आंबू आत्या, नानी, गंगू मावशी न बायजी

 आंबू आत्या, नानी, गंगू मावशी न बायजी


मी माझ्या मागील अनेक लेखात हा उल्लेख केलेला की आम्ही एका मोठ्या कुटुंबात एकत्र रहात होतो. त्याच अनुषंगाने काही व्यक्तिरेखा आज आठवल्या आणि म्हणूनच त्यांच्या विषयी लिहायचे ठरवले. 


आमची पुराणिक 2 कुटुंबे आजू बाजूला एकत्रित नांदत होतो. एकीकडे आमचे आजोबा अग्निहोत्री  देवीदासराव पुराणिक यांचे कुटुंब (एक भाऊ, म्हणजे आमचे चुलत आजोबा, वडिलांचे काका) आणि त्यांची 4 मुले, मुली आणि परिवार. 


बाजूच्या वाड्यात श्री भवाणीदास पुराणिक आणि त्यांची 5 मुले, 1 मुलगी. 


या सोबतच इतर अनेक वेगवेगळे धागे या नात्यात गुंतलेले होते आणि त्यांचं वास्तव्य ही या सर्वांसोबत होतं. 


त्यातीलच एक म्हणजे आंबू आत्या, ही कोण ? तर ही आमच्या वडिलांची आत्या. जी की लग्न होऊन देशपांडे झाली होती. ती खरं तर आमच्या आजोबांची आत्ये बहीण होती, पण तो परिवार ही इथेच राहायला होता. असो फार खोलात न जाता पुढे जाऊ.  आंबू आत्याच्या लग्ना नंतर लगेच तिच्या पतीचे निधन झाले आणि सर्व विधी नंतर ती आमच्या घरी राहायला आली.


आपण परवाच काकस्पर्ष किंवा तत्सम जुने सिनेमे पाहिले असतील. त्यात वैधव्य आलेल्या वयस्कर स्त्रिया दाखवतात अगदी तसच राहणीमान. केशवपन करून लाल, पिवळ्या अशा  रंगाच्या नऊवारी साड्या, एकदम साधा कपडा म्हणा हवं तर. त्या काळी पुनर्विवाह निषिद्ध होता, आणि विधवा स्त्री ने आजन्म पतीच्या स्मरणार्थ व्रतस्थ जीवन व्यतीत करायचे अशी रूढी होती.  आंबू अत्याचे मालक देशपांडे हे पदवी नुसार देशपांडे होते आणि ते गेल्या नंतर आत्याला काही रसद मिळायची, पण तो व्यवहार घरातले ज्येष्ठ सांभाळायचे. 


मी लहान असताना मला हिच्या अस्तित्वाचं कुतूहल वाटायचे, शांत, संयमी, फार बोलणं नाही. आणि सोवळे ओवळे त्या मूळे हीला धार्मिक कार्यात भाग घेता येत नव्हता. मग वरची कामे जस जमेल तसं करत ती राहत होती. म्हणजे मी अगदी 2 री त वगैरे असेन तेंव्हाच ती थकलेली होती. कंबरेत पूर्ण बाक आला होता आणी काठी घेऊन तिचा तो धूसर वावर आता ही माझ्या डोळ्यांसमोर पिंगा घालतोय. एकदा ती पिठाचा डबा बाजूला करण्यासाठी धडपडली, तशीच खाली पडली, काही दिवस अंथरून धरून नंतर ती तिच्या त्या एकल  विश्वातून मुक्त झाली. आम्हा लहान मंडळीला तिचा खूप धाक होता, नुसती तिची नजर सर्व सांगून जात होती. नातं तस दूरच पण आमच्याकडे अगदी आमची आजी सारखं जगून गेली. 


या नंतर आमची एक आत्या जिला आम्ही नानी म्हणायचो, तिचं ही असंच. अंजनवती ला जोशी यांच्या कडे तिचं लग्न झालं, काही वर्षांनी तिचे पती आजारी पडले आणि गेले. पण या दरम्यान नानीला 1 मुलगा, 2 मुली होत्या. तिचं ते बाडविस्तार घेऊन ती ही आमच्या कडे राहायला आली. याच दरम्यान मोठया आत्या ची दोन मुलं ही आमच्या कडे शिकण्यासाठी होती. मादळमोही चे मुळे ज्यांच्या कडे राम हे कुलदैवत होते. बाबासाहेब मुळे आणि भगवानराव मुळे.  ते दोघेही आज नाहीत, उच्च पदावर सेवा निवृत्त होऊन त्यांच्या संसाराच्या विस्तृत वेली बहरल्या आहेतच. ते लिहिणं जास्त विस्ताराच होईल.


नानी चा मुलगा पंडित हा सरकारी नोकरीस लागला मग नानीच बिर्हाड हलल. दरम्यान तिच्या 2 मुलींचे विवाह ही झाले. जरी बिर्हाड वेगळं होतं तरी नाणी सकाळच्या चहा ला येऊन जायची. जेवणं आटोपली की 4 च्या चहाला नानीची परत चक्कर व्हायची, इतक्या वर्षांचा सहवास तिला काही सुटत नव्हता. पंडित महाराज हे स्वतः एक मोठा विषय आहेत लिहिण्यासाठी. सरकारी नोकरी  सोडून, भविष्य, कीर्तन असा प्रवास करून वैवाहिक जीवनाला त्यागून संन्यास्थ जीवन जगत ऐन उमेदीच्या काळात गेला. अशी ती रोज रोज येणारी नानी, एखाद दिवशी नाही आली तर घड्याळात चार वाजलेत नाहीत असा व्हायचं.


