एका दिमाखदार विवाह सोहळ्या साठी आपणा सर्वांचे अभिनंदन
आदरणीय काका, काकु आणि आशुतोष व केतकी प्रथम
एका दिमाखदार विवाह सोहळ्या साठी आपणा सर्वांचे अभिनंदन !!$$!! अश्या या दैदिप्यमान सोहळ्याला आम्ही होतो हे आमचे भाग्य.
खरं तर साखरपुडाच इतका अवर्णनीय होता, त्या धरतीवर मुख्य सोहळा निश्चितच चांगला होणार यात कुठलीही शंका नव्हतीच.
गेली चार दिवस हा सोहळा टप्प्या टप्प्याने संपन्न होत होता आणि त्या समस्त सोहळ्याचे याची देही याची डोळा वर्णन अनिता करून करून थकत नाहीये, प्रत्येक क्षणाला तिला काही ना काही आठवत राहतं आणि आनंदी चेहेऱ्याने ते ती सांगतेय.
मेहेंदी आणि बांगड्या हा तसा फार घरगुती पद्धतीचा कार्यक्रम पण आपण सर्व रसिक, दर्दी आणि आनंद उधळणारे आणि त्यात समरस होवून स्वतः ही तो जगणारे आहात.
त्या नंतर झाला तो संगीत रजनी चा कार्यक्रम. मी पुन्हा नमूद करू इच्छितो मी जरी यास उपस्थित राहू शकलो नाही तरी त्याचे वर्णनं करताना अनिताच्या चमकणाऱ्या डोळ्यातुन आणि आतून येणारे भावच सर्व सांगुन गेले. आपण सर्व जण कलावंत आहातच पण त्यात ही आशुतोष सारखा कलेचा, सुस्वभावी, प्रेमळ, मायाळू आणि स्वच्छ असा कोहिनूर हिरा आपल्याला लाभला हे ही भाग्य. हे असं इतकं सहजा सहजी कोणालाही लाभत नाही. त्या हुन ही महत्वाचं म्हणजे ती भाग्याची शिदोरी तुम्ही पालक म्हणून फार समर्थपणे, नेटकेपणाने वापरताय. त्या मागचे कष्ट आम्ही पाहिलेले आहेत. त्याच्या या गुणांमुळे त्याचा सभोवताल ही तितकाच सालस, समंजस आणि पवित्र आहे याची अनुभूती संगीत रजनी च्या कार्यक्रमात दिसली. एक निखळ मनमुराद आनंद आणि त्यातला सर्वांचा सहभाग तसाच निरागस प्रांजळ, त्या मुळे त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने "चार चांद" लागले. त्याच गुणांत अजून भर टाकणारी आणि तुमच्या संस्कारात दुधात साखर मिसळावी तशी केतकी ही मिसळली हे क्षणोक्षणी आम्ही पाहिलं.
गेले 2 दिवस मी ही सीमांत पूजन, वैदिक विवाह आणि मुख्य विवाह सोहळ्यात होतो. तुम्हा दोघांचे अपार कष्ट यात दिसत होते. त्या ही पेक्षा तुमच्या नियोजनाचा उंच आलेख मी बघत होतो. कुठल्याही प्रकारची धांदल, गोंधळ, गडबड नाही. जणू काही अगदी काहीच नाही अशी तुमची देहबोली, आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आवर्जून विचारपूस, आग्रह हे या यशाचं अजून एक अंग. अगदी कोणी कोणीहि तुम्ही तुमच्या नजरेतून न सोडता प्रत्येकाला स्वतः जातीनं पाहुणचार केलात. Hats off, hats off. पुण्यात लग्नाला असा तुडूंब भरलेल सभागृह ते ही आपल्या कडे पाहताना तुमच्या वर्तुळाची आणि वलयाची कल्पना आली. केवढा तो जनसंपर्क आणि ती मंडळी. त्या साठी पुर्व जन्मीचं संचित, पुण्याई आणि आशीर्वाद लागतात, आपण ते भरभरून घेऊन आला आहात. त्या सोबत तुम्ही दोघांनी आयुष्यभर केलेले कष्ट आणि त्याची जाणीव हे ही आहेच.
शंतनू जोशी सारखा एक जीव भावाचा मित्र त्या पुर्ण सोहळ्यात एक सख्खा भाऊ सावली प्रमाणे कायम उभा होता. कोणी कोणाला किती जीव लावावा, एक मित्र त्याच्या कुटुंबासहित पाठीराखा म्हणुन हजर होता. शंतनू जी एक व्यक्ती म्हणून श्रेष्ठ आहेत ते माहीत होतं पण या मुळें ते जवळून अनुभवलं. त्यांच्या वयस्कर मातोश्री ही खास यासाठी हजर होत्या.
संपूर्ण सोहळा अत्यंत दिमाखदार, शानदार आणी भव्य होताच, पण त्या ही पेक्षा तो हृदयस्पर्शी, भावनिक, आपुलकी, प्रेम, मायेचा ओलावा देणारा होता. त्याचं श्रेय आपण उभयतांच आहे, ते आपण स्वीकारणार नाही हे माहीत असताना ही मी म्हणत आहे कारण तो आपला स्वभाव नाही. चारही दिवस उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद आम्ही घेतला. त्यासाठी ही अन्नपूर्णा प्रसन्न असावी लागते म्हणून ते रूचकर चविष्ट होतं.
आम्हा सर्वांची झोळी या आनंदाने भरभरून आहे, आणि पुढचे कित्येक दिवस ती सोबत राहणार आहे.
साष्टांग नमस्कार
शरद पुराणिक
लिखानाचं श्रेय - अनिता पुराणिक
Comments