाला वैज्ञानिक संदर्भ नक्कीच आहेत.
आपल्या कडे संक्रांतिच्या अगोदर धनुर्मास हा प्रकार होता, आज ही आहे, त्या विषयी हल्ली बरीच माहिती संकलित झालेली आहे. तेंव्हा त्या विषयी जास्त न लिहिता थेट आमच्या घरच्या धनुर्मास कडे. लहानपणी आम्ही सर्व जण या दिवसाकडे आश्चर्य म्हणुन बघायचो. घरच्या स्त्रिया भल्या पहाटेच शुचिर्भूत होऊन स्वयंपाक तयार करणार आणि तोवर ईकडे देवपूजा आणि बाकी सदस्यांच्या आंघोळी आटोपून घ्यायचा. सूर्योदयाच्या अगदी अगोदर देवाला नैवेद्य दाखवून सोवाष्ण ब्राम्हण भोजन आणि सोबत घरची पुरुष मंडळी ही जेवायला बसायची. एरवी ही वेळ खरं तर पाहिल्या चहाची असते पण त्या वेळेला जेवणं व्हायची. काय गंमत आहे नाही.
याच दिवसात घरातील मोठ्या मुली, स्त्रिया एक स्टोव्ह वर एका कढई तत्सम भांड्यात तिळगुळ हलवा तयार करायचा एक दोन तीन आठवड्याचा कार्यक्रम असायचा. हल्ली बाजारात अगदी परवडतील अशा दरात या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. पण विकत काही आणून सण साजरे करण्याची पध्दत तेंव्हा नव्हतीच. रात्र रात्र तो हलवा होतच राहायचा. कोणाचा रंग जरा पिवळा, काळा, तर कोणाच्या हलव्याला काटे नाही यायचे. असं अनेक दिवस होऊन एकदाचा तो एका काचेच्या बरणीत भरून समोरच्या लाकडी फळी वर विराजमान व्हायचा.
भोगीचा दिवस येऊन ठेपला की या सणाची धावपळ सुरू, मिक्स भाजी , बाजरीची तीळ लावलेली भाकरी, खिचडी असा बेत. या दिवसात भाज्यानी भरगच्च आशा पिशव्या आणि त्यात हरभऱ्याची जुडी, टहाळ जास्त आकर्षित करायचा. सोबत पेरु, बोरं आणि ऊस अशी मेजवानी. त्या मुळे खायची चंगळ असायची, ती आज ही आहे, पण या सर्व गोष्टींची उपलब्धी ती ही अगदी मुबलक आणि खाण्याची आव ड असा संगम होता. या काळातील तरुण आणि छोट्या मुलांना या आवडी तर सोडाच. आमचं नशीब म्हणा निदान ते ही मिक्स भाजी न भाकरी खातात तरी.
मुख्य सण संक्रांत म्हणजे बायकांची धावपळ, सोवळ्यात स्वयंपाक करून मंदिरात जाऊन वाण देने. फार नट्टा फत्ता न करता आहे त्या अवतारात भलं मोठं ताट, त्यात 5 सुगडे, त्याच्या आत गव्हाची, अन ज्वारीची ओंबी, ऊस, बोर, हरभरा, तिळगूळ अश्या वस्तू भरुन, सोबत तिळाचे लाडु आणी त्या बरणीतले तिळगुळ. आज ही सुगडे आणि वाण हे सर्व आमच्याकडे आहेच. आई केंव्हा एकदा ते वाण देऊन एकदाच आपण जेवतोय या साठी घालमेल व्हायची. पूर्वी पुरणपोळी असायची, नंतर तिची जागा तिळगूळ पोळी ने घेतली. जेवण करून जरा आराम झाला की संध्याकाळी सगळ्या गल्लीत तिळगूळ खात फिरण्याची धमाल असायची. कुठे पांढरे तिळगुळ, कुठे लाडू, कुठे वडी तर कुठे सर्व मिक्स असले अनेक प्रकार स्वाहा करायचे पोटाला. या दरम्यान मग कोण कुठल्या वर्गात, अभ्यास कसा काय, असे प्रश्न उत्तर. काही थरथरणारे आणि हात, डोळे किनकीने करून कुरवळायचे, आणि गोंजारून आशीर्वाद द्यायचे तर काही फ़क्त चौकशी करायचे, कुठे हक्काने लाडु मागून खायचा तर कुठे पार्ले किसमिस मिळायचे.
खरी गंमत असायची ती नंतर चालणाऱ्या 15 दिवस हळद कुंकवाच्या कार्यक्रम. तसा हा पूर्ण बायकांचा सण, पण या दरम्यान आवा लुटणे हा जो काही प्रकार होता, आज ही आहे, पण आधीच सांगितल्या प्रमाणे त्याचं स्वरूप खुप भव्यदिव्य झाले आहे. तर आई आणि सोबत गल्लीतल्या सर्व महिला एकत्र सर्व दूर जाऊन आल्या की, त्या आल्या आल्या त्यांच्या पिशव्या पाहण्यासाठी किंबहुना ऊचकण्यासाठी मन अधीर असायचं. खरं त्या काळी चहाची गाळणी, स्टील चमचा, छोटी डबी, फनी कंगवा आशा अगदी सध्या साध्या वस्तू मिळायच्या पण त्याचं ही कुतूहल होतं. आजकाल थीम बेस्ड हळद कुंकवाचे सामूहिक कार्यक्रम होतात, उंची साड्या, दागीने अन जोरदार असे हे सोहळे होतात. पण ती माणुसकी, तो मायेचा ओलावा अन प्रेम मात्र नाही.
15 दिवसाच्या या मालिके नंतर यायचा तो दिवस रथसप्तमी, पाटावर सूर्यदेव काढून यथासांग पूजा, पुन्हा तिळगुळ पोळी अन खऱ्या अर्थाने संक्रांतीच्या सणाची सांगता व्हायची.
आपणा सर्वांना माझ्या कडून हे शब्द रुपी तिळगुळ अन शुभेच्छा !!$$!!
शरद पुराणिक
पुणे
15 जानेवारी 2020
Comments