आता बाजूला आमचे काका मुरलीधर पुराणिक यांच्या कडे गंगुमावशी (मुळे) त्या ही तश्याच आंबू आत्या सारख्या. पण गांगुमावशी च्या चेहेऱ्यावर तेज होतं. गोरी पान, उंची पुरी, सरळ नाक.  तशी आमची काकू (आजी, दादांची आई आणि माझ्या वडिलांची काकू) ही दिसायला सुंदर होती. स्वभावाने बोलकी, मायाळू काकू तिच्या बहिणीसोबत गल्लीत आनंदाने जगली. सर्व बहिणी मधे काकू चांगलं जगली, जास्त सहवास दिला काकूने सर्वाना 5 मुलं, 1 मुलगी आणि सर्व स्थिर स्थावर. तिचा धाक ही होता तेवढाच सर्वाना.


 गंगुमावशी म्हणजे आमच्या काकूंची बहीण. म्हणजे वरती नमूद केल् त्या मुरलीधर काकांची (दादा) मावशी. तिचं ही असंच झालं, लग्नानंतर पती गेले, अन केशवपन करून तश्याच एकरंगी साड्या. हल्ली सिनेमात दाखवतात अगदी तशीच कडक वैधव्य आलेली ब्राम्हण स्त्री. हिची विशेष ओळख म्हणजे तिला तपकिरी ची सवय होती. अनेक वर्षे स्वयंपाक किंवा तत्सम काम करून तिचं जीवन व्यतीत करत होती. नंतर नंतर ती बराचकाळ पंढरपूर ला पांडुरंगाच्या सानिध्यात राहायची आणि लहर आली की पुन्हा बीडला येत होती.  थकून थकून ती ही पांडुरंगी लिन होऊन निघुन गेली.


या सर्वांसोबत आमच्या काकु (आजी) ची अजून एक बहीण रंगुबाई काळे उर्फ बायजी हे एक मोठं प्रस्थ होतं. स्वतः निवृत्त मुख्याध्यापक त्या काळात , भारदार देह यष्टी, खडा आवाज. बायजी चं अस एक स्वतंत्र अस्तित्व होतं. राहायचं घर, शेती बऱ्या पैकी सधन होती बायजी. पण मूल बाळ नव्हतं. पण इकडे तात्यासाहेब, दादा, बापू, अप्पा, बाबा हे बहिणीचे 5 मुलं ती आपलीच समजायची.  त्यात बाबांना दत्तक विधान करून त्यांनी तिचा सांभाळ केला. 


बायजी म्हणजे गावात पोलीस पाटील असतात तसा दरारा होता. आसपास घडणारी प्रत्येक घटना ही तिला सांगितलेच पाहिजे अन्यथा ते जाणून घेण्याची तिचं वेगळं कसब होतं. दारासमोर एक सिमेंटच सिंहासन, त्या वर बसून येणाऱ्या, जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस, चौकशी अगदी दहिवाला, पानवाला, ते गल्लीतल्या आबालवृद्ध सर्वांची.  तिचा दरबार रोज भरत असे ज्यात सर्व प्रतिष्ठित  (??) मंडळी असायची. त्या काळात ही सुपारी, जर्दा असा विकण्याचा छोटा व्यवसाय ही होता.  आम्ही पहाटे पहाटे 4 ला कधी कामानिमित्त प्रवासाला निघायचो, तेवढ्या पहाटे ती बाहेर येऊन चौकशी करायची. भावना वाईट नव्हती पण सर्व जाणून घेण्याची एक सवय, जी अनेक लोकांना असते.  तिच्या दारासमोर आम्ही खेळायचो, एकदा माझ्या विटीने तिचा चष्मा फुटला होता. संध्याकाळी वडील ऑफिस वरून येतच होते त्यांना रस्त्यावर थांबुन तिने माझी तक्रार केली. वसंता तुझं हे लहान पोरगं फार व्रात्य आहे, तिची ती बोलण्याची शैली फार वेगळी होती. 4 च्या काट्यावर चहा पिण्याची तिची सवय होती. आत जाऊन ती चहा घेऊन पुन्हा आसनस्थ व्हायची.  आजच्या आघाडीच्या वृत्त संकलन गती पेक्षा ही प्रचंड वेगाने ते इथंभूत ती संकलित करायची. 


आज अचानक यांची आठवण झाली म्हणून व्यक्त झालो. चुलत, मालत असं वेगळं काही नव्हतंच त्या काळी, आजही आम्ही ते फार ठेवलं नाही. नात्यांची ही गुंतागुंत वाटेल पण फार आपुलकी, जिव्हाळा अन आपलेपण होतं. गेले ते दिन गेले.


शरद पुराणिक

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती