अविस्मरणीय सहल, धार्मिक यात्रा, कुटूंब मेळा आणि बरंच काही




अविस्मरणीय सहल, धार्मिक यात्रा, कुटूंब मेळा आणि बरंच काही


गेली साधारण अडीच वर्षे मी हैदराबाद पुणे असं कार्यालयीन दगदग, दर आठवड्याचा प्रवास या साऱ्याला कंटाळून एक मोठी रजा घेण्याच ठरवलं. वर्षाखेर आणि शिल्लक रजा असा आमच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगारांसाठी तसा दुर्मीळ योग जुळून आलाच होता. कुटुंबासोबत राजस्थान दौरा आखला होता, पण मुलांच्या शैक्षणिक अडचणी मुळे तो रद्द केला. अनायासे रजा होतीच, त्यात एका घनिष्ट मित्राच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक सोहळा औरंगाबाद येथे ठरला होता. मग आमचा मोर्चा औरंगाबाद ला वळला. 


मित्राच्या त्या सोहळ्या विषयी पून्हा सविस्तर लिहिणार आहेच, कारण तो विषयही अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.


खर तर या वेळी फ़क्त मित्रांसाठी वेळ द्यायचा असं ठरवलं होतं. पण आमच्या सासरच्या मंडळींनी आमची कुलदेवता श्री रेणुकामाता च्या दर्शनासाठी माहुरगड दौरा आखला होता. मग त्यांच्या सोबत जायचं ठरलं. सर्व मिळून 55 सदस्य असलेल्या या कबिलयासोबत चा प्रवास म्हणजे एक पर्वणी होती. तयारीचे सर्व संदेश "काय चाललंय" या भ्रमणध्वनी वरील सदरात येतंच होते, फार नियोजन होतं, 2 वर्ष ते 70 वर्षे अश्या सर्व वयाच्या सदस्यांचा हा समूह एकत्र बांधायची ही कल्पना अफलातून होती. प्रवास तसा दूरचा होता आणि तो 2 दिवसांत पुर्ण करायची जबाबदारी ही होतीच. त्यामुळे वेळ हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. सर्व संदेश त्याच धरतीवर होते. रविवारी सकाळी बरोबर 8 वाजता निघायचं ठरलं. एक 50 सीटची बस प्रवासा साठी होती. मी माझा मेव्हणा, त्याची बायको, मुलं, आमच्या सासूबाई आणि आम्ही दोघे 7 वा निघालो. पहिला थांबा आमचाच असल्याने वेळेत पोचणे आवश्यक होतेच. वेळेत न पोचणाऱ्यांसाठी 100 रु दंड होता, तो आम्ही वाचवला. इतर सहप्रवासी ही तयार होतेच. 3 ते 4 थांब्यावरून सर्व जण वेळेत पोचले. आणि सुरू झाला तो भन्नाट प्रवास, पोरांचा चिवचिवाट, बायकांचा कल्ला, तरुणाईची धांदल आणि वयस्क लोकांचे दबक्या स्वरात संवाद.  जरा अंतर पार झाले आणि गाडीत 3 ते 4 इडलीवाले अण्णां अवतरले, वेळ होती नाश्त्याची. प्रत्येकी 6 इडल्या आणि चटणी असा भरपेट नाष्टा त्या इडळीवाल्यानी म्हणजेच माझे मेहुणे, यांनी सर्वाना दिला, शिल्लक इडल्यांची पुन्हा एक फेरी आली, ज्यांना भूक, पोटात जागा होती, किंवा कशाला उगाच सोडायचं अशा सर्वांनी ती ही यथेच्छ हाणली.  ईडली पोटात जिरण्यासाठी जागा शोधत होतीच एवढ्यात संगीत सुरू झाले, नेहेमी प्रमाणे एक दोन जण नाचायला लागले. तसे माझे पाय ही जागेवर थिरकायला लागले आणि मी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून नाचायला लागलो. हल्ली तशा अशा संधी फार कमी मिळतात मग त्या सोडून द्यायला मन तयार होत नाही.  बराचवेळ बरीच मंडळी नाचून इडली जिरत होतीच. एवढयात सर्व त्यांच्या सोबत घेतलेले तहान लाडू भूक लाडू हळूच पिशवीतून काढून वाटप करत होते, चिवडा, लाडु, फळं, फरसाण, राजगिरा वडी, चॉकलेट, तत्सम पदार्थ गाडी भर फिरत होते.


मधे एक चहाचा ब्रेक झाला ज्यात सर्व हौशी मंडळींनी फोटो सेशन केलं. सेल्फी, ग्रूप, मुली, मुलं, असे सर्व फोटोत एवढे गर्क होते की चहा प्यायचा ही विसरले होते. सोबत ते फोटो टाकणार आहेच. 



