आताच एक बातमी वाचली शिर्डी मध्ये प्रचार सभेत व्यासपीठावर आदरणीय नितीन जी गडकरींना भोवळ आली . आत्ता त्यांची प्रकृति स्थीर असल्याची ही बातमी आली. खरं तर कुठल्याही पक्ष जात पात आणि धर्म विचार धारेच्या पलीकडे जाऊन या घटनेचा मी जेंव्हा विचार केला आणि लक्षात आलं की कॉर्पोरेट क्षेत्रातही प्रचंड धावपळ कष्ट आहेत पण ते करताना सगळ्या सुख सुविधांची चोख व्यवस्था असते आणि कल्पने पलीकडे जाऊन विचार करून त्याची अंमलबजावणी ही होते.
पण निवडणुकीच्या या सगळ्या धावपळीत सर्व पक्षांच्या नेत्यांची मान्यवरांची विषेश करुन जे वक्ते आहेत त्यांची अक्षरशः फरफट होते,. इकडे सूर्य आग ओकत आहे आणि उन्हाच्या त्या चटक्यात हजारो मैल प्रवास. विमान हेलिकॉप्टर चारचाकी गाडी तर कधी खाजगी प्रचारासाठी तयार केलेल्यां गाड्या. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अश्या वेग वेगळ्या वातावरणात होणाऱ्या सभा..तास न तास बोलणं. कुठे आच्छादित व्यासपीठावर तर कुठे मोकळ्या जागेत मैदानावर गल्ली बोळात असणारी सभा स्थान. कशाचा कशाशी मेळ नसतो. झोप नाही धड जेवणाची नाश्त्याची वेळ नाही. वेगवेगळ्या तापमानात फिरायचं. बोलायचं ते ही मुद्देसूद लोकांना पटेल असं. विभागीय कार्यकर्त्याना नेत्यांना सूचना. जास्तीत जास्त मतदारांना किँवा त्यांच्या पर्यंत कस पोचता येईल याच नियोजन. जरी आज खूप चोख व्यवस्थापण असले तरी या मंडळींना प्रत्यक्ष जावंच लागतं. हे सगळं करताना काय तारांबळ उडत असेल हे कल्पने पलीकडे आहे. मी आधीच उल्लेख केला आहे की हे लिखाण पक्ष जात पात धर्म या पलीकडे जाऊन या प्रक्रियेत स्वतः ला झोकून दिलेल्या प्रत्येक व्यक्ती साठी आहे.
आदरणीय पंतप्रधान मोदी जी या सर्व उदाहरणात उच्च स्थानी आहेत कारण एक देशाचं अतिउच्च पद यशस्वी पणे सांभाळून हे करत आहे हे तुम्ही आम्ही विचार करण्याचा पलीकडचं आहे. ते शब्दांत गुंफनं केवळ अशक्य आहे.
पण त्यासोबत प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनाही विसरणं बरोबर नाही. काल राहुल गांधींचे हेलिकॉप्टर तांत्रिक अडचणींमुळे दिल्लीला जाऊ शकलं नाही आणि त्यांना संगमनेर इथे मुक्काम करावा लागला. रात्री दुकान उघडून शॉर्ट आणि टी शर्ट आणला. दिवसा वापरलेले कपडे धुवून तेच आज घातले अशी बातमी वाचली. या मुळे मी त्यांचा चाहता झालो असं नाही पण उदाहरण म्हणून देणं गरजेचं आहे. सुप्रिया सुळे पंकजा ताई आणि इतर सर्व पक्षांच्या त्यांच्या सारख्या अनेक स्त्रिया याच शर्यतीत एक भाग घेऊन वरती नमूद केल्या प्रमाणे राबत आहेत. त्यांनी प्रचारादरम्यान आपला चालक मतदान करू शकला नाही म्हणून लगेच गाडी त्याच्या मतदार संघात घेऊन त्याला त्याचा हक्क बजावण्यासाठी अत्यंत खेड्यातील रस्तायांवरून जास्तीचा प्रवास करून गेल्या आणि त्यांच्या चालकाने मतदान करे पर्यंत थांबल्या. या सर्व बाबींचा व्यक्ती म्हणून जर आपण विचार केला तर हे सर्व कऱण्यासाठी एक विशाल ईच्छा शक्ती मनाचा मोठेपणा आणि इतर अनेक बाबी असाव्या लागतात. उदाहरण द्यावं म्हणून आमच्या कोथरूड मतदारसंघात अनेक ज्येष्ठ नागरिक हिरीरीने या प्रक्रियेत सहभागी आहेत. मजले चढुन अगदी उत्साहात मतदारांना निरोप देतात. काही ठीकाणी चहा पाणी होतं. आमच्या घरी बायकोने आग्रहाने ते केलं आणि त्या क्षणी त्या चेहेऱ्यावर जे भाव दिसले ते फार छान होते. कुठे औक्षवन होतं कुठे गप्पा रंगतात. अश्या लाखो व्यक्ती त्यात स्त्री आणि पुरुष दोनीही आले या प्रक्रियेत सहभागी आहेत त्या सर्वांच्या कार्याला सलाम. तुसी ग्रेट हो.
या पलीकडे ही एक वेगळी यंत्रणा असते पण तिचं आपलं कधी दर्शन झालं नाही ती म्हणजे "पैसा". ती एका विशिष्ट वर्गासाठी असते म्हणून त्या विषयी मी काही बोलणं योग्य नाही.
हा लेख ज्यांनी या निवडणुकीत स्वतः ला झोकून एक निःस्वार्थ योगदान दिलं. 24 तासाचे 48 तास करून तहान भूक झोप हरवून दिलं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सन्माननीय सदस्यांसाठी..
तुमच्या कार्याला सलाम ।। तुसी ग्रेट हो
शरद पुराणिक , पुणे ह. मु. हैदराबाद
Comments