जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने ...
जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने ...
यु तो बहोत सख्त है मेरा दिल
पर कंबख्त एक चाय पे पिघल जाता है
दो ही जरूरते है फिलहाल
पहिली चाय और दुसरी मोबाईल
यादों मे आप और हाथ मे चाय हो
फिर ऊस सुबह की क्या बात हो
(संकलित)
चहा हा आमच्या जगण्यातला एक अविभाज्य घटक आहे. येणारी प्रत्येक सकाळ आणि त्या सोबत त्या दिवसाची आश्वासकता, ऊर्जा अन चैतन्य घेऊन येणारा चहा. कायम हवाहवासा वाटणारा आणि तुम्ही जर अस्सल चहा प्रेमी असाल तर मग विचारायलाच नको. वेळ नाही काळ नाही, सकाळ, दुपार, रात्र नाही अन चहाला कधी "नको" तर अजीबात नाही.
कोणी काहीही म्हणा ...पण अनेकांना तो अगदी Oxygen सारखा वाटतो. हल्लीच्या या कृत्रिम जिंदगीत याचे अनेक शारीरिक तोटे आणि हानी या विषयी लिहुन येतं ...कित्येकांनी तर अगदी दारू, सिगारेट या पेक्षाही वाईट असं संबोधलं... अन चहा प्रेमी लोकांच्या वर्मावर घाव घातले... म्हणुन आम्ही डगमगून जाऊ ?? छे छे तस काही अजिबातच होणार नाही.
लहानपणी आई मोठ्या आवाजात सांगायची... उठा रे सगळे चहा टाकलाय ..तसं 120 च्या गतीने अंगण गाठायचं..बिटको चं काळं मंजन डाव्या हातावर घेऊन ..बोटाच्या ब्रश ने बत्तीशी एकदाची उजवायची.. कासंडी भर पाण्याने गुळण्या करून त्याच गतीने स्वयंपाक घर गाठायचं ..चुलीवर पितळेच्या पातेल्यात वाफाळणारा तो चहा कधी एकदा आपल्या कप बशीत उतरतोय असं व्हायचं ..कधी कान तुटलेल्या, तर कधी प्याला तर कधी काय असा तो चहा आपल्या वाटेला यायचा ..तो घ्यायचा ..हूश्श.
चार च्या चहाचं ही तेच ..घड्याळाच्या आधी जिभेचे चार वाजायचे ...एकत्र कुटुंब असल्याने सदस्य संख्या अमाप.. पण कोणीतरी तो करणार आणि आपण फ़क्त तो चवीने पिणार. गल्लीत , नातेवाईकांकडे गेलं की हमखास तो मिळणार..
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येकाला वेगवेगळ्या अनुभवातून घेऊन जातो चहा... मुलीला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना थरथरत्या हाताने चहा देणारी ती मुलगी ...चार कप चहाचा तो ट्रे डोंगर उचलल्या सारख्या भावना आणि घामाने डबडबलेली ती पोर... इकडे नवरा मुलगा तोच चहाचा कप वापरून डोळ्यांची दुर्बिण करुन चोरट्या नजरेने तिची छबी टिपतोय... मुलीचा बाप तोच चहाचा कप घेऊन डोक्यात शिजनाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधतोय...
कोवळ्या मिशा, पहिलीच शिवलेली विजार त्या वर अगदीच न साजरा दिसणारा बुशर्ट घालून कॉलेजच्या चौकात टपरीवर किंवा कॉलेजच्या कँटीन मध्ये चहाची हौस भागवणारा तो कोलेजकुमार ..पण ऐट अशी की बहुधा तो चौक आपल्याच मालकीचा आहे ..अन समोर येणाऱ्या जाणाऱ्या गर्दीत एखादा चेहेरा आपल्यासाठी शोधत भिरभिरणारी ती नजर... अशात दोन चार टाळकी एकत्र येतात, समूह होतो अन चहाची ओढ वाढते ..गप्पांचे फड रंगतात तसे आयुष्याचे रंग ही बदलू लागतात ..पण सर्व काही या चहाच्या साक्षिने होत. असे असंख्य टपरिवाले, हॉटेलवाले जवळचे नातेवाईक होतात... कारण तिथेच रंगतात, घडतात, आयुष्य तर काही बिघडतात ही.
बाल्य , कौमार्य, तारुण्य या अवस्थातून आता या सांसारिक अवस्थेत तो रममाण होतो ...आता आई नाही तर बायको आवाज देते..अहो उठा ऑफिसला उशीर होईल...मी चहा टाकलाय ...चहा हा शब्द कानी पडताच उठतो ब्रश आटोपून कधी आवरत आवरत, कधी वर्तमानपत्र चाळत तर कधी टीव्ही पाहत चहा पितो, कधी ढोसतो अक्षरशः. ती याचा डबा करण्यात आणि पोरांची खाण्याची सोय करण्यात व्यस्त... क्वचितच सकाळचा चहा सोबत ..मग एक रविवार मुद्दाम हुन दोन बाय पाचच्या बाल्कनीत दोघेही चहा घेतात ...अन वाफाळणाऱ्या त्या चहात हा पुन्हा हरवतो.
ऑफिसच्या त्या उंची मशिनमधून येणारा तो चहा भावतच नाही..उंची दूध, उंची चहा पावडर अन लकाकणारी ती मशीन, स्वतःच्या नावचा उंची कप पण...सर्व आहे पण ती आपलूकी नाही... सभोवताली नाटकी चेहेरे तर काही हवे हवे वाटणारे ...पण वेळ निघुन गेलेली असते .ऑफिसातून निघण्याची घाई कारण घरी ती चहा साठी वाट पाहते.. गाडीच्या आवाजात तिला कळतं तस चहाचं आधण ठेवते ..दिवसाचा शिन घालवतो तो चहा...
जगण्याच्या प्रत्येक अवस्थेत "चहा' कायम हजर असतो
जन्म, बारसं, परीक्षा, अभ्यास , जागरण, लग्न, मैत्री, सुख, दुःख...अशा सर्वच क्षणात चहा हे माध्यम ...अगदी कोणाचा अंत्यविधी आटोपून घरी आलो तरी त्या घरचे लोक ही चहा पिल्याशिवाय जाऊ देत नाहीत.
कडाक्याच्या थंडीत,
कोसळणाऱ्या धारात
श्रावणातल्या सरीत
सहलीत अन प्रवासात
कायम साथ देणारा
असा हा चहा
हल्ली त्याला फार वैभव आले आहे
भले भले त्याचे ब्रँड आहेत
दुकानं सजली नटली आहेत
...
पण मला कायम खुणावतो तो चुलीवरचा अन मित्रांच्या गर्दीत टपरीवर अगदी उधारीवर ही पिलेला चहा...
तूर्तास थांबतो..
शरद पुराणिक
200521
Comments