दुपारच्या जेवणाचे आणि रात्रीसाठी पोळ्या, भाकरी असे डबे सर्वानी घरूनच घ्यायचं आधीच ठरलं होतं. आता जशी गाडी रस्ते पार करत होती तसे आम्ही जेवण्यासाठी जागा शोधत होतो. 56 लोग आणि 56 भोग असा तो योग होता त्यासाठी एक मोकळी जागा जिथे बसून जेवने होतील. एकदाची अशी जागा सापडली. एक बंद पडलेलं ज्यूस सेंटर । रसवंती तिचं शेड होते, मागे एक विहीर, आणि मागे तुरी लावलेले शेत असा नयनरम्य, निसर्गाचा लाभ मिळाला.  साधारणपणे 15 घरातुन आलेले विविध पदार्थ, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आणि ते ही आपल्या मराठी धाटणीचे, धपाटे, भाकरी, पोळ्या, बटाटा भाजीचे 10 विविध प्रकार अन चवी, मटकीच्या उसळीचे तितकेच प्रकार, विविध चटण्या, भात, लोणची असा तो मी वरती नमूद केल्या प्रमाणे 56 भोग  योग होता. त्या हवेशीर वातावरणात तो दरवळणारा खमंग सुवास, आणि 5 ते 6 जण सोडून सर्व त्या सहभोजनाचा आनंद घेत होतो. मला आमच्या लहानपणी होणाऱ्या आवळी भोजनाची आठवण झाली. आह आह काय ती अप्रतीम चव, तसं मी फार जावई म्हणून वावरत नाही कधीच, पण सर्व जण आग्रहाने ते विविध पदार्थ वाढत होते. पोटाची सुई उसवल्यागत सर्व जण ते खात होते. यथेच्च खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. ज्या शेतावर थांबलो होतो त्या शेत मालकाने परतीच्या प्रवासात निदान चहा तरी पिऊन जा असा आग्रह करून निरोप दिला. तो चहा त्याच्याकडुन होता. मानुसकीचा ओलावा असा स्पर्शला की मी भारावुन जातो. पुन्हा एकदा भरपूर फोटो काढून आम्ही गाडीत बसलो.


आता गाडी जरा सुस्तावली होती, सर्व पहाटे उठून आणि आधीची तयारी या मुळे थकवा होताच. पण आम्ही काही जण कर्णमधुर गाण्यांचा आस्वाद घेत होतो, सोबत गप्पा चालुच होत्या. बहिणी-बहिणी, भाऊ-भाऊ, जावा-जावा, व्याही-व्याही, असे बरेच छोटे मोठे समूह अन गप्पांची रेलचेल होती.  छोट्या मुलांचा एक समूह मागे एकत्र नांदत होता.  आता संध्याकाळ होत होती आणि पुन्हा चहा साठी एका ठिकाणी थांबलो. क्षणार्धात त्या हॉटेल ला बागीच्याच रूप आलं, कोणी झाडावर, कोणी फांदीला टेकून आशा विविध ठिकाणी फोटो काढत होते, कारण तिकडे चहाला आधण यायचं होतं. 60 कप चहा तयार होण्यासाठी तसा वेळ लागणारच होता. झाला एकदाचा चहा.


माहूरचा रस्ता तसा बऱ्यापैकी जंगलातून आणि पळसाच्या झाडातून वळणे घेत जाणारा, वाहनांची गर्दी नाही, एका संथ लयीत गाडीचा आवाज करत गाडी पुढे मार्गस्थ होत होती. इतक्यात समोरुन भावगीतांचा आवाज आला, आमचे सहप्रवासी आणि एका मेहुण्याचे सासरे (3 व्याही परिवार ही सहप्रवासी होते)  यांनी सूर धरला होता. अतिशय सुंदर आवाजात त्यांनी काही भक्तिगीते, भावगीते सादर केली. आमच्या सासवांनी (एकूण 5 सासूबाई प्रवासात होत्या) ही काही भजनं आणि गीते सादर केली. त्या भावभक्ती ने परिपुर्ण प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही माहुरगड ला पोचलो. 


पोचण्यास उशिर झाला त्यामुळे मातेचं दर्शन काही झालं नाही. जरा वेळ असक्यामुळे आमच्या बायकोने या संधीचे सोने करत सर्व स्त्री आणि कुमारिका वर्गासाठी बांगड्या घेतल्या. कारण 15 ते 20 सोवाष्ण, आणि 9 कुमारिका असा तो सुयोग जुळून आला होता. आता हा प्रवास एका भक्तिमय रंगात न्हाऊन निघत होता. तसे, पूर्ण 12  तास प्रवास झाला होता. पण कोणीही थकले, कंटाळले नव्हते. आणि मातेच्या पायरीचे दर्शन घेऊन भक्त निवसाकडे निघालो.


ईतक्या लोकांची राहायची व्यवस्था तसं जिकरीचे काम होते, पण हिच्या भावांनी केलेलं नियोजन पक्कं होतं, मी नामोल्लेख टाळतोय कारण सर्वांचाच काही न काही हातभार या तयारीत होता. तरी विशेष करून संजय पालकर आणि अमोल पालकर यात आघाडीवर होते.  कुटुंब परत्वे खोल्या मिळाल्या आणि मुक्कामी  झाले सर्व जण. दुपारच्या जेवणातून राहिलेले धपाटे, भाकरी, पोळ्या घेऊन बाजूलाच एका हॉटेलमध्ये आम्ही पुन्हा सहभोजन केलं.


दुसरेदीवशी सकाळी 7 ला निघण्याची तयारी होती, सर्व जण नट्टा पट्टा करून एकत्र आले. भरजरी साड्या, पैठण्या आणि बरेच विविध प्रकार अश्या नटलेक्या आमच्या सहप्रवासी महिला, पुरूष आपल्या आहे त्या साध्या वेशात तयार होऊन निघालो. दुपारच्या जेवणाची व्यवस्था लाऊन आम्ही गडावर निघालो. मातृतिर्थाचे दर्शन, सोबतच एका मामानं देवी करायची होती  त्यासाठी ची तयारी झाली. तिथेच एक पूर्ण ग्रूप फोटो काढला. आजच्या या धकाधकीच्या युगात एवढी लोक एकत्र येऊन, विनातक्रार अशी मज्जा करतात, तेंव्हा तो क्षण टिपणं अत्यावश्यक होतंच. या सोबत सर्वानी पुन्हा फ़ोटो चा एक राऊंड पूर्ण केला. अनिताने तिच्या सगळ्या भावांसोबत फोटो काढले. आणि तिची घट्ट मैत्रीण आणि बहीण स्वाती, श्रद्धा, नम्रता यांच्या सोबत ही  फोटो काढले. अमित आणि प्रतीक्षा हे खास मुंबईवरून या साठी आले होते, आणि या मराठवाडी गोंधळात ते समरस होऊन प्रवासाचा आनंद घेत होते. 


देवीच्या दर्शनाआधी सर्व जण अनुसया, दत्त शिखर करून गडांवर पोचले. मी गडावरच होतो, कारण देवीच्या पूजेच्या आधी तिथं पोचणं गरजेचं होतं.  मी तसा माहूरला दर वर्षी, वेळ मिळेल तसं जातो, पण या वेळी देवीचा तो हसरा चेहेरा पाहण्याचं भाग्य माझ्या नशिबी होतं. सोबत देवीचा आमच्या समर्पित महावस्त्रातील फोटो पाठवत आहेच. या प्रवासात संस्थांनाचे विश्वस्त यांनीही भरपूर वेळ दिला. माझा मेहुणा अनंत जोशी जो विश्व हिंदु परिषद कार्यकर्ता आहे त्याचा, संजूचा, माझा आणि अनिता या सर्वांचा देवीप्रसादाचा नारळ देऊन सन्मान केला ही जमेची बाजु. 


सकाळी नियोजिल्या प्रमाणे जेवणासाठी आम्ही बुलढाणा अर्बन गेस्ट हाउस वर आलो जिथे जेवण आमची वाट पाहत होतेच. माहुर सारख्या ठिकाणी 56 लोकांची एकत्र जेवण्याची सोय तिथे उत्तम झाली आणि अवघ्या 40 मिनिटात जेवणं झाली. 


परतीचा प्रवास पुन्हा त्याच जोशात सुरू झाला, गाण्याच्या भेंड्या ने सुरुवात झाली. दोन बाजूच्या दोन समूहात हा कार्यक्रम रंगला आणि 3 ते 4 तास तो चालुच होता.  खरं तर किती ही जुना असला तरी हा खेळ प्रत्येक प्रवासातली एक न विसरणारी आठवण होऊन राहतो. 


आजच्या या काळात ही एवढी माणसं एकत्र येऊन, कुठलाही वाफ नाही, मतभेद नाही, आणि फ़क्त आनंद वाटण्यसाठी एकत्र येतात काय, प्रवास ठरतो काय आणि तो यशस्वी होतो काय. हे सर्व करण्यासाठी जी प्रबळ इच्छा शक्ती आणि उत्साह या लोकांना आहे त्या साठी समस्त वैद्य पालकर, जोशी शहापुरकर, व्यवहारे, गारजकर, नाईक,  बाबरेकर, दहिभाते, दिंडोरे, नेवपूरकर, जव्हेरी या परिवाराचे आणि त्यातील प्रत्येक सदस्याचे मी आभार मानतो.


आदिशक्ती रेणुकामाता आपणा सर्वांसोबत आम्हालाही भरभरून सुख, समाधान, शांती, उत्तम आरोग्य, धनसंपदा देवो ही प्रार्थना !!$$!! 


जय जगदंब


शरद पुराणिक

29 डिसेंबर 2019, पुणे

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती